महाराष्ट्र हवामान विभाग: 1 जूनपासून वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. 1 जूनपासून महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकानुसार, अरबी समुद्र आणि लक्षद्वीपच्या दक्षिण आणि मध्यपूर्व भागात रविवार सकाळपासून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता आणि 31 मेच्या दुपारपर्यंत तिथं अशीच परिस्थिती पाहायला मिळाली.

पुढचे 24 तास अरबी समुद्राच्या दक्षिण आणि मध्यपूर्व भागात ही परिस्थिती कायम राहण्याची चिन्हं आहे. त्यामुळे पुढच्या 24 तासांत वादळी वारे वाहण्याची शक्यता आहेत, आणि 3 जूनपर्यंत ते महाराष्ट्र आणि गुजरातपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

या माहितीसोबतच हवामान विभागानं काही सूचना जारी केल्या आहेत.

1. मुसळधार पावसाची शक्यता

केरळ, लक्षद्वीप आणि कर्नाटकच्या बहुतांश भागात 31 मे आणि 1 जून रोजी तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.

गोवा आणि कोकण परिसरात 31 मे रोजी तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर 1 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता. कोकण आणि गोव्यात 3 जूनपर्यंत ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता.

महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये 3 आणि 4 जूनला बहुतांश ठिकाणी तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.

गुजरात, दमन-दीव, दादरा, नगर हवेली या भागातील बहुतांश ठिकाणी 3 जूनला तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस.

गुजरात, दमन-दीव, दादरा, नगर हवेली या भागातील काही ठिकाणी 4 जूनला मुसळधार पाऊस.

2. वादळी वारा

हे मोसमी वारे प्रतिताशी 45 ते 55 किमी वेगानं वाहत असून अरबी समुद्राच्या आग्नेय आणि मध्य-पूर्व भागात पोहोचेपर्यंत ते प्रतिताशी 65 किमी वेगानं वाहायला लागतील. हे वारे ते पुढच्या 24 तासांत केरळच्या समुद्रपट्टीवर धडकण्याची चिन्हं आहे.

2 जूनच्या सकाळी कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहेचेपर्यंत वाऱ्याचा वेग प्रतिताशी 65-75 किमीहून 85 पर्यंत पोहोचणार आहे.

तर 3 जूनच्या सकाळी हे वारे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर प्रतिताशी 90-100 किमीहून 110 वेगानं वाहतील.

3. समुद्राची पातळी

पुढच्या 24 तासांत अरबी समुद्र आणि लक्षद्वीपच्या भागात समुद्राची पातळी उग्र स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. 2 जूनपासून कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात मोसमी वारे पोहोचल्यानंतर ती आणखी उग्र होण्याची शक्यता आहे.

तर 3 जूननंतर मोसमी वारे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर ती रौद्र रूप धारण करण्याची शक्यता आहे.

4. मच्छिमारांसाठी सूचना

अरबी समुद्र, लक्षद्वीप आणि केरळच्या किनारपट्टीवर 2 जूनपर्यंत, कर्नाटमध्ये 3 जून, तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 4 जूनपर्यंत मच्छिमारी न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. समुद्रातील मच्छिमारांना 31 मेपर्यंत किनारपट्टीवर वापस येण्याची सूचना करण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजाविषयी संबंधित राज्यांना नियमितपणे माहिती दिली जात असल्याचंही या पत्रकात म्हटलं आहे.

तर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्याजवळून चक्रिवादळ जाण्याचा इशारा मुंबई हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांच्या समुद्रकिनाऱ्यांवर सतर्कता वाढवण्यात आल्याचं सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.

या चक्रीवादळामुळे आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी आज दुपारी 12 वाजता जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत, असंही ते म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)