You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शाहीद आफ्रिदी वि. हरभजन सिंग : ट्विटरवर का भिडलेत भारत-पाकिस्तानचे खेळाडू?
भारत-पाकिस्तान मॅच म्हटलं की वातावरण बदलू लागतं. सख्खे शेजारी देशांमधील क्रिकेटच्या मुकाबल्याला जणू एखाद्या युद्धाचं स्वरूप येतं.
दोन्ही देशांमधील दुरावलेल्या संबंधांमुळे भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जात नाही आणि पाकिस्तानचा संघ भारतात क्रिकेट मालिकेसाठी येत नाही. आयसीसी स्पर्धा आणि आशिया चषकाचा अपवाद वगळला तर भारत-पाकिस्तानचे संघ आमनेसामनेही येत नाहीत.
सध्याच्या काळात दोन्ही देशांवर कोरोनाचं संकट आहे. केवळ याच दोन देशातील नव्हे तर जगभरातील खेळांचे सामने स्थगित झाले आहेत. मैदानावर इंडो-पाक द्वंद्व थांबलं असलं तरी ट्विटरवर मात्र हे पारंपरिक प्रतिस्पर्धी जोरात आहेत.
पाकिस्तानचा धडाकेबाज बॅट्समन आणि ऑलराऊंडर शाहिद आफ्रिदीने पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओत आफ्रिदी असं म्हणताना दिसतोय की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मिरी जनतेवर जुलूम करत आहेत. त्यांना याचं उत्तर द्यावं लागेल. धर्माच्या नावावर मोदी राजकारण करत आहेत. कोरोना विषाणूपेक्षा मोठा आजार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात आणि डोक्यात आहे. हा धर्मद्वेषाचा आजार आहे."
आफ्रिदीच्या या वक्तव्यावर टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
भारताचा माजी ओपनर आणि आता भाजप खासदार गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यात मैदानावरही 'तू-तू मैं-मैं' चालायची. गंभीरने आफ्रिदीला ट्वीटच्या माध्यमातून फैलावर घेतलं आहे. गंभीर म्हणतो, "16 वर्षांचा शाहिद आफ्रिदी म्हणतो की पाकिस्तानच्या 7 लाखांच्या फौजेला 20 कोटी जनतेचा पाठिंबा आहे, तरीही 70 वर्षांपासून काश्मीरसाठी भीक मागत आहेत."
गंभीर पुढे म्हणतो की, "आफ्रिदी, इम्रान, बाजवा यांच्यासारखी माणसं पाकिस्तानच्या जनतेला मूर्ख बनवण्यासाठी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काहीही प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह बोलू शकतात. 'जजमेंट डे'पर्यंत काश्मीर मिळणार नाही. बांगलादेश आठवतंय ना?" असा सवालही गंभीरने केला आहे.
भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने शाहिद आफ्रिदीच्या चॅरिटी कामासाठी मदत करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र आफ्रिदीच्या ताज्या उद्गारानंतर हरभजननेही कडाडून टीका केली आहे.
हरभजन म्हणतो, "मानवतेच्या भावनेतून मी आफ्रिदीच्या कामाकरता मदतीचं आव्हान केलं होतं, कारण कोरोनाचं संकट संपूर्ण जगाला व्यापून टाकणारं आहे. मी भारतात जन्मलो आहे आणि भारतीय म्हणूनच शेवटचा श्वास घेईन. मी भारतासाठी 20 वर्ष खेळलो आहे. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे. जेव्हा देशाला माझी गरज असेल तेव्हा मी बंदूक घेऊन हजर होईन.
"आफ्रिदीचं वक्तव्य बेजबाबदार आहे. तो आपल्या पंतप्रधानांना, देशाला, इथल्या नागरिकांना काही बोलला तर ते सहन केलं जाणार नाही. मर्यादांचं पालन करून बोलायला हवं होतं. यापुढे आफ्रिदीशी असलेले संबंध संपले. त्यांनी दुसऱ्या कोणत्याही देशासंदर्भात आदराने बोलायला हवं. शाहिद आफ्रिदाला भारताबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. स्वत:च्या देशाकडे आफ्रिदीने लक्ष द्यायला हवं."
भारताचा हरहुन्नरी ऑलराऊंडर युवराज सिंगनेही आफ्रिदीच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. "शाहिद आफ्रिदीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दलच्या उद्गारांनी नाराज झालो आहे. देशाचा जबाबदार नागरिक आणि देशाचं प्रतिनिधित्व केलेला खेळाडू या नात्याने मी असं बोलणं कदापि सहन करू शकत नाही. मानवतेच्या धारणेतून आफ्रिदीच्या चॅरिटी कामासाठी मदतीचं आवाहन केलं होतं. पण यापुढे करणार नाही. जय हिंद," असं युवराजने म्हटलं आहे.
"अख्खं जग कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरलेलं असताना तुला काश्मीरचा प्रश्न सतावतो आहे. काश्मीर आमचं होतं, आहे आणि राहील. 22 कोटींची फौज घेऊन उतर, आमचा एक सैनिक सव्वा लाखांच्या बरोबर आहे. बाकी आकड्यांची गणती करत बस," असं भारताचा सलामीवीर शिखर धवनने म्हटलं आहे.
भारताचा अनुभवी बॅट्समन सुरेश रैनानेही आफ्रिदीला फटकारलं आहे. आपण जे बोलतो ते कायम राहतं, त्यामुळे योग्य बोलावं. देश म्हणून अपयशी ठरलेल्या पाकिस्तानसाठी काहीतरी कर. मला काश्मिरी असल्याचा अभिमान आहे. काश्मीर नेहमीच भारताचा अविभाज्य भाग राहील. जय हिंद असं रैनाने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
शोएब अख्तरही वादात
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरने जुना वाद उकरून काढला होता. 2010 आशिया कपवेळी हरभजन आणि शोएब यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली होती.
"मॅच संपल्यावर त्याच्याबरोबर भांडायला मी हॉटेलमधल्या हरभजनच्या रूमच्या दिशेने निघालो होतो," असं शोएबने सांगितलं. "आम्ही एकत्र जेवतो, लाहोरमध्ये एकत्र फिरतो, दोघांची संस्कृती सारखीच आहे, तो पंजाबी भाऊ आहे आणि तरीही तो असं का वागला? मी जाऊन त्याच्याशी भांडेन असा विचार करून गेलो होतो.
"मी येईन हे त्याला माहिती होतं. पण मला तो सापडला नाही. मी दुसऱ्या दिवशी स्वत:ला शांत केलं. त्यानेही माफी मागितली," असं शोएबने सांगितलं.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भविष्यात प्रेक्षकांविना मॅचेस होतील, अशी शक्यता आहे. त्यावर, "प्रेक्षकांविना मॅचेस म्हणजे वधूविना लग्न," असं वक्तव्य शोएबने केलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)