कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशात 54 हजार लोक सामूहिक देखरेखीखाली : #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. 'कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 54 हजार लोक सामूहिक देखरेखीखाली'

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी 54 हजार लोकांना सामूहिक देखरेखीखाली ठेवण्यात आले असून त्यांच्या आरोग्यासंदर्भात त्या-त्या विभागातल्या विलगीकरण कक्षांमधील वैद्यकीय कर्मचारी लक्ष ठेवून असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंगळवारी (17 मार्च) राज्यसभेत दिली. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

कोरोनावर लस शोधण्याचे प्रयत्न जगभरात सुरू असून त्याची अद्ययावत माहिती राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन केंद्रातील तज्ज्ञ घेत आहेत. तसेच, संशोधन प्रक्रिया होत असलेल्या इतर संस्थांशीही ते संपर्क ठेवून आहेत, असंही हर्षवर्धन यांनी सांगितलं.

देशातील विविध रुग्णालयातील विलगीकरण कक्षांमध्ये स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका तसंच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे हर्षवर्धन यांनी कौतुक केले. विरोधी पक्षांच्या सदस्यांनीही हर्षवर्धन यांच्या कौतुकाला पाठिंबा दिला.

आपापल्या राज्यातील विलगीकरण कक्षांना भेट देऊन तेथील व्यवस्थेची माहिती घेण्याचे तसंच या कक्षांची अवस्था काय आहे, त्यात कोणत्या सुधारणा अपेक्षित आहेत यासंबंधीच्या सूचना सरकारला करण्याचं आवाहन हर्षवर्धन यांनी राज्यसभेतील खासदारांना केलं.

2. कोरोनाग्रस्त रुग्णांची नावं जाहीर करा- मनसेची मागणी

कोरोनाग्रस्त रुग्णांची नावं जाहीर करा, अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. TV9 मराठीनं यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.

"कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गुन्हेगार किंवा आरोपी नाहीत. त्यांना HIV सारख्या आजाराचीही लागण झालेली नाही. त्यांना कुणीही वाळीत टाकणार नाही. आपला समाज यातून सकारात्मकच भूमिका घेईल," असं संदीप देशपांडेंनी म्हटलं.

"कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाचं नाव जाहीर केल्यास यातून जनजागृती वाढेल. जी लोक पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आली आहेत ते स्वत:हून जागरुक होतील. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी हे अतिशय गरजेचं आहे", असंदेखील संदीप देशपांडे म्हणाले.

3. ...तरीही शाहीन बाग आंदोलन सुरूच

कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाट्यानं होत असताना खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली सरकारनं 50 हून अधिक लोकांच्या जमावावर निर्बंध घालण्याचे आदेश दिले आहेत.

मात्र तरीही दिल्लीतील शाहीन बागमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात महिलांची गर्दी पहायला मिळाली. हिंदुस्तान टाइम्स मराठीनं ही बातमी दिली आहे.

मंगळवारी (17 मार्च) जवळपास 500 महिला या ठिकाणी आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. आमच्या आरोग्याची जबाबदारी सरकारची आहे, असं सांगत महिलांनी कोणतीही काळजी न घेता आंदोलन सुरु ठेवण्यावर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे.

कोरोना विषाणूप्रमाणेच आपल्याला सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी याविरोधात लढा द्यायचा आहे अशी प्रतिक्रिया आंदोलनात सहभागी झालेल्या सोफिया यांनी दिल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

4. 'गोगोईंनी न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षेतेच्या सिद्धांताला तिलांजली दिली'

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या राज्यसभेसाठी करण्यात आलेल्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

इतकंच नाही तर रंजन गोगोई यांनी न्यायव्यवस्थेच्या स्वतंत्रता आणि निष्पक्षतेच्या सिद्धांताला तिलांजली दिल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

जानेवारी 2018 मध्ये तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात ऐतिहासिक पत्रकार परिषद घेणाऱ्या चार न्यायाधीशांमध्ये न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांचाही समावेश होता. त्यांच्यासोबत न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती मदन लोकूर हेदेखील होते.

'माझ्या मते माजी सरन्यायाधीशांनी राज्यसभेचा सदस्य म्हणून नियुक्ती स्वीकारत निश्चितच सामान्यांच्या मनात असणाऱ्या न्यायव्यवस्थेच्या स्वतंत्रतेच्या विश्वासाला हादरा दिला' असं माजी न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांनी म्हटलं आहे.

जानेवारी 2018 मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांची आठवण करून देतानाच कुरियन यांनी माजी सरन्यायाधीशांनी ही नियुक्ती स्वीकारच कशी केली, असा प्रश्न उपस्थित केला.

5. येस बँकेतून पैसे काढण्यासंबंधीचे निर्बंध आजपासून मागे

येस बँकेतून पैसे काढण्यासंबंधीचे निर्बंध आजपासून (18 मार्च) मागे घेण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेने 5 मार्चला येस बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घातले होते. त्याचबरोबर पैसे काढण्याची मर्यादाही 50 हजार रुपये इतकीच ठेवण्यात आली होती.

मात्र आता ही मर्यादा हटविण्यात आली असून 18 मार्च संध्याकाळी 6 वाजल्यापासून येस बँकेचे सर्व व्यवहार पूर्ववत होतील, असं ट्वीट ANI या वृत्तसंस्थेनं केलं आहे.

दरम्यान, रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सोमवारी (16 मार्च) पत्रकार परिषद घेत येस बँकेला वाचविण्यासाठी कठोर पावले उचलली असल्याचं स्पष्ट केलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)