You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदींनी 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला, लोकांकडे केली 7 गोष्टींची मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मेपर्यंत आणखी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच हा लॉकडाऊन आणखी कडक असले असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
नागरिकांच्या सहकार्यामुळेच कोरोनामुळे होणारं नुकसान काही प्रमाणात टाळण्यात भारताला आतापर्यंत यश मिळालं आहे. देश प्रयत्नपूर्वक कोरोनाच्या संकटाशी लढत आहे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलंय.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी आज चौथ्यांदा देशवासियांशी संवाद साधला.
यावेळी मोदींनी 7 गोष्टींसाठी लोकांची साथ मागितली आहे. ते खालील प्रमाणे -
1) घरातल्या वरिष्ठांची काळजी घ्या. विशेषतः आजारी वृद्धांची.
2) लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या लक्ष्मण रेषेचं पालन करा. मास्कचा वापर करा.
3) तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने सांगितलेल्या गोष्टींचं पालन करा. गरम पाणी, काढा प्या.
4) आरोग्य सेतू मोबाईल अॅप डाऊनलोड करा.
5) शक्य होईल तितक्या गरीब कुटुंबांची काळजी घ्या.
6) तुमच्या व्यवसायात काम करणाऱ्यांना नोकरीवरून काढू नका.
7) कोरोना योद्धा - डॉक्टर, पोलीस, वगैरेंचा आदर करा.
तर सवलत देऊ - मोदी
आपण सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनचा जो निर्णय घेतला त्याचा फायदा आपल्याला मिळाला आहे. 20 एप्रिलपर्यंत प्रत्येक जिल्हा, तालुक्याचं परीक्षण केलं जाईल. जिथे कोरोनाचे रुग्ण कमी असतील, ज्यांनी संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ज्या क्षेत्रांमध्ये हॉटस्पॉट होण्याची क्षमता कमी असले, तिथेच थोड्याफार सवलती दिल्या जातील, असं मोदींनी सांगितलं आहे.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
त्याच वेळी या वाढलेल्या लॉकडाऊनचे नियम पहिल्यापेक्षा अधिक कठोर असतील असं मोदींनी स्पष्ट केलं आहे.
"बुधवारी यासंदर्भात सरकारी गाइडलाईन जाहीर केल्या जातील. नवीन गाइडलाइन बनवताना रोजंदारीवर काम करणाऱ्या, आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली आहे.
देशात अनेक ठिकाणी रबी पिकांची कापणी सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकारशी चर्चा करून शेतकऱ्यांना कमीत कमी त्रास होईल, यासाठी काळजी घेतली जाणार नाही," असं मोदी म्हणाले.
कोरोनाचे १० हजार हून अधिक रुग्ण आढळले की पंधराशे ते सोळाशे बेडची गरज भासते. आपण एक लाख बेडची व्यवस्था केलीये. देशात ६०० कोविड सेंटर आहेत, जिथे केवळ याच रुग्णांवर उपचार होतील. अशी माहिती त्यांनी दिली.
याआधी 3 वेळा संबोधन
याआधी नरेंद्र मोदींनी 3 वेळा देशाला संबोधित केलं आहे. 19 मार्च, 24 मार्च आणि 3 एप्रिलला त्यांनी देशाला संबोधित केलं होतं.
19 मार्चला त्यांनी एक दिवसाच्या जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. त्यानंतर 24 मार्चला रात्री उशीरा भाषण करून त्यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. तर 3 एप्रिलला त्यांनी लोकांना 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)