You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : देशात आलेल्या 15 लाख लोकांवर नजर ठेवा - केंद्र सरकारचे आदेश #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. देशात आलेल्या 15 लाख लोकांवर नजर ठेवा
18 जानेवारी ते 23 मार्चदरम्यान विदेशातून भारतात आलेल्या 15 लाख लोकांवर नजर ठेवा, असे आदेश केंद्र सरकारनं सर्व राज्यातल्या सरकारांना दिले आहेत. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.
या 15 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे की नाही, याची काटोकोरपणे तपासणी करा, असेही आदेश देण्यात आले आहेत.
यापैकी अनेक जण होम क्वारंटाईनचा भाग होते, पण केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, यात काहीएक गॅप राहिल्याकारणानं यातून सुटले, अशा लोकांची तपासणी करण्यात यावी.
यातील काही जणांनी 14 दिवसांचं क्वारंटाईन पूर्ण केलं असून ते सुरक्षित आहेत. पण, इतरांमुळे कदाचित कोरोना पसरू शकतो, असंही सरकारनं म्हटलंय.
- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
2. ...तर आमची मैदानं खुली करू - MCA
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबई क्रिकेट संघटनेनं मुख्यमंत्री सहायता निधीला 50 लाखांची मदत केली आहे. परिस्थिती बिघडल्यास आपल्या अखत्यारीत येणारी मैदानं वैद्यकीय सुविधेसाठी खुली करण्याची तयारीही MCA ने दाखवली आहे. स्क्रोलनं ही बातमी दिली आहे.
याशिवाय अनेक क्रीडापटूंनी समोर येत कोरोना व्हायरसविरोधातील लढ्यात आर्थिक योगदान दिलं आहे.
यामध्ये हिमा दासने आपला एका महिन्याचा पगार आसाम सरकारच्या आरोग्य विभागाला दिला आहे.
आतापर्यंत पी.व्ही.सिंधू, गौतम गंभीर, बजरंग पुनिया, इरफान-युसूफ पठाण, महेंद्रसिंह धोनी, सानिया मिर्झा, सचिन तेंडुलकर या आजीमाजी खेळाडूंनी करोनाविरुद्ध लढ्यात मदत केली आहे.
3. पोलिसांच्या भीतीने पळणाऱ्या तरुणाचा मृत्यू
पोलिसांचा गाडी आल्याची भीती बाळगून धावत सुटलेल्या पनवेलमधील तरुणाचा मृत्यू झाला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे. राजेंद्र अभिमन्यू पाटील असं (38) तरुणाचं नाव आहे.
गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास राजेंद्र त्याच्या काही मित्रांसोबत नाक्यावर उभा होता. पोलिसांची गाडी आल्याचं कळताच नाक्यावरील सर्व तरुणांनी धूम ठोकली. पोलीस माग येत असल्याच्या संशयाने सैरावैरा पळणाऱ्या तरुणांमधील राजेंद्रने एका इमारतीमध्ये प्रवेश केला.
या इमारतीमधील पायऱ्यांवरुन राजेंद्रचा तोल गेल्यानं तो डोक्यावर पडला. गंभीर जखमी अवस्थेतील राजेंद्रला तातडीने पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तोपर्यंत राजेंद्र यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. राजेंद्र याचा मृत्यू जखमी झाल्यानंतर हदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं वैद्यकीय अहवालात डॉक्टरांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, पोलीस आले म्हणून पळ काढणे आणि त्यानंतर स्वत:चा जीव गमावणे हे करोनाच्या प्रसारापेक्षाही धोकादायक आहे. नागरिकांनी घरीच सुरक्षित रहावे, असं आवाहन पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी केलं आहे.
केंद्र सरकारने संपूर्ण देशभर 3 आठवड्यांचा लॉकडाऊन लागू केला आहे. असं असतानाही संगमनेर शहरातील नाटकी परिसरातील इस्लामपुरा मशिदीत नमाजासाठी 29 जण एकत्र जमल्यानं पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
4. लॉकडाऊनमुळे गरिबांना सर्वाधिक फटका - रघुराम राजन
कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी केवळ लॉकडाऊनच पुरेसं नाही, असं मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
ते म्हणाले, "लॉकडाऊन ही एक मोठीच चिंतेची बाब आहे. कारण लॉकडाऊनमुळे लोक कामापासून दूर राहतील. मात्र, त्यामुळे ते विलग स्थळी राहतीलच, असे नाही. काही लोक एखाद्या झोपडपट्टीतीलही असतील. घरी राहिल्याने त्यांच्या निवास परिसरात गर्दी वाढून विषाणू प्रसाराचा धोका वाढेल."
लॉकडाऊन हे गरिबांसाठी अधिक कठीण ठरणार आहे. कोरोना विषाणूविरोधी लढ्यात पायाभूत सुविधांची कमतरता ही एक अडथळा बनू शकते, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, देशातील एटीम मशीन्स आणि बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात पैसा असल्याचं अर्थ मंत्रालयानं शुक्रवारी म्हटलं आहे.
त्यामुळे कोणत्याही बँकेची शाखा बंद करण्याचा विचार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.
5. हापूसच्या 1 कोटी पेट्या कोकणात पडून
कोरोना संकटामुळे देशभरात 'लॉकडाऊन' झाल्याच्या फटका हापूस आंबा बागायतदारांना बसला आहे. हापूसची आवक पूर्णपणे रखडली असून हापूसच्या 1 कोटीहून अधिक पेट्या सध्या कोकणात पडून आहेत. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
हापूस आंबा 15 मार्चनंतर बाजारात येतो आणि 15 मेपर्यंत विक्रीस असतो. यादरम्यान त्याची निर्यातही होते. पण, निर्यातीपेक्षा मुंबई, पुणे व नाशिक येथे आंब्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे.
कोकणात साधारण 4 लाख एकरावर हापूसचे उत्पादन घेतले जाते. त्यावर जवळपास 3 ते 4 कोटी डझन आंबा तयार होतो. त्याच्या 1 कोटी पेट्या मुंबई, पुणे व नाशकात विक्री करण्यासाठी बागायतदारांनी सज्ज केल्या आहेत. पण त्यांना ना महाराष्ट्रात मागणी आहे ना देशात आणि परदेशात. त्यामुळे या पेट्या तशाच पडून आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)