You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
MPSC निकाल जाहीर; साताऱ्याचा प्रसाद चौघुले अव्वल #5मोठ्या बातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. MPSC निकाल जाहीर : साताऱ्याचा प्रसाद चौघुले अव्वल
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2019 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. साताऱ्याचा प्रसाद चौघुलेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर उस्मानाबादचा रवींद्र शेळके मागासवर्गात प्रथम आला आहे. याशिवाय अमरावतीची पर्वणी पाटील महिलांमध्ये राज्यात प्रथम आली आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 13 ते 15 जुलै 2019 या दरम्यान 420 पदांसाठी राज्यसेवा मुख्य परीक्षा घेतली होती. जवळपास वर्षभरानं शुक्रवारी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. उमेदवारांच्या माहितीसाठी हा निकाल आणि प्रत्येक पवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण अर्थात कट ऑफ मार्क्स आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
राज्य सेवा (पूर्व) परीक्षा 17 फेब्रुवारी 2019 रोजी मुंबईसह अन्य 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात आली होती. पूर्व परीक्षेकरता 3 लाख 60 हजार 990 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. या परीक्षेमधून राज्य सेवा (मुख्य) परीक्षेकरता 6 हजार 825 उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते. ही मुख्य परीक्षा 13 ते 15 जुलै 2019 दरम्यान मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे येथे घेण्यात आली होती. लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी 1 हजार 326 उमेदवार अर्हताप्राप्त ठरले.
2. चिनी कंपन्यांच्या जाहिराती करू नका, भारतीय व्यापारी संघटनेचं सेलिब्रिटींना आवाहन
पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत भारताच्या 20 जवानांचा मृत्यू झाला. चीनला धडा शिकवण्यासाठी देशवासीयांनी चिनी उत्पादनावर बंदी घालावी अशी मागणी केली जात आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
'बायकॉट चायना प्रोडक्ट' या मोहिमेत सेलिब्रिटींनीही भाग घ्यावा अशी विनंती 'कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स' CAIT या संस्थेने केली आहे.
CAIT ने भारतीय सेलिब्रिटींसाठी एक पत्र लिहिले आहे. या पत्रकात अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी, माधुरी दीक्षित, महेंद्र सिंह धोनी, सचिन तेंडुलकर अशा अनेक नामांकित सेलिब्रिटींचा उल्लेख केला आहे.
या मंडळींनी चिनी उत्पादनांची जाहिरात करणं थांबवावं. तसेच भारतीय सैनिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी चिनी उत्पादनांविरुद्ध सुरु असलेल्या अभियानात आपला पाठिंबा दर्शवावा, अशी विनंती करण्यात आली आहे. या अभियानाला त्यांनी 'भारतीय सम्मान - हमारा अभिमान' असं नाव दिलं आहे.
3. व्हॉट्सअपमध्ये तांत्रिक अडचण, लास्ट सीन दिसेना
जगभरात कोट्यवधी वापरकर्ते असलेल्या व्हॉट्सअपमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. व्हॉट्सअपमध्ये बग आल्यानं वापरकर्त्यांना लास्ट सीन, ऑनलाईन दिसत नाहीये. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
लास्ट सीन, ऑनलाईन दोन्ही फिचर प्रायव्हसी सेटिंगचे भाग आहेत. मात्र व्हॉट्सअपमध्ये आलेल्या बगमुळे सेंटिग्सच बदलता येत नाही. ज्यांनी आधीपासून लास्ट सीनचा पर्याय 'ऑन' ठेवला होता, त्यांनाही लास्ट सीन दिसत नाहीये. व्हॉट्सअपवरील लास्ट सीन बंद झाल्यानं अनेकांनी सेटिंग्समध्ये जाऊन त्यात बदल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तांत्रिक अडचणीमुळे सेटिंग्स बदलता येत नसल्याचा अनुभव अनेकांना आला. 'फेल्ड टू अपटेड प्रायव्हसी सेटिंग्स. प्लीज ट्राय अगेन लेटर' असा मेसेज सेंटिग्स बदलताना येत आहे. ही समस्या नेमकी कधीपासून निर्माण झाली आणि ती कधीपर्यंत सोडवली जाईल, याबद्दल अद्याप तरी व्हॉट्सअपनं कोणतीही माहिती दिलेली नाही.
4. हे सरकार खोटं बोलत नाही, मुख्यमंत्रीही उद्धट नाहीत: मेधा पाटकर
"सध्याचे राज्यातले सरकार खोटी आश्वासनं देत नाही आणि मुख्यमंत्रीही उद्धट नाहीत," असं मत सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केलं आहे.
उस्मानाबाद दौऱ्यावर आलेल्या मेधा पाटकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे. कोरोनासारख्या महासंकटात सरकार व प्रशासन अत्यंत योग्यप्रकारे स्थिती हाताळत आहे, असंही त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या, "हे संवादी सरकार असून करोनासारख्या संकटात आक्रस्ताळेपणा न दाखवता संयमानं परिस्थिती हाताळली जात आहे. अनेक वर्षांनंतर राज्याला असे सरकार मिळाले आहे. मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधताना आश्वासक आणि ठाम वाटत आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेलाही त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत."
5. कलाकाराला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही - मनसे
"सुशांतचा बळी जाण्याचे काही कारण नव्हते, मात्र जर अशाप्रकारे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचे प्रयत्न करत असेल, तर मनसेच्या वतीने त्यांना दणके देण्यात येतील," अशा इशारा मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिला आहे. दैनिक भास्करनं ही बातमी दिली आहे.
"सुशांत सिंह राजपूतचा बळी जाण्याचे काहीही कारण नव्हते. मात्र जर अशाप्रकारे आत्महत्या करण्यास कोणी प्रवृत्त करत असेल तर मनसेची चित्रपट सेना त्यावर काम करत आहे. हे असे प्रकार वेळीच न थांबल्यास अशाप्रकारे आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांचे प्रेक्षक म्हणून चित्रपट न पाहणे किंवा त्यांचे चित्रपट प्रदर्शित न होऊ देणे, अशा प्रकारचे दणके देण्यात येतील," असं मनसे नेते अभिजीत पानसे यांनी म्हटलं आहे.
ठाण्यात एका विषयावर अभिजीत पानसे आणि जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती . त्यावेळी पानसे यांनी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या गोष्टींवरही मत व्यक्त केले.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)