कोरोना व्हासरस : मुंबईत तीन दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण - #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. मुंबईत तीन दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण
मुंबईत चेंबूर नाका इथल्या एका खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केलेल्या एका महिलेला तसंच तिच्या नवजात मुलीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलंय.
या महिलेच्या पतीने हॉस्पिटल प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. सदर महिलेच्या प्रसूतीनंतर दुसऱ्या दिवशी रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांची चाचणी केली गेली त्यात एक कर्मचारी कोरोनाग्रस्त असल्याचं समोर आलं.
खासगी लॅबमध्ये पत्नी आणि बाळाची तपासणी केल्यानंतर या दोघांनाही लागण झाल्याचं या व्यक्तीने सांगितलंय. लोकमत ने ही बातमी दिली आहे.
2. तबलीगी जमातचे लोक डॉक्टरांवर थुंकल्याचा आरोप
दिल्लीच्या मरकज बिल्डिंगमध्ये तबलीगी जमातच्या शिबिरासाठी जमलेल्या अनेकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलंय.
यातल्या 167 सदस्यांना दिल्लीच्या उत्तर रेल्वेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये हलवलं गेलं मात्र त्यावेळी त्यांनी डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन केलं असं उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी सांगितलंय.

फोटो स्रोत, Getty Images
क्वारंटाईन सेंटरमध्ये आल्यापासून हे लोक असभ्य वागत होते, जेवणाच्या अवास्तव मागण्याही करत होते. हे लोक सगळीकडे थुंकत होते आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर तसंच कर्मचाऱ्यांच्या अंगावरही ते थुंकले अशी माहिती कुमार यांनी दिली. लोकसत्ता ने याबद्दल बातमी दिली आहे.

कोरोनाबद्दल अधिक माहिती-
- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा- कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कलम 144 म्हणजे नेमकं काय?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?

3. पंतप्रधानांची आज मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह व्हीडिओ कॉन्फरन्स करणार आहेत. अनेक राज्यांचे केंद्राकडून येणारे पैसे थकले आहेत त्यामुळे अनेक आवश्यक कामे पैशाच्या अभावी अडून आहेत.
महाराष्ट्र, पंजाब, राजस्थानसह अनेक राज्यांच्या सरकारांनी यापूर्वीच पंतप्रधानांना पत्र लिहून आपल्या मागण्या कळवल्या आहेत. आज व्हीडिओ कॉन्फरन्सदरम्यान काही मुख्यमंत्री हे मुद्दे प्रत्यक्ष उपस्थित करतील अशी शक्यता वर्तवली जातेय.

फोटो स्रोत, Getty Images
परराज्यातल्या कामगारांचं स्थलांतर रोखण्याची आणि त्यांची पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी पूर्णतः राज्य सरकारांवर आहे, अशात केंद्राकडून आर्थिक सहकार्य मिळत नसल्याने परिस्थिती अवघड होत चालल्याचं काही राज्यांनी बोलून दाखवलंय असा दावा इंडियन एक्सप्रेस ने दिलेल्या बातमीत केला आहे.
4. धान्य पोहोचवण्याची धावाधाव, सिलेंडर होणार स्वस्त
लॉकडाऊन दरम्यान अन्नधान्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालीवर अवलंबून असणाऱ्या गोरगरिबांची परवड होऊ नये यासाठी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची विविध राज्यांना धान्य पोहोचवण्याची लगबग सुरू आहे.
मार्च-एप्रिल या काळात FCI सर्वसाधारणपणे गहू खरेदी करण्याच्या प्रक्रियेत असते. पण आताच्या परिस्थितीत बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये, जिथे 'रेशन'वर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या खूप मोठी आहे तिथे अन्नधान्याचा पुरवठा करण्यात यंत्रणा व्यग्र आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मंगळवारी एका दिवसात FCI ने 1.6 दशलक्ष टन तांदूळ आणि गहू रेल्वेमार्गे विविध राज्यांकडे धाडला.
24 मार्चला केंद्र सरकारने शिधापत्रिकेवर किराणा घेणाऱ्यांना नेहमीच्या कोट्यावर अतिरिक्त 5 किलो धान्य मिळेल अशी घोषणा केली. राज्यांना 15 एप्रिलपर्यंत पहिल्या टप्प्यातल्या धान्याचं वाटप करायचं आहे. टाइम्स ऑफ इंडिया ने ही बातमी दिली आहे.
त्याचवेळी विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. सिलेंडरच्या किमतीत तेल कंपन्यांनी मोठी कपात केल्यामुळे दिल्ली आणि मुंबईत आता विनाअनुदानित गॅस सिलेंडर जवळपास 62 रुपयांनी स्वस्त झाला आहे. सकाळ ने ही बातमी दिली आहे.
5. कोव्हिड-19 मुळे यंदा टेनिस चाहते 'विम्बल्डन'ला मुकणार
टेनिस विश्वात मानाचं स्थान असलेल्या विम्बल्डन स्पर्धेचं यंदाचं आयोजन कोव्हिड 19 च्या साथीमुळे रद्द करण्यात आलं आहे. ऑल इंग्लंड लॉन टेनिस अँड क्रोके क्लब (AELTC) द्वारे या स्पर्धेचं आयोजन केलं जातं, त्यांनी बुधवारी ही घोषणा केली.

फोटो स्रोत, Getty Images
दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच विम्बल्डनचं आयोजन रद्द करावं लागलं आहे. 134 वी विम्बल्डन टेनिस स्पर्धा आता 28 जून ते 11 जुलै 2021 या दरम्यान खेळवली जाईल. हिंदुस्तान टाइम्स मध्ये याबद्दलचं वृत्त आहे.
फ्रेंच ओपन स्पर्धेचं वेळापत्रक यापूर्वीच बदललं आहे. नेहमीप्रमाणे ही स्पर्धा यंदा मे महिन्यात न होता सप्टेंबरमध्ये होईल असं आयोजकांनी सांगितलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























