You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : लॉकडाऊन शिथिल होईल असं कोणीही डोक्यात ठेवू नये - राजेश टोपे #5मोठ्याबातम्या
आज सकाळी विविधं वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्या अशा आहेत -
1) लॉकडाऊन शिथिल होईल असं कोणीही डोक्यात ठेवू नये : राजेश टोपे
राज्यात आणि देशात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर केंद्र सरकारनं लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. 21 दिवसांच्या लॉकडाऊनला अजून सात दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे गेल्या 14 दिवसांपासून घरात असलेले नागरिक लॉकडाऊन संपण्याची वाट बघत आहेत.
मात्र, देशातील लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार असला, तरी महाराष्ट्रातील लॉकडाऊन आणखी लांबणार आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच तसं स्पष्ट केलं आहे. “15 एप्रिलपासून लॉकडाऊन संपूर्णपणे शिथिल होईल, असं कुणीही गृहित धरू नये,” असं टोपे यांनी सांगितलं आहे.
10 आणि 15 एप्रिलच्या दरम्यान जी परिस्थिती असेल तिचा पूर्ण अभ्यास करून मगच निर्णय घेतला जाईल, असंही टोपेंनी स्पष्ट केलं.
2) मातोश्री परिसरातली चहावाल्याला कोरोनाची लागण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याच्या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णाची माहिती मिळताच संपूर्ण परिसर सील करण्यात आला.
मातोश्रीच्या काही मीटर अंतरावर असणाऱ्या एका चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अंगरक्षक आणि कार्यालयीन कर्मचारी यांची तातडीने कोरोना तापसणी होणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचे अंगरक्षक आणि कार्यालयीन कर्मचारी बदलले जाण्याचीही शक्यता आहे.
मातोश्री परिसरात कर्तव्यावर असणारे बरेच पोलीस कर्मचारी या चहा विक्रेत्याकडे चहा पिण्यासाठी जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव या कर्मचाऱ्यांची बदली होण्याची शक्यता आहे. जवळपास 180 हून अधिक कर्मचारी या परिसरात कार्यरत असतात. या घटनेनंतर वरिष्ठ पातळींवरच्या हालचाली वाढल्या आहेत.
3) 'ते' तबलीगी समोर न आल्यास कठोर कारवाई :अनिल देशमुख
तबलीगी जमातचे जे लोक दिल्लीच्या मरकजहून परतले त्यांच्यापैकी महाराष्ट्रात परतलेल्या 1355 जणांची ओळख पटवण्यात आली आहे. त्यापैकी 1300 जणांच्या आवश्यक चाचण्या करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत किंवा त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. जे लोक स्वत:हून हजर होणार नाहीत त्यांचा आम्ही शोध घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा गृहमंत्री आनिल देशमुख यांनी दिला आहे. ही बातमी लोकमतने दिली आहे.
राज्यात परतलेल्या तबलिगींपैकी 50-55 लोक अजूनही ताब्यात आलेले नाहीत. तसंच ते स्वतःहूनही हजर झालेले नाहीत. बहुतेकांनी मोबाईल स्विच ऑफ केलेले आहेत. त्यामुळे त्यांना शोधण्यात अडचणी येत आहेत.
मोबाईल स्विच ऑफ असला तरी त्याचा ठावठिकाणा आजकाल काढता येतो. सायबर सेलच्या माध्यमातून तसे प्रयत्न केले जात आहेत. लवकरच त्याला यश येईल, असंही ते पुढे म्हणाले.
4) कोरोना व्हायरसमुळे झालेले देशातले 63 टक्के मृत्यू जेष्ठांचे
सध्या देशात कोव्हिड-19 चे 19 टक्के रूग्ण साठीच्या वरचे आहेत. पण देशात होणाऱ्या एकूण मृत्यूपैकी 63 टक्के मृत्यू हे साठी उलटलेल्यांचे झाले आहेत. ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार ज्यांना आधीपासूनच काही आजार आहेत, त्यांच्यासाठी कोरोना व्हायरस जीवघेणा ठरतोय. मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी 30 टक्के लोक हे 40 ते 60 या वयोगटातले आहेत तर फक्त 7 टक्के चाळीशीच्या आतले आहेत.
5) गेल्या 18 वर्षांत कच्च्या तेलाचे भाव सगळ्यात कमी
कोरोना व्हायरसच्या साथीमुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदावली आहे. त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवरही झाला आहे. त्याच्या मागणीत प्रचंड घट झालेली असताना, दुसरीकडे तेलउत्पादक देशांकडून सतत उत्पादन चालूच आहे.
याचा परिणाम तेलाच्या किमतीत घट होण्यात झाला आहे. ही बातमी सकाळने दिली आहे.
सध्याची तेलाची किंमत गेल्या 18 वर्षांतली सगळ्यांत कमी किंमत आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)