उद्धव ठाकरे: एल्गार परिषदेचा तपास NIAकडे गेल्यामुळे मी नाराज

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

एल्गार परिषदेचा तपास केंद्राकडे गेल्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी दर्शवली आहे.

"एल्गार परिषदेचा तपास मी NIA कडे दिला नाही, तो केंद्राने अविश्वास दाखवत घेतला, त्याबाबत आमची नाराजी आहेच." असं उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्याच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होतंय. त्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.

त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेसंदर्भात सरकारची भूमिका मांडली. ते म्हणाले, "एल्गार परिषदेचा तपास मी NIA कडे दिला नाही, तो केंद्राने अविश्वास दाखवत घेतला, त्याबाबत आमची नाराजी आहेच."

पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणं चहापानाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षानं चहापानवर बहिष्कार टाकत महाविकास आघाडीच्या सरकारवर टीकास्त्रही सोडलं.

'कन्फ्युज्ड सरकार'

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांची पत्रकार परिषद झाली.

'विरोधी पक्षाशी सुसंवाद साधण्यासाठी चहापानाला बोलवायचं असतं. पण महाविकास आघाडीच्या सरकारमधील तीन पक्षांमध्येच सुसंवाद नाही. त्यामुळं त्यांनीच चहापान करुन सुसंवाद स्थापित करावा, मग आम्हाला संवादासाठी बोलवावं.' असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकलाय.

देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या सरकारला 'कन्फ्युज्ड सरकार' म्हटलंय. ते पुढे म्हणाले, "महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून जे कामकाज पाहायला मिळालं, त्यामध्ये अद्याप तर या सरकारला सूर गवसलेला नाही. या सरकारची दिशादेखील ठरत नाही."

"दिलेलं एकही आश्वासन पूर्ण करताना हे सरकार दिसत नाही. जाहीरनाम्यातील जे म्हटलं होतं, किमान समान कार्यक्रमात म्हटलं होतं, त्या प्रत्येक गोष्टीवरुन घुमजाव हे सरकार करतंय," असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

"भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद हे वेगळे नाहीत, हेच आतापर्यंतच्या तपासात पुढे आलंय. तपासाची व्याप्ती आता वाढली असल्याने तो केंद्र सरकारकडे जाणेच योग्यच आहे. तपास NIA कडे दिल्याबद्दल उद्धव ठाकरेंचं अभिनंदनच करायलं हवं," असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कर्जमाफीच्या पहिल्या यादीची तारीख जाहीर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी कर्जमाफीसंदर्भात त्यांनी महत्त्वाची माहिती दिली.

"शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या म्हणजे 24 फेब्रुवारी 2020 रोजी जाहीर होईल. शिवाय, तीन महिन्यात कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल," अशी माहितीही उद्धव ठाकरेंनी दिली.

कर्जमाफीची दुसरी यादी 28 फेब्रुवारीला जाहीर केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)