You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मनसे अधिवेशन : राज ठाकरे यांच्या भाषणातले 9 महत्त्वाचे मुद्दे आणि विश्लेषण
राज ठाकरे यांनी मनसेच्या पहिल्या अधिवेशनात त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. साधारण पंधरा मिनिटं चाललेल्या त्यांच्या भाषणातले ठळक मुद्दे खालील प्रमाणे.
राज ठाकरे यांच्या या भाषणाचा रोख पूर्णपणे पश्रक्षाच्या नव्या भूमिकेशी सुसंगत असा होता.
- 9 फेब्रुवारीला मनसे पाकिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या मुस्लिमांना परत पाठवण्यासाठी आझाद मैदानात मोर्चा काढणार आहे, असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. असं म्हणून त्यांनी CAA आणि NRC ला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे.
- राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवातच 'जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधूंनो, भगिणींनो आणि मातांनो,' असं म्हणत केली. आतापर्यंत त्यांच्या भाषणाची सुरुवात 'जमलेल्या माझ्या तमाम मराठी बंधूंनो, भगिणींनो आणि मातांनो,' अशी व्हायची.
- पक्ष स्थापन केला तेव्हा माझ्या मनात हाच झेंडा होता, माझा डीएनए भगवाच आहे, असं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी नव्या झेंड्याबाबत दिलंय. "हा झेंडा म्हणजेच महाराजांची राजमुद्रा आहे त्याचा अवमान होऊ देऊ नका, निवडणुकीच्या काळात हा झेंडा वापरायचा नाही," असं राज यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. मनसेनं 2 झेंडे पुढे आणले आहेत. दुसऱ्या झेंड्यावर त्यांच्या पक्षाचं चिन्ह असणार आहे.
- "मी मराठी देखील आहे आणि हिंदू देखील आहे, हे मी आज बोलत नाही, माझ्या मराठीला नख लावलं तर मी मराठी म्हणून अंगावर जाईल आणि धर्माला कुणी नख लावलं तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल. माझा वैचारीक गोंधळ नाही," असं स्पष्टीकरण राज यांनी त्यांच्या बदललेल्या भूमिकेवर दिलं आहे.
- "जे देशाशी प्रामाणिक आहेत ते मुसलमान अमचेच आहेत," असं राज ठाकरे म्हणाले. यावेळ त्यांनी रझा अकादमीच्या विरोधात त्यांनी काढलेल्या मोर्चाचीदेखील आठवण करून दिली. पाकिस्तानी मुस्लिम कलाकरांना हाकलण्याचं काम मनसेनं केल्याचं ते म्हणाले.
- नमाज भोंगे लावून कशाला पडता, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
- पाकिस्तानबरोबरची बस सेवा बंद करा अशी माझी केंद्र सरकारकडे मागणी आहे, उद्या जर युद्ध झालं तर आपल्या सैन्याला देशातच लढायला लागेल, असंही राज म्हणालेत.
- "बाहेरच्या मुस्लिमांसाठी इथले मुस्लिम साथ देत असतील तर कशासाठी त्यांच्याबरोबर उभं राहायचं," असं वक्तव्य त्यांनी सीएएविरोधात रस्त्यावर उतरलेल्या लोकांबाबत केलं आहे.
- मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो, असा टोला सुद्धा त्यांनी हाणला आहे. 25 तारखेला पुढचं भाषण करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
बीबीसी मराठीचे संपादक आशीष दीक्षित यांचं विश्लेषण-
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात आम्ही भूमिका बदलली नाही असं सांगितलं असलं तरी त्यांनी इंजिन उजवीकडे वळवल्याचं दिसून येतं. जमलेल्या हिंदू बांधवांनो असं संबोधून त्यांनी भाषणाची सुरुवात केली, पूर्वी ते जमलेल्या मराठी बांधवांनो म्हणायचे. या झेंड्यांचा रंग माझ्या रक्तातच आहे आहे असंही ते म्हणाले. त्यांनी आज बोलताना सर्वत्र 'मुस्लीम घुसखोर' असा शब्दप्रयोग केला.
त्यांनी आजच्या भाषणात हिंदुत्ववादाचा मुद्दा स्वीकारला आहे तसाच मराठीचा मुद्दाही त्यांनी सोडलेला नसल्याचं स्पष्ट केलं. शिवसेनेनेही 1980 च्या दशकात असंच केलं होतं. सेनेच्या पावलावरच त्यांनी पाऊल ठेवलंय. भाषणामध्ये भाजपचं नाव घेतलं नसलं तरी ते भाजपाच्या जवळ गेल्याचं दिसत आहेत.
सीएएला पाठिंबा देणारा ते मोर्चाही काढणार आहेत. असं रालोआच्या सदस्य पक्षांनीही केलं नव्हतं. मी सत्तेत जाण्यासाठी रंग बदलत नाही, असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला आहे. आता ते गुढीपाडव्याला सरकारवर बोलणार आहेत. त्यावेळेसही ते सरकारवर काय बोलतील याकडे पाहाणे गरजेचे आहे. आज त्यांनी एनडीए कॅम्पच्या दिशेने पाऊल टाकलं आहे, असं म्हणता येईल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)