एजाझ खान - मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया पोस्टवरून केली अटक, ट्विटरवर #ReleaseAjazKhan ट्रेंड

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

सोशल मीडियावर प्रक्षोभक वक्तव्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेता आणि बिग बॉस स्पर्धक एजाझ खानला अटक केली आहे.

"भाजप आणि दलाल माडियाला कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाकरता मुस्लीम समाज कारणीभूत दाखवायचं आहे. मात्र एजाझ खानसारखी माणसं त्यांच्या वाटेत अडथळा बनून उभी राहिली आहेत. लोकांना मदत करतानाचे आमचे फोटो त्यांच्या अजेंड्यावर पाणी फेरतात," असं एजाझने म्हटलं आहे.

यानंतर, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात एजाझ आक्षेपार्ह बोलत असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्याची भाषा तेढ पसरवणारी आणि द्वेषमूलक होती, असं खार पोलिसांनी सांगितलं.

भारतीय दंड संहितेच्या 153 A, 117, 188, 501, 504, 505 कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एजाझने प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही राग काढला.

संपूर्ण देश कोरोनाशी लढा देत असताना, समाजात दुही पसरेल असं वक्तव्य पसरवणं योग्य नाही, असं मुंबई पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी सांगितलं.

ऑक्टोबर 2018 मध्ये ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांच्या अँटी नारकोटिक्स विभागाने एजाजला अटक केली होती. त्यावेळी पोलिसांना त्याच्याकडे 2 मोबाईल, 2.2 लाख रुपये जप्त केले होते. पोलिसांनी त्याला पकडलं तेव्हा तो नशेत होता. त्याच्याकडे 8 प्रतिबंधित एक्सटेसी टॅब्लेट पोलिसांना मिळाल्या होत्या.

कोण आहे एजाझ खान?

ट्विटर बायोनुसार, मुंबईस्थित एजाझ 'बॉलिवुड फिल्म अॅक्टर, फिटनेस फ्रीक, प्राऊड इंडियन, एक नंबर माणूस' असं एजाझने म्हटलं आहे. त्याला 322.3 हजार फॉलोअर्स आहेत.

आजूबाजूला घडणाऱ्या घटनांविषयी एजाझ सातत्याने भाष्य करत असतो. उजव्या विचारसरणीच्या लोकांविरुद्ध त्याची शेरेबाजी सुरूच असते.

स्वत:चं काम सोडून दुसऱ्याच्या कामात अडथळा उत्पन्न करणं हा आपल्याला जडलेला आजार आहे. अशी माणसं स्वत: काही करत नाहीत आणि दुसऱ्यालाही करू देत नाही, असं एजाजने म्हटलं आहे.

"मी लाईव्ह येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा खरा चेहरा उघड केला. त्यामुळे अनेकांना पोटशूट उठला आहे. मात्र माफी मागायला आम्ही सावरकर नाही. मरू परंतु कोणासमोरही झुकणार नाही. Bhaktmedia vs azazkhan या नावाने ट्वीट करा. इन्किलाब जिंदाबाद, लडेंगे जीतेंगे," असं एजाजने लिहिलं होतं.

त्याच्या ट्वीटला साथ देणारेही भरपूर आहेत आणि ट्रोल करणारेही तितक्याच संख्येने आहेत. एजाझला अटक झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी #releaseAjazkhan नावाचा हॅशटॅग सुरू केला आहे.

बबिता फोगाटचा वाद

दरम्यान कुस्तीपटू आणि भाजप नेता बबिता फोगाटने आपण तबलीगी जमातविषयी केलेलं वादग्रस्त ट्वीट योग्य असल्याचं म्हटलं आहे. एजाजने यासंदर्भातही ट्वीट केलं.

बबिता फोगाटने केलेल्या ट्वीटवरून सध्या वाद निर्माण झालाय. कोरोना व्हायरसच्या संक्रमणासाठी तिने जमात कारणीभूत असल्याचं म्हटलं होतं.

यानंतर बबिता फोगाटवर टीकेचा भडीमार झाला आणि ट्विटरवर #SuspendBabitaPhogat हॅशटॅग ट्रेंड झाला. याच्या विरोधात बबिताचे समर्थकही सोशल मीडियावरून व्यक्त झाले आणि तिला पाठिंबा देणारा #ISupportBabitaPhogat हॅशटॅगही ट्रेंड होऊ लागला.

बबिताप्रमाणेच बॉलिवुड अभिनेत्री कंगना राणावतची बहीण रंगोली चंडेलनेही मुसलमानांमधल्या एका घटकावर टीका केली होती आणि वादग्रस्त ट्वीट्स केली होती. यानंतर ट्विटरने रंगोली चंडेलचा अकाऊंट सस्पेंड केला. बबिता फोगाटचा अकाऊंट सस्पेंड करण्यात आलेला नसला तरी तिच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनेकांनी ट्विटरकडे केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)