Republic Day Parade: प्रजासत्ताक दिन सोहळ्याची क्षणचित्रं - पाहा फोटो

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं दिल्लीतील राजपथावर झालेल्या संचलनातून देशाच्या वैविधतेचं दर्शन झालं.

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जाइर बोल्सोनारो प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

90 मिनिटांच्या संचलनामध्ये लष्करी कवायती झाल्या. या संचलनादरम्यान देशाची सामाजिक आणि सांस्कृतिक वैविध्यं पाहायला मिळाली.

परेड पाहण्यासाठी राजपथावर मोठ्या संख्येनं लोक जमले होते.

यावर्षी परेड कार्यक्रमात राष्ट्रीय युद्ध स्मारकाचाही समावेश करण्यात आला होता. दरवर्षी पंतप्रधान अमर जवान ज्योतीला भेट देऊन आदरांजली देतात. यावर्षी पंतप्रधान मोदींनी युद्ध स्मारकालाही भेट दिली आणि शहीद जवानांच्या स्मृतीला अभिवादन केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करून सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

राष्ट्रीय युद्ध स्मारकाहून पंतप्रधान मोदी परतल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे जाइर बोल्सोनारो यांच्यासोबत राजपथावर पोहोचले.

राजपथावर पोहोचल्यानंतर राष्ट्रपती कोविंद यांनी ध्वजारोहण केलं. त्यानंतर 21 तोफांची सलामी आणि राष्ट्रगीत झालं.

राष्ट्रगीतानंतर राष्ट्रपतींना सलामी द्यायला सुरूवात झाली. प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे कमांडर लेफ्टनंट जनरल असित मिस्त्रींनी सर्वात आधी सलामी दिली. त्यानंतर शौर्य पुरस्कार मिळालेल्या जवानांनी सलामी दिली.

त्यानंतर राजपथावर जमिनीवरून हवेत मारा करणारे आकाश क्षेपणास्त्र दाखविण्यात आलं. त्यानंतर पॅरा स्पेशल फोर्सेसच्या जवानांचं दल दाखल झालं.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनीही उपस्थिती लावली होती. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि त्यांच्या पत्नीसोबतच भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणीदेखील परेड पहायला पोहोचले होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही प्रेक्षकांमध्ये बसले होते.

राजपथावर जम्मू-काश्मिरचा चित्ररथ पाहायला मिळाला.

काही मंत्रालयं आणि अन्य विभागांचे चित्ररथही राजपथावरील परेडमध्ये सहभागी झाले होते. चित्ररथानंतर वीर बालकांचा चमू खुल्या जीपमधून राजपथावर आला.

बाइकवर चित्तथरारक कसरतींसाठी प्रसिद्ध असलेली बीएसएफची टीमही परेडमध्ये सहभागी झाली होती, मात्र यावेळी या टीमचं नेतृत्व महिलांनी केलं.

राजपथावर तिन्ही सैन्य दलाच्या बटालियन व्यतिरिक्त निमलष्करी दलांच्या मार्चिंग दस्त्यांनीही सहभाग नोंदवला.

रफाल विमानांसोबतच चिनुक आणि अपाचे हेलिकॉप्टरनं हवाई कसरती केल्या.

परेड संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित लोकांजवळ आले. त्यांनी हात हलवत लोकांच्या अभिवादनाचा स्वीकार केला.

तत्पूर्वी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला संबोधित केलं.

राष्ट्राला संबोधित करताना राष्ट्रपती कोविंद यांनी सरकार आणि विरोधकांच्या परस्पर सहकार्यावर भर दिला. त्यांनी लोकशाहीचे पायाभूत घटक असलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या तत्वांचं पालन केलं जावं, असंही म्हटलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)