You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ओमान: सुलतान काबूस बिन सईद अल सईद यांचं निधन
ओमानचे सुलतान काबून बिन सईद अल सईद यांचं वयाच्या 79व्या वर्षी निधन झालं. काबूस अरब जगतात सर्वाधिक काळ सुलतानपदी राहिले.
शुक्रवारी संध्याकाळी त्यांचं निधन झाल्याचं ओमानच्या प्रसारमाध्यमांनी सांगितलं आहे. गेल्या महिन्यात ते बेल्जिअमहून उपचार घेऊन परतले होते. त्यांना कॅन्सर झाल्याच्याही बातम्या काही प्रसारमाध्यमांनी दिल्या होत्या.
1970 साली ब्रिटनच्या मदतीने आपल्या वडिलांनाच पदच्युत करत काबूस यांनी सुलतानपदाची गादी मिळवली होती. ओमानच्या विकासासाठी त्यांनी तेल व्यापाराला सर्वाधिक महत्त्व दिलं.
सुलतान काबूस विवाहित नव्हते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांचा वारसदारही कुणीच नाही.
ओमान राजघराण्याच्या नियमांनुसार सिंहासन रिक्त झाल्यावर राजघराणं परिषद तीन दिवसात सुलतानची निवड करतं. राजघराण्याच्या परिषदेत तब्बल 50 पुरुष आहेत.
कोण होणार ओमानचा नवा सुलतान?
सुलतानपदाच्या शर्यतीत काबूस यांचे तीन भाऊ सर्वात पुढे असल्याचं कळतंय. यात सांस्कृतीक मंत्री हैयथम बिन तारिक अल सईद, उपपंतप्रधान असद बिन तारिक अल सईद आणि ओमानचे माजी नौदल कमांडर शिहब बिन तारिक अल सईद यांच्या नावांचा समावेश आहे.
सुलतान हे ओमानमधलं सर्वोच्चपद आहे. पंतप्रधान, सैन्याचे सर्वोच्च कमांडर, संरक्षण मंत्री, अर्थ मंत्री आणि परराष्ट्र मंत्री, अशी सगळी खाती सुलतानच सांभाळतात.
46 लाख लोकसंख्या असलेल्या ओमानमध्ये 43% जनता बाहेरच्या देशांतून स्थलांतर करुन आलेली आहे. जवळपास पाच दशकं सुलतान काबूस यांचं ओमानच्या राजकारणावर वर्चस्व होतं.
वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी स्वतःच्या वडिलांना पदच्युत करुन ते राजगादीवर विराजमान झाले होते. त्यांचे वडील सईद बिन तैमूर अत्यंत रुढीप्रिय प्रशासक होते, असं म्हणतात. रेडियो ऐकणं, उन्हात गॉगल घालणं, अशा सर्व गोष्टींवर त्यांनी बंदी घातली होती. लोकांची लग्नं, शिक्षण घेणं आणि परदेशात जाण्यासारखे निर्णयही ते स्वतः घ्यायचे.
वडिलांनंतर सिंहासनावर बसलेल्या काबूस यांनी तात्काळ घोषणा केली की त्यांना एक आधुनिक सरकार अपेक्षित आहे आणि तेलातून येणारा पैसा ते देशाच्या विकासात गुंतवण्याची इच्छा आहे. त्याकाळी ओमानमध्ये केवळ 10 किमी पक्का रस्ता आणि तीन शाळा होत्या.
परराष्ट्र धोरणात त्यांनी तटस्थ मार्ग अवलंबला आणि 2013 साली अमेरिका आणि इराण यांच्यात गुप्तचर्चा घडवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. या गुप्तचर्चेच्या दोन वर्षांनंतर एक ऐतिहासिक अणुकरार करण्यात आला होता.
लोकप्रियता आणि विरोध
सुलतान काबूस यांच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारचा करिश्मा होता आणि ते दूरदर्शी होते, असं सांगितलं जातं. ओमानच्या जनतेत ते फार लोकप्रिय होते. मात्र, त्यांनीही विरोधकांचा आवाज दाबला होता.
2011 साली अरब क्रांतीदरम्यान त्यांच्याविरोधातही निषेधाचा स्वर घुमला होता.
ओमानमध्ये मोठी क्रांती घडलेली नव्हती. मात्र, सन्मानजनक वेतन, रोजगाराच्या मागणीसह भ्रष्टाचाराविरोधात रस्त्यावर उतरले होते.
सुरुवातीला सुरक्षादलांनी या विरोध प्रदर्शनांवर फारशी कारवाई केली नाही. मात्र, नंतर अश्रूधुराच्या नळकांड्या, रबरी बुलेट आणि शस्त्रास्त्रांच्या मदतीने आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला. यात दोन जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले होते. शेकडो लोकांना 'बेकायदेशीरपणे एकत्र येणे' आणि 'सुलतानचा अवमान' केल्याच्या गुन्ह्याखाली शिक्षा देण्यात आली होती.
या निदर्शनांचा फारसा परिणाम झाला नाही. मात्र, सुलतान काबूस यांनी भ्रष्टाचारी मानल्या जाणाऱ्या आणि दीर्घकाळ पदावर असणाऱ्या काही ज्येष्ठ मंत्र्यांना पदच्युत केलं होतं.
त्यांनी सल्लागार परिषदेचे अधिकार वाढवले आणि सरकारी नोकऱ्या वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं.
ह्युमन राईट वॉचनुसार तेव्हापासून ओमान प्रशासन सरकारवर टीका करणारी स्थानिक निष्पक्ष वृत्तपत्र बंद करत आहे. तसंच सामाजिक कार्यकर्त्यांनाही त्रास देण्यात येत आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)