शाहीन बागप्रकरणी पुढील सुनावणी 23 मार्चला

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

शाहीन बाग आंदोलनाप्रकरणी पुढील सुनावणी 23 मार्चला होईल, असं सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने म्हटलं आहे. न्यायमूर्ती संजय कौल यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु आहे.

सार्वजनिक रस्ता ही आंदोलनाची जागा नाही. सध्याची परिस्थिती सुनावणीसाठी योग्य नाही असं न्यायालयाने नमूद केलं.

दिल्ली दंगलीच्या सुप्रीम कोर्टाच्या निगराणीखाली एसआयटी नेमून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. चंद्रशेखर आझाद आणि नक्वी यांनी दाखल केलेल्या या याचिकेबाबत बोलताना या विषयात हस्तक्षेप करता येणार नसल्याचं कौल म्हणाले. पण शाहीन बागप्रकरणी मध्यस्थांनी अतिशय चांगलं काम केल्याचंही त्यांनी सांगितलं.

पण पोलिसांच्या कार्यपद्धतीवर न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत एक अंतरिम आदेश देण्याची मागणी याचिकाकर्ते डॉ. नंदकिशोर गर्ग यांचे वकील शशांक देव सोढी यांनी केली होती. पण ही मागणी फेटाळण्यात आली आहे.

वार्ताकार असणाऱ्या वकील साधना रामचंद्रन आणि वरिष्ठ वकील संजय हेगडे यांनी अहवाल बंद लिफाफ्यात न्या. एस. के. पॉल आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठाकडे पाठवला होता. हा अहवाल केंद्र आणि दिल्ली पोलिसांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकील आणि याचिकाकर्त्यांकडे सोपवण्यात येणार नाही, असं खंडपीठाने सांगितलं होतं. या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर ही सुनावणी 26 फेब्रुवारी रोजी होईल, असं खंडपीठाने सांगितलं होतं. त्यानुसार आज ही सुनावणी झाली. पण यामध्ये आता 23 मार्च ही तारीख देण्यात आली आहे.

आजच्या सुनावणीत आम्ही मर्यादित विषयांवरच सुनावणी घेणार आहोत, असं न्यायमूर्ती कौल म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)