You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आजारपणाचा खर्च पेलवत नव्हता म्हणून वडिलांनीच केला मुलीचा खून
- Author, बाला सतीश
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
मुलीच्या उपचारानं आपण 'थकलो होतो' आणि 'खचून गेलो होतो' असं म्हणत वडिलांनीच आपल्या पोटच्या मुलीचा खून केला. तेलंगणामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
तेलंगणामधल्या करीमनगर शहरातल्या विद्यानगर भागात मुख्यतः कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकवस्ती आहे. या भागातल्या चिंचोळ्या गल्ल्या पार केल्यावर तुम्ही एका लोखंडी गेट असलेल्या घरात पोहोचता. कोमारी आणि ओदेमा यांचं हे घर. ओदेमा रोजंदारीवर काम करतात तर कोमारी हमाल आहेत. हे जोडपं व्याजावर पैसेही देतं.
त्यांना राधिका नावाची 19 वर्षांची मुलगी होती. तिला पोलिओ होता. त्यासाठी तिच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनतर ती घरी आली होती. मात्र, तिला काही बरं वाटत नव्हतं. ती झोपूनच होती.
10 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजता राधिकाची आई ओदेमा आपल्या रोजच्या कामावर गेली. तर वडील कोमारी घरीच होते. थोड्यावेळाने ते जवळच्या वाणसामानाच्या दुकानात गेले. तिथून आल्यावर जेवले आणि नंतर कामावर गेले. कोमारी करीमनगर शहरातल्या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामात काम करतात.
संध्याकाळचे चार वाजले. मात्र, घरात कसलीच हालचाल नव्हती. राधिकाच्या घरात इतकी शांतता कसली, हे बघण्यासाठी शेजारच्यांनी दार ठोठावलं आणि त्यांना आत जे दिसलं ते बघून सगळेच घाबरले. राधिका फरशीवर पडली होती आणि कुणीतरी धारदार चाकूने तिचा गळा कापला होता.
शेजारच्यांनी लगेच कोमारींना फोन करण्याचा प्रयत्न केला. पण ते कामावर असल्याने त्यांचा मोबाईल बंद होता. त्यांनी हैदराबादमध्ये शिकत असलेल्या कोमारींच्या मुलाला फोन करून सांगितलं.
त्याने वडिलांच्या कामावरच्या मित्रांना फोन करून ही बातमी दिली. कोमारीला बातमी कळताच ते ढसाढसा रडू लागल्याचं त्यांचे सहकारी सांगतात. ते घरी पोचले. थोड्याच वेळात पोलीसही आले. पोलिसांनी राधिकाच्या आई-वडिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण ते बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. कोमारीची अवस्था बघवत नव्हती. मुलीच्या जाण्याने आपलंच आयुष्य संपल्यासारखं कोमारीला वाटत असल्याचं शेजारी सांगतात.
कसा उघडकीस आला गुन्हा?
चोरीच्या उद्देशाने हा खून करण्यात आला का, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला. कोमारी आणि ओदेमा यांनी कपाट उघडलं तर तिथे पैसे आणि दागिने नव्हते. पोलिसांनी कोमारींची तक्रार नोंदवून घेतली. काही वेळाने फॉरेंसिक टीम घटनास्थळावर पोचली आणि पुरावे गोळा केले.
पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र, त्यांना कसलाच सुगावा लागत नव्हता. केवळ राधिकाच्या गळ्यावर चाकूचा वार होता. हे काम चोरांनी केलं असतं तर त्यांनी पैसे आणि दागिन्यांसाठी घरभर शोधाशोध केली असती. त्यामुळे घर अस्तव्यस्त झालं असतं.
पण कोमारींच्या घरात कुठलीच वस्तू जागची हललेली नव्हती. राधिकाच्या अंगावरच्या दागिन्यांनाही हात लावलेला नव्हता. प्रथमदर्शनी राधिकाची चोरांशी झटापट झाल्याचंही दिसत नव्हतं. पोलिसांना केवळ एकच पुरावा सापडला होता. बेसिनमध्ये पडलेला चाकू ज्याने राधिकाचा खून करण्यात आला होता. मात्र, तो चाकूही धुतला होता.
महिलाविरोधी अत्याचाराच्या घटना हाताळण्यात पोलिसांना कसं अपयश येतंय, अशा आशयाच्या बातम्या छापून येऊ लागल्या आणि बघता बघता ही एक सनसनाटी न्यूज बनली. पोलिसांसाठीही हे प्रकरण प्रतिष्ठेचं बनलं आणि त्यांनी कसून तपास सुरू केला. तपासासाठी 74 जणांचं पथक कामाला लागलं.
खून करण्यासाठी वापरलेलं हत्यार घरातलं असल्यामुळे घरातल्याच कुणीतरी हे काम केलं असावं, असा संशय पोलिसांना आला. प्रथमदर्शनी कुठल्याही प्रकारची झटापट झाल्याचं दिसत नव्हतं. तसंच घरातल्या कुठल्याच वस्तूवर कुणाच्या बोटांचे ठसेही आढळले नव्हते. त्यामुळे राधिकाचे आई-वडील सांगत आहेत त्याप्रमाणे हे काही चोरीचं प्रकरण नाही, असं पोलिसांना वाटू लागलं.
पीडित कुटुंबाच्या परिचितांपैकीच कुणीतरी हे कृत्य केलं असावं आणि त्याचा उद्देश चोरी नसावा, असा पोलिसांना संशय आला. मग त्यांनी प्रेमात अपयश या दिशेने तपास सुरू केला. मात्र, राधिका घरून कॉलेजमध्ये आणि कॉलेजमधून थेट घरीच जायची, असं तिच्या शिक्षकांनी आणि मित्रांनीही सांगितलं. वर्गातल्या एका मुलाने तिला प्रपोज केलं होतं. मात्र, त्या मुलाची चौकशी केल्यावर राधिकाने त्याला नकार दिल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. मुलाचा या प्रकरणात सहभाग नाही, याची खात्री पटल्यावर पोलिसांनी हा अँगलही सोडला.
यानंतर पोलिसांनी हे कुटुंब ज्यांना ज्यांना ओळखायचं त्या सर्वांची चौकशी सुरू केली. पोलिसांनी जवळपासच्या भागातले 110 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तपासलं. 544 लोकांची चौकशी केली आणि 3200 फोन कॉल्स तपासले. मात्र, तरीही कुठलीच लीड मिळत नव्हती.
मग पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी हैदराबादमधलं एक फॉरेन्सिक पथक करीमनगरमध्ये दाखल झालं. या पथकाकडे जर्मन टेक्नॉलॉजीचे 3D कॅमेरे होते. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अतिसूक्ष्म कण ओळखता येतात. करीमनगर पोलिसांनी गोळा केलेले सर्व पुरावे या पथकाला दिले. या पुराव्यांमध्ये राधिकाच्या वडिलांचे म्हणजेच कोमारींचे कपडे आणि चपलाही होत्या. पोलिसांनी या वस्तू घटनास्थळावरूनच गोळा केल्या होत्या. कोमारींचे कपडे आणि चप्पल धुवून गच्चीवर वाळत टाकल्या होत्या. हैदराबादवरून आलेल्या या टीमने कपडे आणि चप्पल तपासल्या तेव्हा त्यांना त्यावर रक्ताचे नमुने आढळले. रक्ताचे हे नमुने राधिकाच्या रक्ताशी मॅच करण्यात आले आणि दोन्ही एकच असल्याचं स्पष्ट झालं. आणि अशाप्रकारे हा खून घरातल्याच व्यक्तीने केल्याचा पोलिसांचा अंदाज खरा ठरला.
कोमारींनी दिली गुन्ह्याची कबुली
राधिकाच्या वडिलांनीच तिचा खून केला होता. मात्र, मुलीच्या मृत्यूच्या बातमीने आपण पुरते कोलमडून गेल्याचा बनाव कोमारींनी केला होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर संशय घेतला नाही. पोलिसांनी त्यांच्यावर संशय घेऊन तपास केला असता आणि ते निर्दोष आढळले असते तर हे प्रकरण पोलिसांवरच उलटलं असतं. त्यामुळे पोलिसांनी या दिशेने तपास केलाच नव्हता.
मात्र, घटनेच्या काही दिवसांनंतर कोमारींच्या वागणुकीवरून पोलिसांना संशय येत होता. त्यामुळे पोलिसांनी कोमारींच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी एक टीम नियुक्त केली होती. पोलिसांनी घटनेच्या आदल्या दिवसाचं, घटनेच्या दिवसाचं आणि त्यानंतरच्या दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यात कोमारींच्या ज्या हालचाली आढळल्या त्यावरूनही पोलिसांचा संशय बळावला. अखेर फॉरेन्सिक टीमच्या अहवालानंतर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावलं आणि त्यांच्यासमोर पुरावे ठेवले.
कोमारींनी गुन्हा कबूल केल्याचं करीमनगरचे पोलीस आयुक्त कमलासन रेड्डी यांनी बीबीसीला सांगितलं. प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांना 21 दिवस लागले. 74 पोलिसांची टीम त्यासाठी काम करत होती.
राधिकाला पोलिओ होता. तिला तो नेमका कधी झाला, याची माहिती तिचे कुटुंबीय देऊ शकले नाहीत. मात्र, तिच्या उपचारांसाठी आपण खूप पैसे खर्च केल्याचं तिच्या आई-वडिलांनी सांगितलं. तिच्या उपचारांसाठी जवळपास 6 लाख रुपये खर्च झाल्याचं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी तिच्यावर एक शस्त्रक्रियाही केली. त्यानंतर बरी होऊन तिने कॉलेजमध्ये जायलाही सुरुवात केली होती. मात्र, शस्त्रक्रियेनंतर ती वारंवार आजारी पडायची.
राधिकाच्या वडिलांनी आपल्या कबुलीजबाबात म्हटलं, की गेली अनेक वर्ष मुलीच्या आजारपणावर पैसे खर्च करून आपण पुरते थकून गेलो होतो आणि खचून गेलो होतो. यापुढेही आपल्याला असाच खर्च करावा लागेल आणि तिच्या लग्नातही अडचणी येतील, हा विचार मनात आल्यावर आपण मनाने कोलमडून गेलो होतो. यापुढे हे ओझं आपल्याला नको होतं आणि म्हणूनच तिचा खून करण्याची योजना आपण आखली, असंही कोमारींनी म्हटलं.
पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला होता. जे दागिने चोरी झाले, असा दावा हे जोडपं करत होतं त्यासाठी पोलिसांनी सोनाराचीही चौकशी केली. मात्र, आपण असे कोणतेच दागिने या जोडप्यासाठी बनवले नसल्याचं सोनारानेही सांगितलं.
बीबीसीने शेजाऱ्यांशी बातचीत केली. तेव्हा आपण या कुटुंबाला फारसं ओळखत नसल्याचं त्यांनी सांगितलं. राधिकाला प्रकृतीच्या काही तक्रारी होत्या आणि त्यासाठी या कुटुंबाच्या सारख्या हॉस्पिटलच्या वाऱ्या व्हायच्या, एवढंच शेजाऱ्यांनी सांगितलं.
तपासात पोलिसांना आढळलं, की काही दिवसांपासूनच कोमारींच्या डोक्यात मुलीला ठार करण्याचा विचार सुरू होता. 6 फेब्रुवारीला कोमारींनी त्यांच्याच कम्पाउंडमध्ये राहणाऱ्या भाडेकरूला बळजबरीने घर सोडायला सांगितलं होतं आणि 10 फेब्रुवारीला त्यांनी आपली योजना अंमलात आणली.
ते घरीच थांबले. मुलगी झोपल्याची खात्री करून घेतली. मुलीच्या तोंडावर उशी ठेवून तिचा श्वास कोंडून तिला ठार केल्याची कबुली कोमारींनी दिली. चोरीसाठी हा खून झाल्याचं भासवण्यासाठी त्यांनीच तिचा मृतदेह फरशीवर ठेवला. चाकूने तिचा गळा कापला आणि चाकू धुवून घेतला.
त्यानंतर आपण कपडे धुतल्याचंही त्यांनी पोलिसांना सांगितलं. कुणालाही आपला संशय येऊ नये, यासाठी ते कामावर निघून गेले. शेजारच्यांनी ही बातमी कळवताच त्यांनी असा बनाव केला, की जणू त्यांना काही माहिती नाही आणि मुलीच्या मृत्यूचं त्यांना अतिशय दुःख झालं आहे.
हे प्रकरण अतिशय संवेदनशील होतं. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हेगार गजाआड झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)