कोरोना व्हायरस: 25 टन कांदा विकत घेऊन त्याने लॉकडाऊनमध्ये गाठलं घर #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. घरी पोहचण्यासाठी लढवली शक्कल; 25 टन कांदा ट्रकमध्ये घेऊन त्याने घर गाठलं
लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकलेल्या अनेकांना आपल्या घरी जाता येत नाहीये. अशातच मुंबईहून प्रयागराजला जाण्यासाठी लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या एकाने चक्क 25 टन कांदा खरेदी केला. ट्रकमध्ये हा कांदा भरून थेट त्यांनी आपलं घर गाठलं. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
या व्यक्तीचं नाव प्रेममूर्ती पांडे असं आहे. ते मुंबई विमानतळावर नोकरीला आहे, प्रेममूर्ती पांडे यांनी सांगितलं, "मी अंधेरी पूर्वेतील आझाद नगरला राहतो. इथे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. घरी परतण्याचे सर्व मार्ग बंद असताना केवळ अत्यावश्यक सेवेत भाजीपाला वाहतूक सुरू होती. त्यामुळे मी कांदा घेऊन जाण्याचा निर्णय घेतला."
सुरुवातीला त्यांनी 1300 किलो टरबूज खरेदी केला. 17 एप्रिलला नाशिकजवळील पिंपळगाव येथे जाण्यासाठी मिनी ट्रक भाड्याने घेतला. नंतर दहा हजार रुपयांचे टरबूज खरेदी करत वाहन मालासह ते मुंबईला पाठवले.

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?

मुंबईत या खरेदीबाबत व्यवहार केला होता. त्यानंतर पिंपळगाव येथून दोन लाख 32 हजार रुपयांमध्ये 25 हजार 520 किलो कांदा खरेदी केला. प्रयागराजला हा कांदा घेऊन जाण्यासाठी 77 हजार 500 रुपये भाडे ठरवून पुन्हा ट्रक घेतला. मात्र त्यांना मालाची रोख खरेदी करण्यासाठी कोणीच ग्राहक मिळाला नाही. त्यामुळे पांडे यांनी ट्रक तेथून काही किलोमीटर दूर असलेल्या कोटवा मुबारकपूर या आपल्या गावी नेला व त्या ठिकाणी हा माल उतरवण्यात आला.
2. कोव्हिड 19: पुण्याची कंपनी लसीचे उत्पादन पुढच्या महिन्यापासून करण्याच्या तयारीत
डेंग्यू आणि न्यूमोनियाच्या लसीचे उत्पादन करणारी पुण्याची सीरम कंपनी आता एक हजार रुपयात कोव्हिडची लस उपलब्ध करुन देण्याबाबतचा प्रस्ताव देणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
लाइव्ह मिंटने ही बातमी दिली आहे.
"मे महिन्यापासून या लसीची चाचणी आम्ही सुरू करू. सुरूवातीला काही शंभर रुग्णांवर लसीचा प्रयोग करण्यात येईल. हा प्रयोग यशस्वी झाला तर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात या लसीचे उत्पादन सुरू होईल. भारतात परवडणाऱ्या किमतीत आम्ही ही लस विकू ज्याची साधारण किंमत एक हजार रुपये इतकी असेल." सीरम संस्थेचे सीईओ अदर पुनावाला यांनी सांगितलं.
3. परप्रांतीयांच्या जाण्याची केंद्र सरकारने व्यवस्था करावी - शिवसेना
परप्रांतीयांच्या बाहेर जाण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारने घ्यावी असं शिवसेनेनी आपलं मुखपत्र सामनामध्ये म्हटलं आहे. परप्रांतीयांना बाहेर पडायची आणि महाराष्ट्राच्या सीमा सीमा ओलांडून घरी पोहचायची घाई झाली आहे. अर्थात, त्यांना बाहेर पडू न देणे हे आरोग्याच्या दृष्टीने सोयीचे आहे, पण त्यांचे काफिले झुंडीच्या झुंडीने निघणार असतील तर केंद्र सरकारला अशा लोकांची जबाबदारी झटकता येणार नाही.

फोटो स्रोत, Getty Images
गाड्या सोडा, बसेस लावा, पण त्यांची जाण्याची व्यवस्था करा. कारण या मंडळींचा 'होमसिक'नेस संपला नाही तर हे सर्व लोक रस्त्यावर उतरुन काय हैदोस घालतील याचा नेम नाही. त्यांना त्यांच्या राज्यात घेऊन चला, पण गडकरी म्हणतात त्या प्रश्नाचे उत्तरही शोधा. "भावांनो, गावी जाऊन खाणार काय? सामना वृत्तपत्रात हे संपादकीय छापण्यात आलं आहे.
4. बेस्ट बस चालकाला कोरोना व्हायरसची लागण, 236 कर्मचारी क्वारंटाइन
अत्यावश्यक सेवा देणाऱ्या 234 जणांना नुकतंच क्वारंटाईन करण्यात आलंय. यापैकी एका बेस्ट बस चालकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलीय. अशी माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली. टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रानं ही बातमी छापली आहे.
क्वारंटाइनमध्ये असताना या बस चालकाला ताप आणि इतर लक्षणं दिसून आली. तेव्हा त्यांना राजावाडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथेच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं.
संबंधित बस चालक सायन डेपोहून धारावी परिसरात प्रवाशांना घेऊन गेला होता.
5. प्लाज्मा थेरपीचा महाराष्ट्रात पहिला प्रयोग : 53 वर्षीय रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा
लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 53 वर्षांच्या रुग्णावर शनिवारी प्लाज्मा थेरपीचा पहिला प्रयोग करण्यात आला. रविवारी रुग्णाला 200 एमएल रक्तसंक्रमण देण्यात आले. तर अंतिम फेरीचे 200 एमएल रक्तसंक्रमण आज करण्यात येणार आहे.

फोटो स्रोत, Reuters
या रुग्णाचं ऑक्सिजन घेण्याचं प्रमाण सुधारले आहे. पण एवढ्या लवकर काहीही सांगणे कठीण आहे. अशी प्रतिक्रिया मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली, हे वृत्त द हिंदूने दिलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























