You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पालघर मॉब लिंचिंग: महंताची धमकी - गडचिंचले गावाला सील करून हत्या करू #5मोठ्याबातम्या
विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.
1. पालघर प्रकरणानंतर महंतांची धमकी
महाराष्ट्रातील संत असुरक्षित आहेत. सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे. या हत्याकांडात पोलीसदेखील जबाबदार आहेत. संपूर्ण गावाला सील करून गावाची हत्या करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया अखिल भारतीय आखाडा परिषद अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांनी दिली आहे.
'लोकमत न्यूज 18' ने ही बातमी दिली आहे.
"महंतांची हत्या करणारे राक्षसच. त्यामुळे ज्यांनी हे केलं त्यांचा वध करणं चुकीचं नाही. लॉकडाऊननंतर लाखो नागा साधूंना घेऊन त्या गावाला आणि सरकारला घेराव घालू. देशातील सर्व आखाड्यांचे महंत संतप्त झाले आहेत. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास सरकारच्याविरोधात मोठं आंदोलन केलं जाईल. महाराष्ट्र ही संतांची भूमी मानली जाते. मात्र आता महाराष्ट्रात साधू-संत सुरक्षित नाहीत," अशा शब्दांत महंतांनी नारजी व्यक्त केली.
PTIच्या वृत्तानुसार, लॉकडाऊनमध्ये कांदिवलीहून तिघेजण एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात सहभाग घण्यासाठी गुजरातमधल्या सुरतला जायला निघाले होते. मात्र पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गडचिंचले गावाजवळ एका जमावाने साडेनऊच्या सुमारास त्यांची गाडी अडवली.
ही माणसं चोर असल्याचा संशय जमावाला होता. त्यामुळे जमावाने त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यात तिन्ही पीडितांचा मृत्यू झाला. यामध्ये 70 आणि 35 वर्षांचे दोन साधू, आणि 30 वर्षांच्या त्यांच्या ड्रायव्हरचा समावेश आहे.
याप्रकरणी 110 जणांना अटक केली असून त्यात 9 अल्पवयीनांचा समावेश आहे, असं पालघर पोलिसांनीही ट्वीट केलंय.
2. ग्रामविकास विभागाच्या साईटवर सरकारी भरतीची खोटी जाहिरात
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. याचा गैरफायदा घेत भामट्यांनी राज्य सरकारच्या वेबसाईटवर ग्रामविकास विभागात 28 हजार 384 जागांच्या भरतीची जाहिरात देऊन गोंधळ उडवून दिला.
ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या या भरतीचा खोटेपणा उघड होताच ग्रामविकास विभागाने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. खोटी जाहिरात देणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
लॉकडाऊनमुळे सरकारने सर्व भरती प्रक्रिया तसंच परीक्षा स्थगित केल्या आहेत. मात्र काल अचानक ग्रामविकास विभागाच्या या वेबसाईटवर अंतर्गत राज्यस्तरीय सरळसेवा निवडसेवा पुणे यांच्यवतीने ई ग्रामपंचायत प्रकल्पाच्या विविध पदांसाठीची जाहिरात दिसू लागली. 28 हजार पदांसाठी ही प्रक्रिया राबवण्यात येत असून वेतन आणि उत्तेजनार्थ भत्ते मिळतील असं नमूद करण्यात आलं होतं.
अर्जासोबत नोंदणी शुल्काचाही उल्लेख होता. अनेकांनी ही जाहिरात पाहून अर्ज पाठवायला सुरुवात केली. ही बाब सरकारच्या निदर्शनास येताच दोषींचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे.
3. संजय राऊत - 27 मे नंतरही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील
विरोधकांनी कितीही डावपेच खेळले तरी 27 मेनंतरही उद्धव ठाकरे हेच राज्याच्या मुख्यमंत्रिपदी असतील, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं केला. TV9 मराठीने ही बातमी दिली आहे.
"सध्याची परिस्थिती ही संघर्षाची आहे. कोरोनाच्या संकटात राजकीय मतभेद विसरून लढलं पाहिजे. मी जे राजभवनाबाबत ट्वीट केलं ते वाचनात आलेल्या घटनांवरून केलं. राजभवन हे पवित्र स्थान आहे. त्याचं पावित्र्य टिकून राहिलं पाहिजे."
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 27 मे पर्यंत विधानसभा किंवा विधानपरिषद यापैकी एका सभागृहाचे सदस्य होणं अनिवार्य आहे. त्यांच्या सदस्य होण्यात प्रक्रियेत कोणी आडकाठी करत असलं तरी उद्धव ठाकरेच राज्याचे मुख्यमंत्री असतील, असं राऊत म्हणाले.
4. कोकणातला आंबा देशभर जाणार; विशेष पार्सल ट्रेन धावणार
कोकणातील आंबा विशेष पार्सल ट्रेनद्वारे देशभर जाणार आहे. आंबा बागायतदारांना दिलासा देणारी गोष्ट आहे. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी, कणकवली, मडगाव आणि उडुपी या चार स्थानकांवर पार्सल ट्रेनमध्ये चढवता येईल. या पार्सल ट्रेनद्वारे कोकणातील आंबा देशाच्या अन्य भागात पाठवण्याची व्यवस्था झाली आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
स्पेशल पार्सल ट्रेन ओखा ते तिरुवनंतपुरम आणि पुन्हा ओखा या मार्गावर धावणार आहे. कोकण रेल्वेच्या चारही स्थानकातील पार्सल कार्यालयात याकरता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
5. काश्मीरमध्ये फोटोजर्नलिस्टवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
"तरुणांना भडकावणे आणि शांतता भंग करण्याच्या उद्देशाने" सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी काश्मीरमधील एका महिला छायाचित्रकार पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'स्क्रोल'ने ही बातमी दिली आहे.
मशरत जाहरा या फोटोजर्नलिस्टवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या दोषी आढळल्यास सात वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकतो.
मशरत महिला आणि बालक यांच्यासंदर्भात काम करतात. त्यांनी काढलेल्या फोटोंमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)