You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : गायिका कनिका कपूर हॉस्पिटलसाठी ठरतीये डोकेदुखी
ज्या गायिका कनिका कपूरमुळे लखनौ आणि अगदी संसदेपर्यंत कोरोनाची धास्ती पसरली, तीच कनिका कपूर आता तिथल्या हॉस्पिटलसाठी डोकेदुखी ठरत आहे.
कनिकाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला लखनौमधील संजय गांधी पीजीआय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
पण दुसऱ्याच दिवशी हॉस्पिटल प्रशासनावर अशी वेळ आली, की त्यांना कनिकाला उपचारासाठी सहकार्य करा, ही विनंती पत्रकाद्वारे करावी लागली.
कनिकाला इथे सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, असं असतानाही ती एखाद्या रुग्णासारखं वर्तन न करता एखाद्या सेलिब्रिटीसारखं वावरत आहे, असं या पत्रकात म्हटलं आहे.
- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
पीजीआयचे संचालक आर. के. धीमान यांनी बीबीसीला सांगितलं, "आम्ही हॉस्टिलमध्ये त्यांना सगळ्या सुविधा दिल्या आहेत. त्यांना एसी रूम दिली आहे, ज्यात टॉयलेट-बाथरूम आहे. त्यांच्या रुमची साफसफाई केली जात आहे. तसंच टीव्हीसुद्धा दिला आहे.
"मला घरचं जेवण लागेल, असं कनिकाचं म्हणणं होतं. पण उपचारादरम्यान हे शक्य नव्हतं. कनिकाच्या मागणीनुसार तिला इथं ग्लूटन-फ्री पदार्थ दिले जात आहेत, ज्यासाठी किचनमध्ये स्वतंत्र व्यवस्था केली आहे. इथून पुढेही त्यांची अशीच देखभाल केली जाईल, पण इथं आपण एक रुग्ण आहोत, सेलिब्रिटी नव्हे, हे तिनंही लक्षात घ्यायला हवं."
कनिकाचा आरोप
पीजीआय हॉस्पिटलमध्ये गुन्हेगारासारखं वागवलं जात असल्याचा आरोप कनिकानं एका न्यूज वेबसाईटशी बोलताना केला होता.
कनिकानं म्हटलं होतं, "हॉस्पिटलमधील खोलीत दुर्गंध येतो आणि डासही आहेत. मी डॉक्टरांना रूम स्वच्छ करायला सांगितल्यावर त्यांनी म्हटलं, की हा दवाखाना आहे, फाईव्ह स्टार हॉटेल नाही."
याप्रकरणी कनिकाच्या कुटुंबीयांशी संवाद साधण्याचा प्रयत्न बीबीसीनं केला, पण तो होऊ शकला नाही. असं असलं तरी कनिकाने केलेले आरोप सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
यामुळेच पीजीआयला स्पष्टीकरण द्यावं लागल्याचं म्हटलं जात आहे. कनिकाला विशिष्ट सुविधा देण्यासाठी काही मोठे लोक हॉस्पिटलवर दबाव आणत आहेत, असं पीजीआयच्या एका डॉक्टरांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं.
नेमकं प्रकरण काय?
गायिका कनिका कपूरला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं शुक्रवारी (20 मार्च) समोर आलं. कनिका युकेवरून परतली होती. मात्र तरीही ती लखनौ आणि कानपूरमधील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाली होती.
लखनौमधील कार्यक्रमात राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचे पुत्र खासदार दुष्यंत सिंग, उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री जय प्रताप सिंग उपस्थित होते.
कनिकाला कोरोना झाल्यामुळे लखनौ शहरात भीतीचं वातावरण पसरलं. कारण कनिकासोबत जी माणसं कार्यक्रमाला हजर होती, त्यांनी इतर ठिकाणाही कार्यक्रमांना उपस्थिती लावली होती.
करोनाविषयीची माहिती लपवल्यामुळे शुक्रवारी रात्री कनिकाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली.
"सरोजिनी नगर पोलीस स्टेशनमध्ये कनिकाविरोधात आयपीसीच्या कलम 269 तसंच अन्य 2 कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखनौतील मुख्य चिकित्सा अधिकाऱ्यांनी ही एफआयआर दाखल केली आहे," अशी माहिती लखनौचे पोलीस आयुक्त सुजीत पांडे यांनी दिली.
आपल्या संसर्गाबद्दल कनिकानं सोशल मीडियावर माहिती देताना म्हटलं, "मी विमानतळावर नियमित प्रक्रियेला सामोरं जात असताना माझ्यामध्ये कोरोनाचे लक्षणं आढळले. त्यामुळे मग मी स्वत: टेस्ट केली आणि कुटुंबीयांसोबत आयसोलेशनमध्ये राहिले."
हे प्रकरण समोर आल्यानंतर लखनौमध्ये अनेक ठिकाणी बाजार, कार्यालयांना 23 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय सगळे रेस्टॉरंट्स, धाबे आणि कॅफेही 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)