You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : मुंबईतील चेंबुरमधील 3 दिवसांच्या बाळाची कोव्हिड-19 चाचणी निगेटिव्ह - #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्र आणि माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या पाच महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला संक्षिप्त आढावा.
1) चेंबुरमधील 3 दिवसांच्या बाळाची चाचणी निगेटिव्ह
मुंबईतील चेंबुर येथील खासगी रुग्णालयात प्रसूती झालेली महिला आणि तिच्या तीन दिवसांच्या बाळाला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर हे रुग्णालय सिल करण्यात आलं.
मात्र, कस्तुरबा रुग्णालयात करण्यात आलेल्या पहिल्या चाचणीत या नवजात बाळाचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. ईटीव्ही भारतनं ही बातमी दिलीय.
- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
चेंबुर नाका येथील साई रुग्णालयात एका रुग्णाला कोरोना व्हायरस झाल्यानं त्याला दुसरीकडे हलवण्यात आले. मात्र, ज्या वॉर्डमध्ये हा रुग्ण होता, त्याचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं नव्हतं. धक्कादायक म्हणजे, याच वॉर्डात या रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलेला बाळासह ठेवण्यात आलं. त्यामुळं त्यांनाही लागण झाली.
मात्र, त्यानंतर करण्यात आलेल्या चाचणीत बाळाचा अहवाल निगेटिव्ह आलाय, तर महिलेचा अहवाल अद्याप आलेला नाही.
2) वसईतही नियोजित होता 'तबलिगी जमात सोहळा'
मुंबईजवळील वसईतही तबलिगी जमातचा सोहळा 14-15 मार्च रोजी नियोजित होता. मात्र, पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी या कार्यक्रमाची परवानगी वेळीच रद्द केली होती. लोकमतनं ही बातमी दिलीय.
दिल्लीतल्य निजामुद्दीन इथं तबलिगी जमातच्या मरकजला हजेरी लावलेल्या अनेकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं उघड झालंय. तसंच, हे रुग्ण देशाच्या विविध भागात गेल्यानं अनेक ठिकाणी विषाणू पसरल्याची भीती व्यक्त केली जातेय. या पार्श्वभूमीवर वसईतील सोहळा वेळीच रोखल्यानं पालघरच्या पोलीस अधीक्षकांचं कौतुक केलं जातंय.
दुसरीकडे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय की, "निजामुद्दीनसारखे कुठलेही कार्यक्रम महाराष्ट्रात आयोजित होऊ देणार नाही. त्यासाठी परवानगीच दिली जाणार नाही."
तसंच, "लोकांनी स्वत:हून घरातच राहावं, अन्यथा हॉस्पिटल क्वारंटाईन व्हावं लागेल. शिवाय, लॉकडाऊनचे नियम मोडून बाहेर फिरल्यास तुरुंगात जावं लागेल," असा इशाराही अजित पवार यांनी दिलाय. पुणे मिररनं ही बातमी दिलीय.
3) महाराष्ट्रातील 86 टक्के रुग्णांना कोणतीच लक्षणं नाहीत
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या एकूण रुग्णांपैकी 86 टक्के रुग्णांमध्ये कुठलीच लक्षणं आढळली नसल्याचं वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालातून समोर आलंय. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
वैद्यकीय शिक्षण विभागानं राज्यातील 4,751 रुग्णांचं सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणाच्या अहवालात असं मत मांडण्यात आलंय की, लक्षणं नसलेल्या व्यक्तीच समाजात विषाणूचा प्रसार करत आहेत.
"86 टक्के जणांमध्ये लक्षणं दिसत नाहीत आणि रुग्णांची वाढती संख्या यावरून अनेक जणांमध्ये विषाणू कार्यरत असल्याचे नाकारता येत नाही. अशी लक्षणं नसलेल्या आणि बाधित व्यक्ती विषाणूचा प्रसार करत आहेत, हे वास्तव आहे," फुप्फुसरोगतज्ज्ञ डॉ. अरविंद काटे यांनी लोकसत्ताला हे सांगितलं आहे.
4) नियोजनशून्यतेमुळं लोकांन त्रास - सोनिया गांधी
"कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतात लॉकडाऊनची आवश्यकता होतीच. मात्र, त्याचं योग्य नियोजन केलं नसल्यानं मजूर आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं," अशी टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर केलीय. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय.
सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंद्वारे चर्चा केली. त्यात त्यांनी कोरोना व्हायरस, लॉकडाऊन यासंदर्भात आपली मतं मांडली.
त्या पुढे म्हणाल्या, "डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी साहित्य पुरवलं पाहिजे. कोरोनावरील उपचारासाठीची रुग्णालयं, तेथील बेडची संख्या आणि इतर सुविधांची नीट माहिती द्यायला हवी होती."
सोनिया गांधी यांच्या टीकेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिलंय. कोरोना व्हायरसच्या उद्रेकावरूनही काँग्रेस गलिच्छ राजाकारण करत असल्याची टीका अमित शाह यांनी केली.
5) AIIMS मधील डॉक्टर आणि त्यांच्या गरोदर पत्नीला 'कोरोना'ची लागण
नवी दिल्लीस्थित ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) मधील वरिष्ठ डॉक्टर आणि त्यांच्या 9 महिन्यांच्या गरोदर असलेल्या पत्नीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
या डॉक्टर दाम्पत्याला अलगीकरण करण्यात आलं आहे. न्यूज 18 नं ही बातमी दिलीय.
संसर्गाचा स्रोत अद्याप कळू शकलेला नसला, तरी या डॉक्टर दाम्पत्याचा परदेशी प्रवासाचा इतिहास नसल्याचं स्पष्ट झालंय. हे वरिष्ठ डॉक्टर AIIMS च्या शरीरविज्ञान विभागात कार्यरत आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)