कोरोना व्हायरस : 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज- निर्मला सीतारामन

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 50 लाख रुपयांचं विमा संरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.

कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर त्याचा आर्थिक फटका नागरिकांना बसू नये, या दृष्टीकोनातून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आले.

निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणा खालीलप्रमाणे

  • गरीबांसाठी 1 लाख 70 हजार कोटींच्या पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा
  • निर्मला सीतारामन यांनी देशातल्या गरीबांसाठी 1 लाख 70 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे.
  • तसंच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येकी 50 लाख रुपयांचा विमा जाहीर केला.
  • यामध्ये डॉक्टर, नर्सेस, आशा सेविका, पॅरामेडिकल स्टाफ यांचा समावेश आहे.
  • पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरीबांना अन्न आणि आर्थिक मदत मिळणार.
  • शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपयांची रक्कम देणार.
  • एप्रिल महिन्यात पहिल्या आठवड्यात ही रक्कम जमा होईल. सुमारे 8 कोटी शेतकऱ्यांना त्याची मदत होणार.
  • 20 कोटी महिला जनधन खातेधारकांना पुढील तीन महिन्यांसाठी दरमहा 500 रुपये मिळणार.
  • मनरेगाची मजुरी प्रतिदिन 182 वरून 202 रुपयांवर जाणार.
  • उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या महिलांना गॅस सिलिंडर मिळतो त्यांना पुढचे तीन महिने सिलिंडर मोफत देण्यात येतील. जवळपास आठ कोटी महिलांना याचा लाभ मिळेल.
  • महिला बचत गटांनाही आर्थिक मदत मिळेल. देशात 63 लाख बचत गट आहेत. या बचत गटांना विनातारण दहा लाख रुपयांचं कर्ज मिळत होतं. ही मर्यादा वाढविण्यात आली आहे.
  • महिला बचत गटांना 20 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज विनातारण मिळणार.

संघटित क्षेत्रातील मजुरांसाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या महत्त्वाच्या घोषणा

  • 100 पेक्षा कमी कामगार आहेत आणि पंधरा हजार पेक्षा कमी ज्यांचा पगार कमी आहे, अशा उद्योगांना सरकारकडून मदत. नोकरी करणाऱ्यांचा 12 टक्के आणि नोकरी देणाऱ्यांचा 12 टक्के EPF सरकार देणार आहे.
  • EPF स्किमच्या पैसे काढण्यासाठीच्या तरतूदींमध्येही बदल
  • 80 लाख मजूर आणि 4 लाख उद्योगांना याची मदत होण्याची आशा.

बांधकाम क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आलेल्या घोषणा

बिल्डिंग अँड अदर वर्कर्स वेलफेअर फंड उपलब्ध असतो. सध्या या फंडामध्ये 31 हजार कोटी रुपये आहेत. राज्य सरकारांना या फंडाचा वापर करण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून बांधकाम मजुरांना या अडचणीच्या काळात मदत मिळेल.आरोग्य तपासणी, औषधोपचार यांसाठी जिल्हा वैद्यकीय निधी असतो. राज्य सरकारकडे त्यासंबंधीचे अधिकार आहेत. त्यांनी हा निधी वापरावा, अशी सूचना आम्ही त्यांना करतो. सर्व घोषणांची अंमलबजावणी तातडीनं आजपासून सुरू होणार आहे.

योग्य दिशेनं टाकलेलं पाऊल- राहुल गांधी

सरकारने जाहीर केलेलं पॅकेज हे योग्य दिशेनी टाकलेलं पहिलं पाऊल आहे. असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. या देशातील शेतकरी, कष्टकरी, रोजनदारीवर काम करणारे मजूर, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या लॉकडाउनची सर्वाधिक झळ बसत आहे. त्यांचं ऋण देशावर आहे असं राहुल गांधी म्हणाले.

हे नक्की वाचा

हे आवर्जून पाहा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)