कोरोना व्हायरस : राज ठाकरे - पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना फोडून काढा

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

कोरोना व्हायरसच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन गांभीर्यानं घेण्याचं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं.

आपण शिस्त पाळली नाही तर मोठ्या आर्थिक संकटाला आपल्याला सामोरं जावं लागेल, असंही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेणबत्त्या लावण्याच्या आवाहनावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, "पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे लोक काळोख करतील, मात्र त्यानं कोरोनावर परिणाम होणार असेल तर होवो. पण मेणबत्त्या, टॉर्च यापेक्षा आशेचा किरण दिसला असता तर बरं झालं असतं."

निजामुद्दीनमधील तबलीगी जमातच्या कार्यक्रमावर टीका करताना ते म्हणाले, "मरकजचा प्रकार घडला, असल्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे."

यावेळी राज ठाकरेंनी वसईतील मरकजचा कार्यक्रम रद्द करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदनही केलं.

राज ठाकरे यांच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे :

  • डॉक्टर जीव धोक्यात घालून काम करतायत... सर्व यंत्रण जीव धोक्यात घालून काम करतेय आणि लोकांना गांभीर्य येत नाही? लोकांना हात जोडून विनंती आहे की, हा लॉकडाऊन गांभीर्यानं घ्या, नाहीतर लॉकडाऊनचे दिवस वाढल्यास यंत्रणेवरील ताण वाढेल, उद्योगधंदे बंद होतील, नोकऱ्या जातील
  • उद्योगधंद्यांना मदतनिधी न दिल्यास नोकऱ्यांवर परिणाम होईल.
  • शेतमालाचा पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचे आभार मानला पाहिजेत. रेशन, भाजी आणण्यापासून अनेक प्रश्न लोकांना असतील, मात्र सरकार सर्व उपलब्ध करून देत आहे.
  • सरकारवर आरोप करण्याची वेळ नाही, मात्र भाजी वाटप किंवा इतर ठिकाणी नीट यंत्रणा लावणं आवश्यक आहे.
  • धान्यांचा काळाबाजार करणाऱ्यांना फोडून काढलं पाहिजे.
  • पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांविरोधात कडक पावलं उचलली पाहिजेत, त्यांना फो़डून काढलं पाहिजे, त्याबाबतचा संदेश समाजात गेला पाहिजे
  • कुणामध्ये लक्षणं आढळली तर लोकांनी स्वत:हून पुढे येऊन सांगितलं पाहिजे.

दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनी आरोग्य विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, "आरोग्य खात्यावर कमी लक्ष दिल्यानं आताची स्थिती ओढवलीय. आपली आरोग्य व्यवस्था किती कचाकड्याची आहे, हे आता दिसतंय.

"लोकांची आजच्या घडीला मोठी जबाबदारी आहे, केवळ यंत्रणेला दोष देऊन चालणार नाही. नुसतं सुशिक्षित असून चालत नाही, सूज्ञ सुद्धा असायला हवं," असंही ते शेवटी म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)