You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे शपथविधी : आदर्श घोटाळ्याची ईडीकडून पुन्हा चौकशी सुरू #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. आदर्श घोटाळ्याची ईडीकडून पुन्हा चौकशी सुरू
कुलाबा येथील आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेतील घोटाळ्याची ईडीकडून पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. यामुळे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
बुधवारी ईडीनं (अंमलबजावणी संचालनालय) पुन्हा एकदा आदर्श घोटाळ्याची चौकशी सुरु केली आहे. ईडीचे अधिकारी बुधवारी आदर्श गृहनिर्माण सोसायटीत दाखल झाले आणि त्यांनी त्यातील घरांची मोजणीही केली.
आदर्श सोसायटीमध्ये अशोक चव्हाण यांच्या तीन नातेवाईकांना सदनिका देण्यात आल्याचं समोर आल्यानंतर नोव्हेंबर 2010मध्ये अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला होता.
आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचं मिळून महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं आहे. या सरकारमध्ये चव्हाण यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, अशातच या चौकशीमुळे त्यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र ईडीने आपण कोणतीही नव्याने चौकशी सुरु केली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आदर्शच्या बाबतीत कोणतीही चौकशी नव्याने सुरु झालेली नाही. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांकनाला कोणताही आधार नसल्याचं ईडीने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे. या स्पष्टीकरणाची बातमी टाईम्स ऑफ इंडियानं दिली आहे.
2. 'शरद पवार असेपर्यंत सरकार टिकणार'
"शरद पवारांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीत भीष्म पितामह यांची भूमिका बजावली. महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युतीचे सर्व श्रेय शरद पवारांना आहे. ते नसते तर महाराष्ट्रामध्ये या तिन्ही पक्षांची युती होऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं नसतं," असं मत भाजप खासदार जगदंबिका पाल यांनी व्यक्त केलं आहे. फ्री प्रेस जर्नलनं ही बातमी दिली आहे.
"आम्ही सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादीकडे गेलो नव्हतो. अजित पवारच त्यांच्या 54 आमदारांच्या स्वाक्षऱ्या असणारे पाठिंबा पत्र आमच्याकडे घेऊन आले होते. त्याच्याआधारेच आम्ही सत्तास्थापनेचा दावा केला," असंही पाल यांनी म्हटलं आहे.
3. चार वर्षांत देशात 1500 बालविवाह
2013 ते 2017 या कालावधीत देशभरात बालविवाहाची 1500हून अधिक प्रकरणं समोर आली असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभेत दिली. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.
बालविवाहाची सर्वाधिक 395 इतकी प्रकरणं 2017 मध्ये समोर आली. सन 2016मध्ये 326, सन 2015मध्ये 293 , 2014 मध्ये 280 आणि 2013 मध्ये 222 बालविवाह झाले, असं इराणी यांनी सांगितलं.
2017मध्ये सर्वाधिक बालविवाह कर्नाटकात झाले. त्यााधीच्या 4 वर्षांमध्ये त्याबाबत तमिळनाडू आघाडीवर होते, असंही त्यांनी म्हटलं.
4. हैदराबादमध्ये पशुवैद्यक तरुणीची हत्या
तेलंगणाची राजधानी हैदराबादजवळील शादनगर भागात एका पशुवैद्यक तरुणीवर अत्याचार केल्यानंतर तिच्या मृतदेहाला आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.
दुचाकीत बिघाड झाल्यामुळे ही 27 वर्षांची तरुणी तिच्या दुरुस्तीसाठी थांबली होती. बुधवारी रात्री तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांच्या मते "रात्री 8च्या सुमारास दवाखाना बंद केल्यानंतर ही तरुणी घराकडे निघाली होती. रस्त्यातच तिची गाडी खराब झाली. त्यामुळे तिनं बहिणीला फोन केला. गाडी टोल नाक्यावर सोड आणि कॅब करून ये, असं बहिणीनं तिला सुचवलं. पण, हे करत असतानाच 2 जणांनी तिची गाडी दुरुस्तीसाठी मदत करू असं सांगितलं.
तरुणीनं होकार दिल्यानंतर ते दोघं तिची गाडी दुरुस्तीसाठी घेऊन गेले. त्यानंतर ती गाडी येण्याची वाट पाहत असतानाच काही जणांनी या तरुणीला शेजारच्या निजर्नस्थळी ओढत नेलं. तिथं तिची हत्या केली आणि नंतर तिच्या मृतदेहाला आग लावली." या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
5. यंदा 51 टक्के भारतीयांनी दिली लाच
यंदा देशातील 51 टक्के नागरिकांनी कोणत्या ना कोणत्या कामासाठी किमान एकदा तरी लाच दिली असल्याचं समोर आलं आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण 56 टक्के इतके होतं. स्क्रोलनं ही बातमी दिली आहे.
'लोकल सर्कल' आणि 'ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल इंडिया' या संस्थांनी 20 राज्यांतून 1.9 लाख नागरिकांच्या मुलाखती घेऊन हा अहवाल तयार केला आहे.
या अहवालानुसार राजस्थानमध्ये लाच देण्याचं प्रमाण सर्वाधिक म्हणजेच 78 टक्के इतकं आहे. महाराष्ट्रात हेच प्रमाण 55 टक्के आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)