You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईचं पाणी ‘एक नंबर’, दिल्लीचं पिण्यालायकही नाही – केंद्र सरकारचं रँकिंग #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. मुंबईचं पाणी 'एक नंबर', दिल्लीचं सगळ्यात खराब
देशात मुंबईच्या पाण्याची गुणवत्ता सगळ्यात चांगली आहे, तर याबाबत देशाची राजधानी दिल्ली तळाला असल्याचं केंद्र सरकारच्या एका रँकिंगमधून समोर आलं आहे.
देशातील 21 राज्यांच्या राजधानीतील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर आधारित ही रँकिंग केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री राम विलास पासवान यांनी जारी केली आहे.
या 21 शहरांच्या रँकिंगमध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.
याविषयी माध्यमांना माहिती देताना पासवान म्हणाले, "या रँकिंगमधून आपल्याला कुणालाही दोष द्यायचा नाही. फक्त नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावं हा हेतू आहे. पिण्याच्या पाण्याबाबत देशभरातून तक्रारी येत होत्या. दिल्लीतील पाणी पिण्यालायक नसल्याचं तपासात समोर आलं."
2. आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन
संसदेचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (18 नोव्हेंबर) सुरू होत आहे. त्यात प्रामुख्यानं देशासमोरील आर्थिक संकट, शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढती बेरोजगारी, काश्मीरमधील नागरी प्रश्न तसंच नागरिकत्व दुरुस्ती विधेयक, अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे, अशी बातमी इंडिया टुडेनं दिली आहे.
विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व राष्ट्रीय मुद्द्यांवर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सविस्तर चर्चा केली जाईल, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (17 नोव्हेंबर) सर्वपक्षीय बैठकीत दिले.
बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान या शेजारील देशांमधून भारतात आलेल्या मुस्लीम वगळता अन्य धर्मीय (हिंदी, शीख, पारशी, ख्रिश्चन, बौद्ध, जैन) निर्वासितांना नागरिकत्व देणारं दुरुस्ती विधेयक आणण्याचा विचार केंद्र सरकार करत असून हिवाळी अधिवेशनातच ते संमत केले जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात केंद्र सरकारनं वटहुकूम काढलेला आहे.
3. भाजपात गेलेले आणि काही अपक्ष आमदार आमच्या संपर्कात - जयंत पाटील
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले तसंच काही अपक्ष आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. पुण्यात राष्ट्रवादीच काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठकी सुरू होण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
जयंत पाटील म्हणाले, "15 ते 20 आमदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र त्यांची नावं आत्ताच मी उघड करणार नाही, कारण त्यांच्यासाठी ते अडचणीचं होईल. आम्ही मेगा भरती करणार नाही तर मेरिट भरती करू".
भाजपासोबत जाणार का? या प्रश्नावर बोलताना भाजपची विचारधारा वेगळी असल्यानं त्यांच्यासोबत जाणार नाही, असं ते म्हणाले. मग शिवसेनेसोबत कसं जाणार? या प्रश्नावर, दगडापेक्षा वीट मऊ, असं उत्तर त्यांनी दिलं.
4. अयोध्या: जस्टिस नझीर यांना झेड सुरक्षा
अयोध्या खटल्यात ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठातील न्यायमूर्ती अब्दुल नझीर आणि कुटुंबीयांना झेड श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.
कट्टरवादी संघटना 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया'कडून जीविताला धोका असल्याच्या संशयावरून केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
गृह मंत्रालयाच्या वतीनं CRPF आणि स्थानिक पोलिसांना जस्टिस नझीर यांच्यासह त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेचे उपाय करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
5. पार्किंगमधील वाहनांची जबाबदारी हॉटेलचीच: सर्वोच्च न्यायालय
पार्किंगमधील गाडी चोरीला गेल्यास अथवा नुकसान झाल्यास 'मालकाच्या जबाबदारीवर पार्किंग' ('Parking at owners risk') अशी पाटी लावून कोणताही हॉटेल मालक आता अंग काढून घेऊ शकत नाहीत. सर्वोच्च न्यायालयानं असा निर्णय दिला आहे. नवभारत टाइम्सनं ही बातमी दिलीय.
वाहन चोरीला गेल्यास अथवा वाहनाचं नुकसान झाल्यास त्यासाठी संबंधित हॉटेल व्यवस्थापनच जबाबदार असेल, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
1998ला नवी दिल्लीतील ताज महल हॉटेलमधून एका ग्राहकाची मारुती झेन ही कार चोरीला गेली होती. हॉटेल व्यवस्थापनावर हलगर्जीपणाचा आरोप करत 2.8 लाख रुपयांची नुकसान भरपाई या ग्राहकानं मागितली.
पण यासाठी हॉटेलनं नकार दिल्यानंतर प्रकरण राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगासमोर गेलं होतं. आयोगानं दिलेला निर्णय आता सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. जस्टिस एम. एम. शांतनागौदार आणि जस्टिस अजय रस्तोगी यांच्या खंडपीठानं यावर निर्णय दिला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)