You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : प्रकाश आंबेडकर- धार्मिक स्थळांचा पैसा ताब्यात घेऊन गोरगरिबांसाठी वापरावा #5मोठ्याबातम्या
आज सकाळी प्रसिद्ध झालेल्या विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईटवरील बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा-
1. धार्मिक स्थळांचा पैसा ताब्यात घेऊन गोरगरिबांसाठी वापरावा - प्रकाश आंबेडकर
देशातली धार्मिक स्थळं ही सरकारच्या मालकीची आहेत. त्यामुळे सरकारने या धार्मिक स्थळांचा सगळा पैसा ताब्यात घेऊन गोरगरिबांसाठी वापरावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे.
लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच मजुरांना पाठवून दिलं असतं तर मजुरांवर आज उपासमारीची वेळ आली नसती, असंही आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे.
"केंद्र सरकारने नुकतीच पॅकेजची घोषणा केली असून हे पॅकेज खोटे आणि फसवे आहे. हे पॅकेज म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचा भात असल्याचे सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्धवस्त केली आहे," असं आंबेडकर यांनी म्हटलं.
2. दिल्लीतल्या झोपडपट्टीत भीषण आग
दिल्लीच्या कीर्तीनगर भागातल्या चुनाभट्टी झोपडपट्टीमध्ये काल रात्री भीषण आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे 24 पेक्षा जास्त बंब घटनास्थळी दाखल झालेले आहेत. NDTV ने याविषयीची बातमी दिलीय.
रात्री 11.20च्या सुमारास ही आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अजूनपर्यंत मिळालेली नाही.
3. पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रातून 388 गावं वगळण्याची उद्धव ठाकरेंची केंद्राकडे मागणी
औद्योगिक वसाहत आणि खनिज क्षेत्र असणारी 388 गावं पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रातून वगळण्यात यावीत अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे केलीय. 2570.88 चौरस किलोमीटर्सचा हा भूभाग आहे. लोकसत्तानं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून पश्चिम घाट क्षेत्राच्या प्रारूप अधिसूचनेसंदर्भात संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कर्नाटक मुख्यमंत्री येडीयुरप्पा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरात, तामिळनाडू आणि केरळचे सचिव यांनी आपापली भूमिका मांडली.
केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या 13 जिल्ह्यातील 17 हजार 340 चौरस किमी क्षेत्र पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रामध्ये समावेश केला आहे. पण औद्योगिक वसाहत व खनिज क्षेत्र असलेला 388 गावांचा 2570.88 चौरस किलोमीटरचा भाग त्यातून वगळावा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
4. पुण्यातल्या ससून हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग यशस्वी
पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये गुरुवारी (21 मे) करण्यात आलेली प्लाझ्मा थेरपीची पहिली मानवी चाचणी यशस्वी झाली आहे. यामुळे अत्यवस्थ रुग्णाचे प्राण वाचवण्यात यश आल्याचं बी. जे. मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. मुरलीधर तांबे यांनी सांगितलंय. सकाळ मध्ये हे वृत्त प्रसिद्ध झालं आहे.
महापालिकेच्या नायडू हॉस्पिटलमधून उपचार घेऊन कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णाने ससून हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मादान केलं होतं.
5. राज्यात आजपासून सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत एस. टी. धावणार
राज्यामध्ये आजपासून जिल्हांतर्गत एस. टी. सेवा सुरू होत आहे. रेड झोन आणि कन्टेन्मेंट झोनमध्ये मात्र ही सेवा सुरू असणार नाही. राज्याचे परिवहन मंत्री आणि एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी ही माहिती दिली. लोकमतमध्ये याविषयीची बातमी आहे.
प्रवासादरम्यान एस.टी.मध्ये फिजीकल डिस्टंन्सिंग पाळण्यात येईल आणि बसमध्ये एकूण क्षमतेच्या फक्त 50% प्रवासीच एकावेळी असतील.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)