शिवसेना जर हात पुढे करत असेल तर भाजप सत्तास्थापनेसाठी तयार: सुधीर मुनगंटीवार #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1) शिवसेनेनं प्रस्ताव दिल्यास सत्तास्थापनेसाठी तयार - सुधीर मुनगंटीवार

शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रावादीसोबत जात महाविकास आघाडी स्थापन करुन राज्यात सत्ता मिळवली. मात्र, भाजप अद्यापही शिवसेनेसोबत जाण्यास इच्छुक असल्याचे दिसून येतेय. "शिवसेनेनं प्रस्ताव दिल्यास भाजप आजही सत्तास्थापनेसाठी तयार आहे," असं माजी अर्थमंत्री आणि भाजपचे महाराष्ट्रातील वरिष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

मुनगंटीवार नांदडेमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी सेनेसोबत सत्तास्थापनेबाबत वक्तव्य केलं. त्यानंतर राजकीय वक्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं.

मुनगंटीवार पुढे म्हणाले, "मुंबईच्या शक्तिशाली मातोश्रीचा शक्तिपात झाल्यानेच दिल्लीच्या मातोश्री शक्तिशाली झाली. शिवाय शिवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा म्हणजे एकविसाव्या शतकातील आश्चर्य आहे."

दुसरीकडे, भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष नैसर्गिक मित्र असल्यानं एकत्र यायला हरकत नाही, असं भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. झी चोवीस तासनं ही बातमी दिलीय.

एकीकडे सुधीर मुनगंटीवार आणि दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील हे शिवसेनेला जवळ करण्याचा प्रयत्नात असताना, शिवसेनेकडून अद्याप यावर कुठलीच प्रतिक्रिया आलेली नाहीय. शिवसेनेची प्रतिक्रिया काय असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

2) मराठवाड्यासाठीची वॉटरग्रीड योजना संकटात

मराठवाडा वॉटरग्रीड योजना व्यवहार्य नसल्याचे तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळं योजना तपासण्याची गरज आहे, असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. त्यामुळं देवेंद्र फडणवीस सरकरानं आणलेली वॉटरग्रीड योजना आता संकटात सापडलीय. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिलीय.

"आम्ही कुठलेही प्रकल्प नाकारणारे नाही. विकास झाला पाहिजे, हे आम्हालाही कळतं. मात्र, वॉटरग्रीडमध्ये काहीजण राजकारण करू पाहतायत. ही योजना यशस्वी होऊ शकते का? उद्या चांगलं काम झालं नाही तर? हा पैसा सत्कारणीच लागला पाहिजे," असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

दुसरीकडे, नाशिकमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अजित पवार यांच्या मताचं समर्थन केलंय. "जिथं जिथं योजनांमध्ये बदल करण्याची आवश्यकता असेल, तिथं जनतेच्या हितानं बदल केले जातील," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

3) मोदी आणि गोडसेची विचारधारा सारखीच - राहुल गांधी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे यांची विचारधारा सारखीच असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं. ते केरळमध्ये संविधान बचाव रॅलीत बोलत होते. द हिंदूनं ही बातमी दिलीय.

"नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसे यांची विचारधारा एकसारखीच आहे. गोडसेच्या विचाराच्या आहोत, हे स्वीकारण्याची मोदींमध्ये हिंमत नाही," अशी टीकाही राहुल गांधींनी केली.

"भारतीयांना 'भारतीय' असल्याचं सिद्ध करण्यास सांगितलं जातंय. मी 'भारतीय' आहे की नाही, हे ठरवणारे नरेंद्र मोदी कोण? कोण 'भारतीय' आहे आणि कोण 'भारतीय' नाही, हे ठरवण्याचा परवाना मोदींना कुणी दिला? मी 'भारतीय' आहे आणि हे कुणासमोरही सिद्ध करण्याची गरज नाही," असंही राहुल गांधी म्हणाले.

द्वेषाचा सामना करणं आपलं कर्तव्य आहे आणि भाजपविरोधात शांततेच्या मार्गानं लढण्याची गरज आहे, असं आवाहन राहुल गांधींनी उपस्थितांना केलं.

4) सर्व मुद्द्यांवर चर्चेस तयार, पंतप्रधान मोदींचा विरोधकांना आश्वासन

सर्व मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास तयार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना आश्वासन दिलं. संसदेच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय बैठक झाली. त्यावेळी मोदी बोलत होते. टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय.

देशात सुरू असलेल्या CAA विरोधी आंदोलनं, देशातील आर्थिक स्थिती, बेरोजगारी इत्यादी मुद्दे विरोधकांनी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीतल्या सर्वपक्षीय बैठकीत उपस्थित केले.

देशातील 26 राजकीय पक्षांनी या बैठकीत सहभाग घेतला होता. काँग्रेसकडून गुलाम नबी आझाद, अधीर रंजन चौधरी हे उपस्थित होते.

CAA विरोधी आंदोलनांची दखल घेण्यासोबतच दिल्ली निवडणुकांदरम्यान भाजप नेत्यांची वादग्रस्त विधानं रोखण्याबाबत आणि जम्मू काश्मीरमध्ये ताब्यात घेतलेल्या नेत्यांना सोडण्याची मागणीही या बैठकीतून पंतप्रधानांकडे करण्यात आली.

विरोधकांनी आर्थिक संकटाच्या मुद्द्यावर भर दिल्यानंतर मोदींनी या मुद्द्यावर आशावाद व्यक्त केला.

5) CAA हा काळा कायदा म्हणून इतिहास नोंद करेल - उर्मिला मातोंडकर

नागरिकत्व दुरुस्त कायदा (CAA) हा काळा कायदा म्हणून इतिहास नोंद करेल, अशा शब्दात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी टीका केलीय. पुण्यातील गांधी भवन इथं महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त आयोजित सभेत त्या बोलत होत्या. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

"CAA कायदा मुस्लीमविरोधी असल्याचं भासवला जातोय. तो मुस्लीमविरोधी तर आहेच, मात्र गरिबांच्या विरोधातही आहे. त्यामुळं हा कायदा आम्हाला मान्य नाही," असं मातोंडकर म्हणाल्या.

"गांधी यांनी खरा हिंदू धर्म पाळला मात्र त्यांना हिंदूंनी गोळ्या झाडल्या, हिंदू मुस्लिम द्वेषामुळे देश पुढं जाणार नाही. या व्यतिरिक्त मी इथं काय बोलू," असा सवाल ही उर्मिला मातोंडकर यांनी केला.

दरम्यान, या कार्यक्रमावेळी पुण्यात हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी एनआरसी, सीएए विरोधात आयोजित करण्यात आलेली ही जाहीर सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी पुणे पोलिसांनी 12 ते 15 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)