महाविकास आघाडी विरुद्धची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. महाविकास आघाडीविरुद्धची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तीन पक्षांनी स्थापन केलेल्या आघाडीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. ही बातमी लोकमतने दिली आहे.

राज्यघटनात्मक नैतिकता ही राजकीय नैतिकतेपेक्षा निराळी असते, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने यानिमित्ताने नोंदविले. खंडपीठाने म्हटले आहे की, लोकशाहीमध्ये कोणी कुणाशी युती करायची, याबद्दल राजकीय पक्षांना असलेले अधिकार आम्ही कमी करू शकत नाही.

अखिल भारतीय हिंदू महासभेचे कार्यकर्ते प्रमोद पंडित यांनी ही याचिका केली होती.

2. झारखंड विधानसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू

झारखंड विधानसभेच्या 13 जागांसाठी आज मतदान होत आहे. सहा जिल्ह्यांमधल्या 13 जागांसाठी आज 27 लाख नागरिक त्यांचा मतदानाचा हक्क बजावू शकतील. यापैकी 18 लाख महिला मतदार आहेत.

या निवडणुका 5 टप्प्यांमध्ये होणार असून 23 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. 37 लाख लोक यंदा मतदानास पात्र आहेत, ज्यापैकी साधारण 18 लाख लोक आहेत.

भाजपचा यंदा प्रथमच 'एकला चलो रे' करत आहे. ही बातमी हिंदुस्तान टाइम्सने दिली आहे.

3. तुळजाभवानीचे दागिने लंपास

तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या अंगावरील मौल्यवान माणिक, दोन चांदीचे खडाव आणि वेगवेगळय़ा राजेरजवाड्यांनी दिलेली 71 पुरातन नाणी मंदिर संस्थानच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गायब केली असल्याचा अहवाल एका समितीने जिल्हाधिकारी तसेच विधिमंडळास कळविला आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

या प्रकरणी मंदिरातील धार्मिक काम पाहणारे अधिकारी आणि कर्मचारी यांनी पदभार देताना आणि घेताना कागदोपत्री नोंदीत घोळ घालून या मौल्यवान वस्तू गायब केल्या असल्याने या प्रकरणात फौजदारी कारवाई करण्याची शिफारस या समितीने केली आहे.

4. शपथविधीवेळी 'नियमांकडे दुर्लक्ष केल्यावरून' राज्यपालांची नाराजी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्र्यांनी गुरुवारी घेतलेल्या शपथविधीच्या पद्धतीवर राज्याच्या राज्यपालांनी नाराजी वर्तवली आहे. ही बातमी दिव्य मराठीने दिली आहे.

नियम आणि कार्यपद्धतीचे उल्लंघन करत आमदारांनी राज्यपालांकडून शपथ सुरू करण्यापूर्वी आपापले नेते आणि देवांचे नाव घेतले होते. कुणी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले तर कुणी बाळासाहेब ठाकरे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि शरद पवार यांचे स्मरण केले. सूत्रांनुसार, पुढील कोणत्याही कार्यक्रमात तसे न करण्याच्या राज्यपालांनी सूचना दिल्या आहेत.

शपथ घेताना राज्यपाल मी... शब्दाने सुरुवात करतात, यानंतर मुख्यमंत्री/मंत्री आपले नाव घेऊन शपथ घेतात.

बहुतेक नवनियुक्त मंत्र्यांनी राज्यपालांच्या वतीने शपथविधी सुरू करताना त्यांना मध्येच थांबवले.

5. एक लीटर दुधात बादलीभर पाणी, मध्यान्न भोजन म्हणून 81 मुलांना वाटप

उत्तर प्रदेशमध्ये मध्यान्न भोजनांतर्गत एक लीटर दुधात बादलीभर पाणी टाकून 81 मुलांना वाटप करण्यात आलं. ही बातमी TV9 मराठीने दिली आहे.

सोनभद्र जिल्ह्याच्या चोपन ब्लॉक येथील प्राथमिक शाळेत अशाप्रकारे दुधाच्या नावाने पाणीच वाटण्यात आलं आहे. माध्यमांनी हा प्रकार उघड केल्यानंतर जिलाधिकारी एस. राजलिंगम यांनी तात्काळ या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले.

शाळेत स्वयंपाक करणाऱ्या बाईंनी सांगितलं की त्यांना एक लूटर दूध देण्यात आलं होतं. म्हणून त्यांनी या एक लीटर दुधात पाणी टाकून सर्व मुलांना वाटलं.

दुसरीकडे घटनास्थळावर पोहचलेल्या अधिकाऱ्याने (SBSA) यात प्राथमिक चूक शिक्षकमित्राची असल्याचं दिसत आहे, असं मत व्यक्त केलं. तसेच या शिक्षकमित्राला निलंबित केल्याचीही माहिती त्याने दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)