You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठीच्या उपायांमुळे लोकांच्या काही सवयी कायमच्या बदलतील?
- Author, प्रवीण शर्मा
- Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
कोरोना व्हायरसमुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालीये. जगभरातील विविध देशांमधील सरकारं या विषाणूशी लढण्यासाठी शक्य ती सगळी पावलं उचलत आहेत.
कोरोना व्हायरसमुळे उद्योग ठप्प पडले आहेत. अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवासांवर निर्बंध आणले आहेत. हॉटेल्स-रेस्तराँ बंद आहेत किंवा लोकं तिथे जाण्याचं टाळतायत.
अनेक कंपन्यांनी विशेषतः आयटी सेक्टरमधल्या कंपन्यांनी लोकांना 'वर्क फ्रॉम होम' म्हणजे घरून काम करण्याची सुविधा दिलीय. या विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय असलेल्यांना इतरांपासून वेगळं ठेवलं जातंय.
आधीच आर्थिक मंदीच्या झळा सोसत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोना विषाणूच्या संसर्गाने अडचणीत टाकलंय. या साथीमुळे भविष्यातही लोकांच्या येण्याजाण्यावर, खाण्यापिण्यावर, सामाजिक कार्यक्रम आणि व्यवहारांवर आणि सवयींवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
यासोबतच कंपन्या आणि अर्थव्यवस्थेच्या इतर क्षेत्रांमध्येही अनेक गोष्टी बदलणार आहेत आणि हा बदल कदाचित कायमस्वरूपी असू शकतो.
वर्क फ्रॉम होम
आय.टी. सेक्टर वगळता आतापर्यंत इतर क्षेत्रांमध्ये 'वर्क - फ्रॉम - होम' म्हणजेच घरून काम करण्याची परवानगी मिळणं जवळपास अशक्य होतं. काम ऑफिसमधूनच करावं, असा आतापर्यंत कंपन्यांचा आग्रह असायचा.
- वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग; पाहा सर्व ताजे अपडेट्स
- वाचा -कोरोना व्हायरस : वाचण्याची शक्यता असलेल्यांवरच होत आहेत उपचार
- वाचा -कोरोना व्हायरस महाराष्ट्रात असा पसरला
- वाचा -कोरोनाच्या संसर्गासोबतच का वाढू लागले आहेत मानसिक आजार?
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - मुंबईत लोकल ट्रेनमध्ये कसा रोखणार कोरोना व्हायरस?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?
पण कोरोना व्हायरस पसरल्यानंतर आता कंपन्या आणि कर्मचारी दोघंही सतर्क झाले आहेत. आय.टी. खेरीज इतर क्षेत्रातल्या कंपन्यांनीही आता आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली आहे.
जगातली मोठ्या HR (ह्युमन रिसोर्स) कंपन्यांपैकी एक असलेल्या 'रेडस्टँड इंडिया' या कंपनीच्या चीफ पीपल ऑफिसर अंजली रघुवंशी यांनी सांगितलं, "आधी जी कामं वर्क फ्रॉम होमच्या अखत्यारित यायची नाहीत, त्यांचा समावेशही आता यामध्ये होतोय. ज्या क्षेत्रांमध्ये आधी वर्क फ्रॉम होम नव्हतं तिथेही आता हा पर्याय खुला झालाय. म्हणजे सेल्सच्या कामातही आता वर्क फ्रॉम होम करता येतंय. क्लायंट्स सोबत 'व्हर्च्युअल मीटिंग' करावी असं सेल्समधल्या लोकांना सांगण्यात येतंय."
त्या म्हणतात, "भविष्यात गरज पडेल तेव्हा कामाच्या स्वरूपात लवचिकता आलेली असेल. पण उत्पादनासारख्या क्षेत्रांत हे होणं कठीण आहे."
अंजली सांगतात, "आता लोकांना नोकरीवर ठेवतानाच फॉर्म कुरियर करण्याचा प्रयत्न करतोय. इतकंच नाही तर लॅपटॉप वगैरेही घरीच पोहोचवण्याचा पर्याय शोधला जातोय. आम्ही आमच्या कंपनीत पुढच्या आठवड्यापर्यंत 100 टक्के वर्क फ्रॉम होम करण्याचा प्रयत्न करतोय आणि एकदा का असं झालं तर मग अनेकदा ते कायम स्वरूपी राहातं."
पण भारतात असं होण्यात काही अडचणीही आहेत.
टीममीज सर्व्हिसेसच्या ईव्हीपी आणि सहसंस्थापक ऋतूपर्ण चक्रवर्ती यांच्या मते, "भारत सध्या यासाठी तयार आहे असं मला वाटत नाही. यासाठीच्या पायाभूत सुविधा आणि मानसिकता आपल्याकडे नाही. याबाबत काही कंपन्यांची उपकरणं आणि टेक्नॉलॉजीबाबतची तयारी जास्त असली तरी भारतातल्या बहुतेक कंपन्यांनां अजूनही आपल्या कर्मचाऱ्यांनी कामासाठी ऑफिसला यावं असं वाटत असेल."
सार्वजनिक वाहतूक टाळण्याकडे कल
कोरोना व्हायरस वेगानं पसरू लागल्यावर लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणं टाळायला सुरुवात केलीय. मोठ्या शहरांमध्ये हे प्रमाण जास्त आहे.
टेरी स्कूल ऑफ अॅडव्हान्स स्टडीजचे डीन (रिसर्च अँड रिलेशनशिप्स) शालीन सिंघल सांगतात, "2003 मध्ये आलेल्या सार्स आणि 2012 मध्ये आलेल्या मर्ससारख्या मोठ्या रोगांमधून आपण काही धडा घेतला नाही. कोरोनाच्या तुलनेत हे आजार बरेच मोठे होते."
भारतामध्ये लोकसंख्या जास्त असल्याने लोकांना पुन्हा सार्वजनिक व्यवस्थेचा वापर करायला सुरुवात करावी लागेल. पण आता रेल्वे, मेट्रो आणि बसेसच्या साफसफाईवर जास्त लक्ष द्यावं लागेल.
ऑनलाईन अभ्यास
शिकवण्याच्या पद्धतींमध्ये बदल करण्याचा प्रयत्न सध्या जगभरातल्या शाळा आणि विद्यापीठं करतायत. व्हर्च्युअल क्लासेसचा वापर झपाट्याने वाढतोय.
अनेक शाळा - कॉलेजं या पर्यायाचा विचार करतायत. म्हणूनच भविष्यात विद्यार्थ्यांना वर्गात जाण्याऐवजी व्हर्च्युअल क्लासमध्ये सहभागी होण्याची सवय करून घ्यावी लागेल.
मॉलमध्ये फेरफटका आणि शॉपिंग
गर्दीच्या ठिकाणी कोरोना विषाणूचं संक्रमण जास्त होण्याची शक्यता जास्त असल्याने गर्दीची ठिकाणं टाळावीत, असं आवाहन करण्यात येतंय. मॉल्स, सिनेमाहॉल, शाळा, कॉलेजं सध्या बंद करण्यात आलेली आहेत.
पण यामुळे लोकांच्या गर्दीच्या बाजारपेठांमध्ये वा मॉलमध्ये जाण्याच्या सवयीवर परिणाम होईल का? लोकं ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय जास्त वापरतील का?
शॉपिंग सेंटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एससीएआय)चे अध्यक्ष अमिताभ तनेजा यांना असं वाटत नाही. ते म्हणतात, "मॉल्स आणि मल्टीप्लेक्स बंद केल्याने अनिश्चतता निर्माण झालीय. लोकांसोबतच ही इंडस्ट्रीही काळजीत आहे."
स्वच्छतेच्या सवयीत बदल
साफसफाई आणि चांगल्या सवयींचं महत्त्व कोरोना व्हायरसमुळे पुन्हा अधोरेखित झालंय. सार्वजनिक सवयींमध्ये यामुळे आता बदल दिसू शकतो.
लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवरही या विषाणूचा परिणाम पहायला मिळेल.
नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाचे नोएडा विभाग प्रमुख वरूण खेरा म्हणतात, "आता लोक चांगल्या दर्जाचं आणि स्वच्छ जागी खाण्याला प्राधान्य देतील. दुसरीकडे रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सनाही आपल्या स्वच्छतेचा दर्जा वाढवावा लागेल. येत्या काळात जेवण ऑनलाईन ऑर्डर करण्याचं प्रमाण वाढेल."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)