You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: भारतातील 4 कोटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड #5मोठ्याबातम्या
आज सकाळी प्रकाशित झालेली वर्तमानपत्रे आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या 5 महत्त्वाच्या बातम्या या आहेत...
1) भारतातील 4 कोटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
कोरोना व्हायरसमुळे लादण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगांना फटका बसला असून हॉटेल, रिटेल आणि त्याच्याशी संबंधित उद्योग उद्ध्वस्त झाला आहे. या क्षेत्रातल्या जवळपास 4 कोटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. ही बातमी लोकमतने दिली आहे.
परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतरही या व्यवसायांतून मिळणाऱ्या महसुलात किमान 20 ते 25 टक्के घट होणार असून, हे व्यवसाय आणि त्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे भवितव्य अडचणीत येण्याची भीती व्यक्त केली जातेय.
देशभरातील विवध सल्लागार संस्थांच्या निरीक्षणांचा आधार घेत क्रेडाई आणि MCHI या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांनी नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात बांधकाम व्यवसायासह रिटेल, हॉस्पिटॅलीटी आणि संलग्न उद्योगांची सध्यस्थिती आणि भवितव्याचाही आढावा घेण्यात आला आहे. त्यातून ही माहिती हाती आली आहे.
रिटेलची 15 लाख स्टोअर्स देशभरात असून त्यांचा व्यवसाय तब्बल 4 लाख 75 हजार कोटी इतका प्रचंड आहे. जवळपास 6 कोटी लोकांना त्यातून रोजगार मिळतो. लॉकडाऊनमुळे हे सर्व मॉल आणि रिटेल स्टोअर्स बंद आहेत. फेब्रुवारी महिन्यांतच या स्टोअर्समधली विक्री 12 ते 16 टक्क्यांनी घटली होती. मार्च, महिन्यात ती घट तब्बल 85 टक्क्यांवर गेली आहे.
- वाचा - कोरोनाचा माझ्या जीवाला किती धोका आहे?
- वाचा -आधी कोव्हिड-19ची किट बनवली, मग बाळाला जन्म दिला
- वाचा-कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा- कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?
येत्या काही दिवसांत जवळपास 30 टक्के रिटेल स्टोअर्स बंद पडण्याची भीती असून त्यातून सुमारे 18 लाख कर्मचाऱ्यांना आपला रोजगार गमवावा लागेल अशी भीतीही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
2) कोव्हिड-19 मुळे होणाऱ्या मृत्यूंचा दर महाराष्ट्रात सर्वाधिक
महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसमुळे बळी जाण्याचे प्रमाण वाढत आहे. भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात मृत्यूचं प्रमाण जवळपास दुप्पट आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.
जागतिक पातळीवर कोरोना व्हायरसमुळे 5.40 टक्के लोकांचा बळी जातोय. अमेरिकेमध्ये हे प्रमाण 2.70 टक्के आहे.
भारतात मृत्युमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण 2.50 टक्के इतकेच आहे. मात्र, इतर राज्यांशी तुलना केल्यास महाराष्ट्रात मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण तब्बल 5 टक्के एवढं आहे.
वयोगटानुसार रुग्ण आणि मृत्यू :
- एक ते दहा वर्ष वयोगटात 12 पेशंट बाधित आहेत. पण मृत्यू एकही नाही.
- 11 ते 20 वयोगटातील मध्ये 37 पेशंट बाधित आहेत यातही मृत्यू नाही.
- 21 ते 30 या वयोगटातील मध्ये 94 पेशंट आहेत, मृत्यू एकही नाही.
- 31 ते 40 वयोगटातील मध्ये 102 पेशंट बाधित आहेत, त्यातल्या एका पेशंटचा मृत्यू झालाय.
- 40 ते 50 वयोगटातील मध्ये 109 पेशंट बाधीत त्यातल्या चार पेशंटचा मृत्यू झालाय.
- 51 ते 60 वयोगटातले 60 पेशंट बाधित आहेत आणि त्यातल्या चार जणांचा मृत्यू झालाय.
- 61 ते 70 वयोगटातल्या 58 जणांना याची बाधा झाली आहे. त्यातल्या 12 जणांचा बळी गेला.
- 71 ते 80 या वयोगटातल्या 14 रुग्णांपैकी तीन जणांचा मृत्यू झालाय.
- 81 ते 90 या वयोगटात मधल्या चार रुग्णांपैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
3) ओमर अब्दुल्लांनी केलं उद्धव ठाकरे यांचं कौतुक
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी उद्धव ठाकरे करत असेलेल्या कामाची अब्दुल्लांनी स्तुती केलीय.
उद्धव ठाकरेंचं काम पाहून मला सुखद धक्का बसला अशा आशयाचं ट्वीट ओमर अब्दुल्ला यांनी केलं आहे. ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.
कोव्हिड-19 रोगाच्या साथीला हाताळणं, तसंच या दरम्यान राज्यातल्या जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देणं यावरून उद्धव ठाकरे यांचं सोशल मीडियावर कौतुक होताना दिसत आहे.
4) लॉकडाऊनमुळे घटलं प्रदूषण
लॉकडाऊनमुळे रस्त्यांवरची वर्दळ कमी होऊन महाराष्ट्रातील विविध शहरांमधलं प्रदूषण कमी झालं आहे. त्यामुळे राज्यातली हवा शुद्ध झाली आहे, असा अहवाल सफर या संस्थेने दिला आहे. ही बातमी दिव्य मराठीने दिली आहे.
या काळात रस्त्यावरून नगण्य वाहनं फिरत असल्याने उष्णतेचे उत्सर्जन कमी होऊन ओझोन पातळी देखील सुधारतेय.
पुणे शहरात प्रदूषणाच्या प्रमाणात 55 टक्क्यांनी घट झाली आहे. पुणे शहराच्या मुख्य अंतर्गत भागात सूक्ष्म कणांचे प्रमाण कमी झाले आहे.
मुंबईच्या बीकेसीत ओझोनची स्थिती अतिशय चांगली आहे. वरळी, मालाड, अंधेरी, भागात देखील ओझोन पातळी स्थिर होत आहे.
5) राज्य उत्पादन शुल्कचे कार्यालय फोडून दारूची चोरी
राज्य उत्पादन शुल्क कार्यालय फोडून टाळेबंद करून ठेवलेल्या एक लाख 41 हजार रुपयांच्या देशी-विदेशी दारूची चोरी झाल्याची घटना सातारा जिल्ह्यातल्या वाई इथे घडली आहे. यासंबंधीचं वृत्त लोकसत्ताने दिलं आहे.
उत्पादन शुल्क विभागाने वाई, पाचगणी व महाबळेश्वर परिसरात कारवाईत जप्त केलेल्या देशी-विदेशी दारूचा साठा या कार्यालयात ठेवण्यात आला होता. चोरांनी कार्यालयाचा मुख्य दरवाजा तोडून कार्यालयात ठेवलेल्या देशी दारूच्या सुमारे 900 भरलेल्या बाटल्या आणि 67 हजार 480 रुपयांच्या विदेशी दारूच्या बाटल्या असा एक लाख 41 हजार 480 रुपयांचा मालाची चोरी झाल्याची तक्रार संबधित कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे.
दुसऱ्या घटनेत सैदापूर (ता. सातारा) येथील निकी बंट्स बिअर बार फोडून चोरट्यांनी दारूच्या बाटल्या, सीसीटीव्ही डीव्हीआर, मॉडम आणि रोख रक्कम असा सुमारे 71 हजार 440 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. 26 मार्चपासून हा बार बंद आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)