देवेंद्र फडणवीस यांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही - संभाजी ब्रिगेड : #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. फडणवीसांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही - संभाजी ब्रिगेड

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक कार्यकर्ता असा उल्लेख करून बदनामी केली आहे. याबाबत फडणवीस माफी मागणार नाहीत, तोपर्यंत त्यांना कोल्हापुरात प्रवेश बंदी करत आहोत, असं संभाजी ब्रिगेडने एक पत्रक प्रसिद्ध करून म्हटलं आहे. याबाबतची बातमी ई-सकाळने दिली आहे.

जगातील विद्वानांच्या यादीमध्ये राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख केला जातो. लोकराजा शाहू महाराजांना पिलर ऑफ सोशल डेमोक्रसी म्हणजेच सामाजिक लोकशाहीचे स्तंभ असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे फडणवीस यांनी शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचा इतिहास वाचून घ्यावा, असा टोला संभाजी ब्रिगेडने लगावला आहे.

देशभर ज्या राजांचा उल्लेख राजर्षी म्हणून केला जातो. त्यांना सामाजिक कार्यकर्ते म्हणून बदनामी करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेते पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणीही संभाजी ब्रिगेडने केली आहे.

राजर्षी शाहू महाराज यांचा बुधवारी स्मृतिदिन होता. यावेळी विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी एक ट्विट केलं होतं. पण यात त्यांनी शाहू महाराजांचा सामाजिक कार्यकर्ता म्हणून उल्लेख केल्याने यावर टीका झाली. त्यामुळे आधीचा ट्विट डिलीट करून फडणवीस यांनी शाहू महाराजांच्या कार्याची महती सांगणारा एक व्हीडिओ पोस्ट केला, अशी बातमी लोकसत्ताने दिली आहे.

2. हिजबुल्लाचा कमांडर रियाझ नायकू ठार

पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि कट्टरवाद्यांच्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर रियाझ नायकू ठार करण्यात आलं आहे.

रियाझ नायकू हा घटनास्थळी लपलेला असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दल आणि काश्मीर पोलिसांनी संयुक्त शोधमोहिम राबवली. मंगळवारी रात्री ११.०० वाजता हे ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं.

भारतीय लष्करानं हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर रियाझ नायकू याच्यावर १२ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. सबजार भट याच्या मृत्यूनंतर रियाझला हिजबुलचा कमांडर बनवण्यात आलं होतं. रियाझ हा बुरहान वानीच्या दलाचा सदस्य होता असा आरोप आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

3. 'अतिश्रीमंतांच्या संपत्तीवर 2 टक्के कर लावा'

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने देशातील सर्वांत श्रीमंत 1 टक्के लोकांच्या संपत्तीवर 2 टक्के आपत्कालीन कोरोना कर लावावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये डॉ. जी. जी. पारिख, मेधा पाटकर, अरुणा रॉय, अनिल सद्गोपाल, डुनु रॉय, जिग्नेश मेवानी, माजी न्यायमुर्ती बी. जी. कोळसे पाटील, प्रा. सुभाष वारे, नीरज जैन इत्यादींचा समावेश आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

अति श्रीमंतांच्या संपत्तीवर आपत्कालीन उपायाअंतर्गत 2 टक्के संपत्ती कर लावला, तरी सरकारला त्यातून 9.5 लाख कोटी रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळेल. याचा उपयोग कोरोना संकटाचा सामना करण्यासाठीच्या उपायांवर करता येईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

4. आर्थर रोड कारागृहातील कैद्याला करोनाची लागण

मुंबईच्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्याला करोनाची लागण झाली. या कैद्याला हाताळणाऱ्या दोन शिपायांनाही लागण झाल्याचं समजतं. या कैद्याबरोबर आणखी दीडशे कैदी कारागृहातील कक्षात बंद होते. त्यामुळे कारागृह विभागासह गृहमंत्रालयाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

आर्थर रोड कारागृहातील एका कैद्याला लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर कैद्याला हाताळणाऱ्या दोन शिपायांना भायखळा येथील महिला कारागृहातील विश्रामगृहात विलगीकरणात ठेवण्यात आलं. मात्र पुढे त्यांनाही बाधा झाली. त्यामुळे विश्रामगृह प्रतिबंधित केलं होतं.

मंगळवारी जेजे रुग्णालयाच्या पथकाने कारागृहातील दीडशे कैदी आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चाचणीसाठी नमुने घेतले. चाचणी अहवाल गुरुवारी अपेक्षित आहेत. संसर्गाचा प्रसार होऊ नये यासाठी प्रत्येक कारागृहात पुरेशी काळजी घेतली जात होती. आता आणखी कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या जातील, असं कारागृह आणि सुधारसेवा विभागाचे महानिरीक्षक दीपक पांडे यांनी सांगितलं आहे.

5. सार्वजनिक वाहतूक खुली करण्याचे गडकरी यांचे संकेत

लॉकडाऊनमुळे बंद असलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था लवकरच सुरू करण्यात येईल, असे संकेत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत.

येत्या काळात सार्वजनिक वाहतूक सुरू होईल, पण त्यासाठी काही अटी घालण्यात येतील. यामध्ये सरकारने सांगितल्याप्रमाणे शारिरिक अंतर राखणे, हँड सॅनिटायझर, मास्क वापरणे यांसारख्या सुरक्षात्मक उपायांचा वापर करणं अनिवार्य असेल, असं गडकरी म्हणाले.

बस आणि कार सर्व्हिस देणाऱ्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांसोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना गडकरी यांनी हे वक्तव्य केलं. ही बातमी पुढारीने दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)