कोरोना लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा साठा केल्यास 7 वर्षांपर्यंत कैद- छगन भुजबळ : #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या आहेत...

1. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी केल्यास सात वर्षांपर्यंत कैद- छगन भुजबळ

राज्यात जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करून चढ्या दरानं विक्री केल्यास सात वर्षांपर्यंत कैद होऊ शकते. तसंच संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

राज्यात जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी आणि त्यांची चढ्या दरानं विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी मिळत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची कोणतीही टंचाई नसून किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी सरकारी यंत्रणा खबरदारी घेत असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काही व्यापाऱ्यांकडून वस्तूंचा काळाबाजार आणि अतिरिक्त भाव वाढ केली जात आहे. राज्याच्या जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी आणि भाववाढ नियंत्रित करण्यासाठी पथकं तयार करण्यात आली आहेत. ही पथकं किरकोळ तसंच घाऊक व्यापार प्रतिष्ठानं, गोदामं, शीतगृहं इत्यादी ठिकाणी असलेल्या जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता आणि दरांची पडताळणी करून कारवाई करतील, असंही या बातमीत म्हटलं आहे.

2. कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे बंद झालेली मुंबईतली रुग्णालयं लवकरच सुरु होणार

कोरोनाचा संसर्ग झालेले आणि कोणतीही लक्षणे नसलेले रुग्ण कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आल्याने मुंबईतील जवळपास 15 रुग्णालयांना रुग्णसेवा खंडित करावी लागली असून 100 हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

ही 15 रुग्णालयं सध्या बंद असली तरी त्यांच्या तपासण्या पालिकेकडून या आठवडय़ात करण्यात येणार आहेत. त्यानंतर ही रुग्णालये पुन्हा खुली करण्याचा निर्णय पालिकेकडून घेतला जाईल. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

वोक्हार्ट रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने 52 परिचारिकांसह डॉक्टरांना करोनाची लागण झाली आहे, तर जसलोकमध्ये 21 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून भाटिया रुग्णालयात चार परिचारिका करोनाबाधित आढळलेल्या आहेत. यासह हिंदुजा, ब्रीचकॅण्डी, दादरचं शुश्रूषा रुग्णालय, भायखळ्याचं जगजीवन रामनारायण रेल्वे रुग्णालय, पार्थ नर्सिग होम्स, चेंबूरमधील साई, मुलुंडचे स्पंदन, जोगेश्वरी येथील मिल्लत नगर अशा जवळपास 15 रुग्णालयांमधील सेवा बंद झाल्याने आरोग्यसेवेवरील ताण अधिकच वाढला आहे.

3. ...नाहीतर कोरोनाच्या बळींपेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या होतील- राजू शेट्टी

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव आणि आरोग्य तसंच पोलीस यंत्रणांवर येणारा ताण पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोलीस आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण जाहीर केलं आहे. त्याचप्रमाणे शेतकरी आणि शेतमजुरांनाही विमा संरक्षण द्यावं, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. TV9 मराठीनं ही बातमी दिलीये.

लॉकडाऊनमुळे शेतीमाल सडून चाललाय. त्याचा त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा कोरोनामुळे जेवढे बळी गेले नाही. त्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील, याचं सरकारने भान ठेवावं, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे

4. देशाची विभागणी तीन झोनमध्ये होण्याची शक्यता

देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आठ हजारांहून अधिक झाली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू शकतो, हे लक्षात घेऊन मोदी सरकार देशाची विभागणी तीन झोनमध्ये करण्याची शक्यता आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठीनं हे वृत्त दिलं आहे.

कोविड-19 प्रकरणांच्या संख्येच्या आधारावर देशात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन तयार करण्यावर सरकारचा विचार सुरू आहे. झोनमध्ये विभागणी करून सरकार काही सवलत देऊ शकते. लॉकडाऊनचा कालावधी 14 एप्रिलला संपत आहे, मात्र अनेक राज्यांनी हा कालावधी वाढवण्याची मागणी केली आहे.

PTI या वृत्तसंस्थेनं यासंबंधीची बातमी देताना म्हटलं आहे,की कोरोनाची सर्वाधिक प्रकरणं जिथून समोर आली आहेत, ते भाग रेड झोनमध्ये जातील. रेड झोनमध्ये संपूर्णपणे लॉकडाऊन असेल.

5. भारताचा आर्थिक विकास दर तीन टक्क्यांहून खाली जाण्याची शक्यता

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे भारताची आर्थिक विकास कामगिरी खूप वाईट होणार असल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे.

भारताची अर्थव्यवस्था आता 2020-21 मध्ये 1.5 टक्के ते 2.8 टक्के विकास दर राखू शकेल. द इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी प्रसिद्ध केलीये.

जागतिक बँकेच्या दक्षिण आशियाविषयक आर्थिक अहवालात म्हटलं आहे, की 2019-20 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर हा 31 मार्च अखेर 4.8 ते 5 टक्के राहील, पण नंतर कोरोना प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे तो कमी होणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)