You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार : कोकण दौऱ्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या ज्ञानात भर पडेल - #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा-
1. कोकण दौऱ्यामुळे फडणवीसांच्या ज्ञानात भर पडेल – शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यावरून त्यांच्यावर टीका केली आहे. टीव्ही9 मराठी नं ही बातमी दिली आहे.
“मी बारामतीसारख्या दुष्काळी भागातून येतो. देवेंद्र फडणवीस विदर्भातून येतात. समुद्राशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ते येत आहेत, तर चांगलं आहे. प्रत्येकाला ही परिस्थिती समजेल, ज्ञानात भर पडेल,” असं शरद पवार यांनी म्हटलंय.
कोकण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“कोकणवासीयांच्या अपेक्षा पूर्ण होतील हे लक्षात घेऊ. मुख्यमंत्री सतत माहिती घेत आहेत. पालकमंत्री काम करत आहेत. यातून काहीतरी होईल. एका दिवसात प्रश्न सुटणार नाही. लोकांनी धीर सोडला नाही, ते कामाला लागले आहेत. राज्यातील यंत्रणा संकटग्रस्तांच्या मागे उभी आहे. उद्या मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होईल, त्यानंतर गरज असेल तर केंद्राशी पण चर्चा करु. मुख्यमंत्री हे प्रश्न घेऊन केंद्राकडे जातील. पर्यटन क्षेत्रासाठी वेगळी अधिकची मदत करण्याची गरज आहे. त्याबाबतही सरकारला सांगू,” असं पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, शरद पवार यांनी राज्यातल्या विद्यापीठांच्या अंतिम परीक्षेबाबतच्या निर्णयावर राज्यपालांवर टीका केली आहे.
"राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं ज्ञान कदाचित ऑक्सफर्डपेक्षा जास्त असेल, कारण ऑक्सफर्डसह अनेक मोठ्या विद्यापीठांनी परीक्षा रद्द केल्या आहेत," असा टोला पवारांनी लगावला आहे.
कोकण दौऱ्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणाची प्रचंड मोठी हानी झाली.वादळ येऊन 9 दिवस झाले. पण, राज्य सरकारची कोणतीही मदत मिळालेली नाही. ज्यांची घरे गेली आणि तात्पुरत्या शिबिरामध्ये राहतात, त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. त्यांना योग्य ठिकाणी निवार्याची सोय करून त्यांच्यासाठी सर्व व्यवस्था करण्याची गरज आहे. शेती, फळबागांचे नुकसान झाले, तर पुढच्यावर्षी ते भरून निघत असते. पण, येथे तर झाडंच राहिली नाही. पुढच्या 5 ते 10 वर्षांनंतरच त्यांचे उत्पन्न सुरू होणार आहे. केवळ हेक्टरी मदत जाहीर करून भागणार नाही.थेट मदत आर्थिक देण्याची आज नितांत गरज आहे. 100 टक्के अनुदानातून फळबाग योजनेचा लाभ दिला पाहिजे. मासेमारांचे तर फार मोठे नुकसान झाले आहे. मासेमारांसंदर्भात अजून कोणतीही मदत जाहीर नाही. होड्यांसाठी त्यांना तत्काळ मदत देण्याची गरज आहे.घरांचे नुकसान झाले आहे. त्यांना टिन, सिमेंट पत्रे हवे आहेत. पण, त्याची काळाबाजारी होत आहे. वीज व्यवस्था सुरळीत होईल, याची तातडीने काळजी घेण्याची गरज आहे. अंधार तर आहेच, शिवाय पाणीपुरवठा योजना बंद आहे.प्रशासन प्रयत्न करीत असेल. पण, त्याचा परिणाम होताना दिसत नाही. कुणाला मदत मिळते आहे, असे मला या दौर्यात दिसून आले नाही. शासन आणि प्रशासनाने अधिक वेगाने काम करण्याची गरज आहे.बस आगारमध्ये ज्या पद्धतीने कोरोनाच्या काळात लोक दाटीवाटीने ठेवले आहेत, ती स्थिती डोळ्यात पाणी आणणारी आहे.केंद्र सरकारने नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी चमू तयाप केला आहे.कोल्हापूर/सांगली पुराच्यावेळी कपडे आणि भांड्यासाठी 7500 रुपये दिले होते. तात्पुरत्या निवार्यासाठी 36 हजार आणि 24 हजार असे एकरकमी भाडे देण्याचा निर्णय केला होता. मला तुलना करायची नाही. पण, ठोस निर्णय घेण्याची ही वेळ आहे.
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-लॉकडाऊन – 5 : महाराष्ट्र अनलॉक होतोय, जून महिन्यात काय सुरू काय बंद?
- वाचा - मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा -लॉकडाऊन – 5 : महाराष्ट्र अनलॉक होतोय, जून महिन्यात काय सुरू काय बंद?
- वाचा - महाराष्ट्र लॉकडाऊन : गावी जायला ई-पास कसा मिळवायचा?
- वाचा - दहावी,बारावीचा निकाल कधी लागणार?
2. राहुल गांधींना भाजपचं प्रत्युत्तर
काँग्रेसन नेते राहुल गांधी यांनी चीनच्या लडाखमधील कथित घुसखोरीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनवर टीका केली आहे. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
"चीननं देशात प्रवेश करून लडाखमधील भाग काबीज केला आहे. हे घडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र शांत बसले आहेत," असं ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे.
त्याला उत्तर देताना केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी म्हटलं, "आम्हाला हा वाद शांततेनं सोडवायचा आहे. पण, हे लक्षात घ्यायला हवं की आजचा भारत हा २०२०चा भारत आहे, १९६२चा नाही. आजचा भारत हा नरेंद्र मोदी यांच्यासारख्या खंबीर नेत्याचा आहे, काँग्रेस नेत्यांचा नाही."
3. मजुरांची नोंदणी करा - सुप्रीम कोर्ट
राज्यातील मजुरांची अधिकृतरित्या नोंदणी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने राज्यांना दिले आहेत. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
संपूर्ण भारतात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून मुंबईतून परप्रांतीय मजुरांनी पुन्हा आपापलं राज्य गाठलेलं आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रासह मुंबईत इतर राज्यातून येणाऱ्या मजुरांचे लोंढे थांबविण्याच्या दृष्टीने आपल्या राज्यात कोण अधिकृतरित्या आलेलं आहेत याची माहिती सरकारकडे असावी, यासाठी मजुरांची कायदेशीररित्या नोंदणी व्हावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे करीत होते.
4. लोणार सरोवराचे पाणी झाले लाल
लोणार सरोवराचं पाणी लालसर झालं असल्याचं निदर्शनास येत आहे. मात्र याचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
महाराष्ट्रातील सगळ्यांत छोटं पक्षी अभयारण्य म्हणूनही लोणार सरोवराची ओळख आहे.
वैज्ञानिक मार्गदर्शक आनंद मिश्रा यांच्या मते, "वातावरणात झालेले बदल, वातावरणात निर्माण झालेला कोरडेपणा, सरोवर परिसरातील कमी झालेले पावसाचं प्रमाण यामुळे सरोवराचे पाणी कमी झाले आहे. अशा बदलातूनच हा प्रकार झाला असावा."
तर लोणार शहरातील सांडपाणी आणि पावसाचं पाणी सरोवरात गेल्याने सरोवर गढूळ झालं असावे अशी शक्यता गावकऱ्यांकडून केली जात आहे. मात्र शहरातील सांडपाणी आणि पावसाच्या पाण्यामुळे सरोवरातील पाण्याचा रंग बदलला नसल्याचे तहसीलदार सैदल नदाफ यांचं म्हणणे आहे. पाण्याचा रंग कशामुळे बदलला याची चौकशी करण्यात येत आहे.
5. पावसाळ्यापूर्वी कापूस खरेदी पूर्ण करण्याचे आदेश
राज्यात शिल्लक कापसाची खरेदी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत.
त्यासाठी राज्यातील कापूसखरेदीची सर्व केंद्रं, कृषी उत्पन्न बाजार समित्या, कृषी केंद्र आणि इतर संबंधित सर्व कार्यालयं शनिवार, रविवारच्या सार्वजनिक सुटीसह पुढील आदेश होईपर्यंत सुरू ठेवा, असेही आदेश देण्यात आले आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं ही माहिती दिली आहे.
बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं, "कुठल्याही परिस्थितीत कापसाची खरेदी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)