You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: ’लॉकडाऊनमुळे झूमधले प्राणी एकमेकांना खायला घालावे लागतील’
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये लहानथोरांच्या गर्दीने जी प्राणिसंग्रहालयं गजबजलेली असतात ती सध्या ओसाड पडली आहेत. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्यालॉकडाऊनचा परिणाम जगभरातल्या प्राणिसंग्रहालयांवर झालेला आहे.
उत्तर जर्मनीतल्या एका संग्रहालयाच्या एका संचालकांनी मान्य केलंय की असंच चालू राहिलं तर त्यांना काही प्राण्यांची कत्तल करून त्यांचं मांस इतर प्राण्यांना खाऊ घालण्याची वेळ येऊ शकते.
"कोणत्या प्राण्यांची कत्तल करायची याची आम्ही एक यादीच तयार केली आहे," न्यूम्युस्टर प्राणिसंग्रहालयाच्या वेरेना कास्परी यांनी सांगितलं.
बर्लिन प्राणिसंग्रहालयात जुळ्या पांडांचा जन्म झाला आहे, पण त्यांचे चाहते त्यांना सध्या ऑनलाईनच पाहू शकतात. या प्राणिसंग्रहालयाच्या प्रवक्त्या फिलीन हॅखमाईस्टर यांनी डीपीए या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं, "ही पांडाची जोडगोळी खूपच गोड आहे. आम्हाला मनापासून वाटतं की चाहत्यांना ही पांडाची पिल्लं ऑनलाईन पाहाता यावीत. नाहीतर जेव्हा प्राणिसंग्रहालय पुन्हा सुरू होईल तोवर ते मोठे झालेले असतील."
प्राण्यांच्या अन्नाचा प्रश्न
न्यूम्युस्टर प्राणिसंग्रहालयाच्या अधिकारी कास्परी यांनी आम्हाला सांगितलं की शेवटचा पर्याय म्हणून दुर्दैवाने आम्हाला काही प्राण्यांची कत्तल करून इतर प्राण्यांना ते मांस खायला घालावं लागेल. नाहीतर कोणतेच प्राणी जिवंत राहाणार नाहीत. "असं केलं नाही तर भुकेने त्यांचा मृत्यू होईल. अर्थात याने संग्रहालयाचे आर्थिक प्रश्न सुटणार नाहीच," त्या म्हणाल्या.
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
कास्परी यांच्या प्राणिसंग्रहालयाला सरकारकडून आपातकालीन निधी मिळण्याची शक्यता नाही त्यामुळे लॉकडाऊनमुळे त्यांच्या प्राणीसंग्रहालयाचं दीड लाख पाऊंडाहून अधिक नुकसान होईल असा त्यांचा अंदाज आहे.
जर्मनीमधल्या प्राणिसंग्रहालयांनी लोकांच्या देणग्यांबरोबरच सरकारकडूनही आर्थिक मदत मागितली आहे.
तिथल्या राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय संस्थेचं म्हणणं आहे की प्राणिसंग्रहालयं पूर्णपणे बंद होऊ शकत नाहीत, आणि त्यांचा खर्चही कमी होणार नाही. कारण प्राण्यांना खायला घालावंच लागतं, त्यांची काळजी घ्यावी लागते आणि जे प्राणी उष्णकटिबंधीय आहेत त्यांच्यासाठी तापमान 20 सेल्सिअस राहील याचीही व्यवस्था करावी लागते.
ऑस्ट्रियातल्या व्हिएन्नामध्ये असणाऱ्या श्कोनब्रन प्राणिसंग्रहालयाचं म्हणणं आहे की सध्या जेवढी बचत आहे ती वापरून तात्पुरता खर्च निघू शकतो पण नंतर काहीतरी तजवीज करावी लागणार.
सध्या अनेक प्राणिसंग्रहालयातले कर्मचारी घरी आहेत, त्यांच्या नोकरीवर संकट आलं नसलं तरी त्यांना 3 महिने घरी थांबावं लागणार आहे.
प्राण्यांना आठवण येतेय माणसांची
प्राणिसंग्रहालयातल्या काही अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की या लॉकडाऊनचा प्राण्यांवरही वाईट परिणाम होऊ शकतो आणि ते भावनिक होऊ शकतात. कारण प्राण्यांनाही सतत माणसं आजूबाजूला असण्याची आणि त्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होण्याची सवय झालेली आहे.
"इथल्या माकडांना माणसं पहायला फार आवडतं. सील आणि पोपटांना माणसांचं आकर्षण आहे आणि सध्याचं आयुष्य त्यांच्यासाठी फारच कंटाळवाणं झालं आहे," बर्लिन प्राणिसंग्रहालयाच्या अधिकारी हॅखमाईस्टर सांगतात.
मागच्या आठवड्यात मॉस्को प्राणिसंग्रहालयानेही म्हटलं होतं की त्यांचे पांडा काहीतरी मिस करत आहेत. "त्यांच्यापाशी कोणताही माणूस गेला की ते उत्तेजित व्हायचे," त्यांनी म्हटलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)