You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : भारत अमेरिकेची औषध पुरवठ्याची मागणी मान्य करणार?
- Author, सरोज सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
"मी भारताच्या पंतप्रधानांशी बोललो आहे. आमच्यात चांगली चर्चा झाली. त्यांनी आम्हाला मलेरियावर परिणामकारक ठरणारं औषध पाठवलं तर चांगलं होईल. पण त्यांनी तसं नाही केलं तर साहजिकच अमेरिकेकडून प्रत्युत्तरादाखल कारवाई केली जाईल." अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत हे विधान केलं.
अमेरिकेने भारताकडे हाइड्रॉक्सीक्लोरिक्वीन या औषधाची मागणी केली आहे. या मागणीवर भारत सरकारच्या मंत्रीगटाच्या आज होत असलेल्या बैठकीत विचार आणि निर्णय होऊ शकतो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या मंत्रीगटाचे अध्यक्ष आहेत. या बैठकीपूर्वी परराष्ट्रमंत्रालयाने असं म्हटलंय की, 'भारतावर अवलंबून असणाऱ्या भारताच्या शेजारी देशांना पॅरासिटामॉल आणि हाइड्रॉक्सीक्लोरिक्वीन या औषधांचा 'योग्य त्या प्रमाणात' पुरवठा केला जाईल.' वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातमीनुसार परराष्ट्रमंत्रालयाने 'कोव्हिड19 चा फटका बसलेल्या इतरही काही देशांना या औषधांचा पुरवठा केला जाईल.'
4 एप्रिलच्या सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती देशवासीयांना दिली. मात्र कोरोनाविरुद्धच्या लढाईत अमेरिकेला भारताकडून नेमकी काय मदत हवी आहे, याचा तपशील त्यांनी दिला नाही.
याबाबात माहिती ट्रंप यांनी अमेरिकेतील प्रसारमाध्यमांना दिली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर बोलताना ट्रंप म्हणाले, “माझं मोदींशी बोलणं झालं. भारतात मोठ्या प्रमाणावर हाइड्रॉक्सीक्लोरिक्वीनची निर्मिती होते. मात्र तूर्तास भारताने या औषधावर बंदी घातली आहे. भारतात या औषधाला प्रचंड मागणी आहे. त्यांची लोकसंख्याही जास्त आहे. मात्र अमेरिकेतर्फे आम्ही औषधाची मागणी केली आहे. आमच्या मागणीसंदर्भात विचार करू असं भारताने म्हटलं आहे."
कोरोना विषाणूवर अद्यापतरी कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही. अमेरिकेत हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर कोरोनाग्रस्तांच्या उपचारांसाठी केला जात आहे. जगात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण अमेरिकेत आहेत.
आकडेवारीनुसार, मंगळवार सकाळपर्यंत अमेरिकेत 3 लाख 68 हजार कोरोनाबाधित आहेत. तिथे आतापर्यंत कोरोनामुळे 10,986 लोकांचा मृत्यू झाला आहे.
भारतात या औषधाच्या निर्यातीवर प्रतिबंध
अमेरिकेने मागणी केलेल्या या औषधाच्या निर्यातीवर भारतात आधीपासूनच बंदी आहे.
25 मार्च 2020 रोजी डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड यांनी या औषधाच्या निर्यातीवर प्रतिबंध लागू केला होता. यासंदर्भात त्यांनी परिपत्रक जारी केलं होतं. अपवादात्मक परिस्थिती (सेझ किंवा पूर्ण शुल्क देण्यात आलं असेल तर) या औषधाच्या निर्यातीला परवानगी मिळू शकते.
डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि व्यापार मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात.
25 मार्चच्या या परिपत्रकात 4 एप्रिलला डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेड यांनी बदल केले. सुधारित परिपत्रकानुसार, या औषधाच्या निर्यातीवर सरसकट बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत हे औषध देशाबाहेर पाठवता येणार नाही.
हे नवं परिपत्रक पंतप्रधान मोदींसाठी अडचणीचं ठरलं आहे. या परिपत्रकामुळे मोदी मंत्रिगटाचा समूह आणि सल्लागार परिषदेच्या सल्ल्याविना या मुद्द्यावर कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत.
भारतात हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर कुठे?
भारतात ऑर्थरायटिस, मलेरिया आणि लूपस या आजारांवरील उपचारासाठी या औषधाचा उपयोग केला जातो.
हाइड्रॉक्सीक्लोरिक्वीनचा वापर कोव्हिड-19 रुग्णांची देखभाल करणारे हॉस्पिटल कर्मचारीच करू शकतात. एखाद्या घरी कोरोनासंक्रमित रुग्ण असेल तर त्याची सुश्रुषा करणारी व्यक्ती या औषधाचं सेवन करू शकते, असं भारतीय वैदयकीय संशोधन परिषदेचे (ICMR) महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितलं.
ICMRने 21 मार्चला नॅशनल टास्क फोर्स कोव्हिड-19ची स्थापना केली. त्यावेळी त्यांनी प्रसिद्धी पत्रक जारी केलं होतं. त्यानुसार कोव्हिड-19 हाय रिस्क असणाऱ्यांनीच या औषधाचं सेवन करावं.
कोरोना रुग्णांवर काम करणारे हॉस्पिटलमधील कर्मचारी हे औषध घेऊ शकतात. कोरोना रुग्ण ज्या घरी आहे त्यांची काळजी घेणारेही या औषधाचं सेवन करू शकतात.
मान्यताप्राप्त डॉक्टर प्रिस्किप्शनद्वारे हे औषध घेण्यास परवानगी देऊ शकतात. मात्र हे औषध घेणाऱ्या व्यक्तीला कोरोनाव्यतिरिक्त अन्य आजाराची लक्षणं आढळल्यास त्याने तात्काळ डॉक्टरांशी संपर्क करणं आवश्यक आहे.
भारत अमेरिकेला मदत करणार का?
भारतात हे औषध Cipla, IPCA, Intas, Wallace आणि Zydus Cadila या पाचच कंपन्या तयार करतात.
भारतात या औषधाची टंचाई किंवा कमतरता नसल्याचं इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे संचालक अशोक कुमार मदान यांनी सांगितलं.
सरकारला जेवढं आवश्यक आहे तेवढ्या प्रमाणात या औषधाचा पुरवठा या पाच कंपन्यांतर्फे केला जात आहे. आतापर्यंत भारताद्वारे आफ्रिकेतील देशांमध्ये या औषधाची निर्यात केली जायची.
सुरुवातीला ऑटोइम्यून आजारांवर उपचारांमध्ये या औषधाचा वापर केला जायचा. आता देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवरील उपचारांमध्ये या औषधाचा वापर केला जात आहे.
डॉक्टर आणि कोरोनाबाधितांच्या सेवेत असणाऱ्या लोकांसाठी या औषधाचा उपयोग केला जात आहे. राजस्थानमध्ये कोव्हिड19चा संसर्ग झालेल्या रुग्णांना हे औषध दिलं जात आहे.
राजस्थानच्या सवाई मानसिंह मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलचे प्रिन्सिपॉल डॉ. सुधीर भंडारी यांच्या मते, राजस्थान सरकारच्या वतीने या औषधाचा पुरवठा केला जात आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना नव्हे तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनाही हे औषध देण्यात येत आहे. देशात कोरोनावर उपचार प्रक्रियेचा हे औषध भाग झालं आहे.
भारताने अमेरिकेला या औषधाचा पुरवठा करावा का? यावर ते म्हणाले, भारतात या औषधाचा साठा किती आहे, येत्या काही दिवसात या औषधाची मागणी वाढू शकते का याचा विचार करून सरकारने निर्णय घ्यायला हवा.
हेही लक्षात घ्यायला हवं की देशात कोरोना संसर्गाचा फैलाव प्रचंड प्रमाणावर झालेला नाही. येत्या काही दिवसात या औषधाची मागणी वाढू शकते. कोरोना विषाणूचा संसर्ग किती दिवस होत राहील याचीही आपल्याला कल्पना नाही.
आता या औषधाची होत असलेली निर्मिती आणि पुरवठा, येत्या काही दिवसात औषधाची गरज वाढल्यानंतरही तितक्याच सक्षमतेने पुरवठा करून कंपन्या अतिरिक्त प्रमाणावर निर्मिती करू शकत असतील तर अमेरिकेला मदत करावी. मात्र आपल्या देशातील उपचारांदरम्यानची मागणी पूर्ण केल्यानंतरच.
देशात सोमवार दुपारपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 4,067 वर गेला आहे तर 109 जणांचा मृत्यू झाला आहे.
डॉ. अशोक मदान डॉ. सुधीर यांच्या वक्तव्याशी सहमत आहेत. त्यांच्या मते या औषधाची मागणी अचानक वाढली आहे. "मात्र सद्यस्थितीला आपण हे औषध निर्यात करू शकतो एवढी आपली क्षमता आहे. सरकार जसं ठरवेल त्याप्रमाणे मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. मात्र देशांतर्गत औषधाची मागणी पूर्ण करणे हे प्रथम प्राधान्य असेल," असं त्यांनी स्पष्ट केलं.
या औषधाच्या निर्मितीसाठी काही गोष्टी देशातच तयार होतात तर काही चीनमधून मागवल्या जातात. अजूनही चीनमधूनच येत आहेत. हा पुरवठा थांबवण्यात आलेला नाही, असं मदान यांनी स्पष्ट केलं.
बीबीसीने राजधानी दिल्लीतील या औषधाचा पुरवठा किती यासंदर्भात ट्रेडरशी चर्चा केली.
दिल्ली ड्रग ट्रेडर असोसिएशन, भगीरथ प्लेसचे जनरल सेक्रेटरी आशिष ग्रोवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटमध्ये हे औषध तूर्तास मिळत नाहीये. सुरुवातीला मिळत होतं परंतु आता मार्केटमधून गायब आहे.
बीबीसीने हे औषध तयार करणाऱ्या ZYDUS कंपनीशी संपर्क केला मात्र त्यांच्याकडून अद्याप उत्तर आलेलं नाही.
अमेरिकेत हाइड्रॉक्सीक्लोरिक्वीनचा वापर
अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचारांसाठी या औषधाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात आहे.
21 मार्च रोजी ट्रंप यांनी कोरोना विषाणूवर औषध मिळालं असल्याचा दावा केला होता.
ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं होतं- हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि एजिथ्रोमाइसिन यांचं एकत्रीकरण जगात गेमचेंजर ठरू शकतं. एफडीएने मोठं काम केलं आहे. थँक्यू यू. ही दोन औषधं तात्काळ वापरात आणायला हवीत, लोकांचे जीव जात आहेत.
ट्रंप यांच्या वक्तव्यानंतर 21 मार्चलाच अमेरिकेच्या सेंटर फॉर डिझिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन(सीडीसी) ने एक अहवाल प्रसिद्ध केला.
कोव्हिड19 रुग्णांसाठी अद्याप कोणत्याही औषधाला परवानगी दिलेली नाही असं सीडीसीने या अहवालात स्पष्ट केलं होतं. दरम्यान अमेरिकेसह अन्य देशांमध्ये कोव्हिड19 रुग्णांवरील उपचारांमध्ये हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर होत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं होतं.
एका छोट्या संशोधनानुसार, हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि एजिथ्रोमाइसीन यांचं एकत्रीकरण कोरोनाचा संसर्ग कमी करू शकतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)