कोरोना व्हायरसः कनिका कपूर विरुद्ध लखनौमध्ये गुन्हा दाखल, अनेक खासदार गेले 'सेल्फ आयसोलेश'मध्ये

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

'बेबी डॉल' आणि 'चिट्टियाँ कलाईयाँ वे' सारखी गाणी गाणारी कनिका कपूर हिच्याविरुद्ध आता हलगर्जीपणासाठी लखनौमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालेल्या कनिकामुळे उत्तरप्रदेशात आणखी तीन जण पॉझिटिव्ह आढळले, असं ANI वृत्तसंस्थेने ट्वीट केलं आहे.

गेले चार दिवस आपल्याला फ्लू होता, मात्र त्यानंतर तपासणीत कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं, असं कनिकानेच एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सांगितलं.

आता तिला आणि तिच्या कुटुंबाला क्वारंटाईन करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. आपण इतरांप्रमाणे विमानतळावर तपासणीही केली होती, असं तिनं सांगितलं. मात्र तिने ही तपासणी चुकवल्याचा आरोप तिच्यावर होतो आहे.

कनिका राहात असलेल्या सोसायटीला सील करण्यात आले आहे. तसेच लखनौ शहरातील सर्व दुकानं, खासगी आस्थापनांना 23 मार्चपर्यंत कार्यालयं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोना व्हायरसची संसदेलाही लागण?

कनिका कपूरच्या सोसायटीमध्ये 700 फ्लॅट्स आहेत. लखनौमधले अनेक प्रतिष्ठित लोक इथं राहातात.

आता इथं राहाणाऱ्या लोकांची तपासणी करण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे. यातील अनेक लोक कनिकानं दिलेल्या पार्टीत सहभागी झाले होते. माजी खासदार अकबर अहमद डंपी यांच्या घरी ही पार्टी झाली होती.

या पार्टीत राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचे पुत्र खासदार दुष्यंत सिंह सहभागी झाले होते. त्यामुळे कनिका कपूरला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं तिने जाहीर केल्यानंतर वसुंधराराजे यांनी आपणही काही काळासाठी सेल्फ आयसोलेशनमध्ये जात असल्याचं ट्वीट केलं.

या पार्टीमध्ये काँग्रेसचे नेते जितिन प्रसाद आणि उत्त प्रदेशचे आरोग्यमंत्री जयप्रताप सिंह हे सुद्धा सहभागी झाले होते, असे सांगण्यात येते.

मात्र दुष्यंत सिंह यांची संसेदत भेट घेतल्यानंतर अनेक खासदारांनी स्वतः अलगीकरणाचा निर्णय घेतला आहे. यात उत्तर प्रदेशच्या अपना दलच्या नेत्या अनुप्रिया पटेल तसंच तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ'ब्रायन हेसुद्धा आहेत.

तसंच, दोन दिवसांपूर्वी खुद्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या खासदारांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली होती. इथेही दुष्यंत सिंह हजर असल्यामुळे आता आणखी भीती व्यक्त केली जात आहे.

जनता कर्फ्यू

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाला उद्देशून भाषण करताना "कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी 22 मार्च रोजी लोकांनी घराबाहेर पडू नये. हा जनतेने जनतेद्वारे स्वतःवर लादलेला कर्फ्यू, अर्थात जनता कर्फ्यू असेल," असं ते म्हणाले.

"22 मार्चला रविवारच्या दिवशी आपण सगळ्यांनी संध्याकाळी 5 वाजता सायरनचा आवाज होईल, तेव्हा आपण दारात, खिडकीत, बाल्कनीत उभे राहून सरकारी कर्मचाऱ्यांचे, डॉक्टरांचे आभार मानूया. टाळ्या वाजवून, घंटी वाजून आभार मानूया," असंही पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

यावर प्रतिक्रिया देताना टोपे यांनी म्हटलं, "पंतप्रधान नरेंद्र मोदीनी 22 तारखेला जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. सध्याची स्थिती पाहता हा योग्य निर्णय आहे. महाराष्ट्र राज्यातल्या नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद देऊन कर्फ्यू पाळायला पाहिजे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)