अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या :

1. शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करत आहोत. पीक विम्याची रक्कमही मिळेल असा निर्णय मंत्रिमंडळाच्या उपसमितीने घेतला आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ही बातमी दैनिक लोकसत्ताने दिली.

राज्यातील शेतकऱ्यांचे नेमके किती नुकसान झाले, याबाबतची अंतिम आकडेवारी उपलब्ध झाली नसल्याने कोणत्या पिकाला किती नुकसान भरपाई द्यावी, याबाबत शनिवारी निर्णय घेण्यात आला नाही. मात्र येत्या 2 ते 3 दिवसात नुकसान भरपाईबाबतचा अंतिम निर्णय घेऊन मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, शेतकऱ्यांचं नुकसान पाहता 10 हजार कोटींची मदत पुरेशी नसून 25 हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे.

2. केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर लडाखमध्ये 164 जण सैन्यात दाखल

लडाख केंद्रशासित प्रदेश बनल्याच्या एका दिवसानंतरच 164 तरुणांनी भारतीय सैन्यातील नोकरी मिळवली आहे. शनिवारी यासाठी दीक्षांत सोहळा आयोजित करण्यात आला होता. ही बातमी इंडिया टुडेने दिली आहे.

लेहच्या रेजिमेंटल सेंटरमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. मेजर जनरल संजीव राय कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. लष्करात दाखल झालेल्या बहुतांश तरूणांचं 20 वर्षांपेक्षाही कमी आहे. हे विशेष.

3. पोलीस-वकिलांची कोर्टात जुंपली

नवी दिल्लीतील तीस हजारी कोर्टाच्या आवारात शनिवारी दुपारी पोलीस आणि वकिलांमध्ये मोठा संघर्ष झाला.

शनिवारी दुपारी कोर्टाच्या आवारात काही वकील आणि पोलिसांमध्ये पार्किंगवरून वाद सुरू झाला. हा वाद वाढत जाऊन त्याला हिंसक वळण लागल्याचे ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी सांगितले.

पोलिसांचे एक वाहन जाळण्यात आलं तर आठ वाहनांची तोडफोड करण्यात आली. यात आपले दोन सहकारी जखमी झाल्याचा दावा वकिलांनी केला आहे. ही बातमी दैनिक महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.

4. जवान चंदू चव्हाण यांचे जंतर-मंतरवर उपोषण

पाकिस्तानच्या तावडीतून सुटून परतलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांनी शनिवारपासून (2 नोव्हेंबर) नवी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर आमरण उपोषण सुरू केलं आहे. ही बातमी दैनिक सकाळने दिली आहे.

'पाकिस्तानातून सुटून आल्यानंतर भारतीय लष्कराची वागणूक बदलली, त्यामुळे आपण व्यथित झालो असून तीन वर्षांपासून या समस्येला सामोरे जात आहे. तीन महिन्यांपासून वेतन नसल्यामुळे आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. माझा मोबाईल आणि ओळखपत्र जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईची CBI चौकशी करण्यात यावी,' अशी मागणी चंदू चव्हाण यांनी केली आहे.

5. मिरवणुकीवरच्या टीकेनंतर रोहित पवार यांचं स्पष्टीकरण

कर्जत-जामखेड मतदारसंघातील विजयी मिरवणुकीवरून टीका झाल्यानंतर राष्ट्रावादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिलं आहे.

सर्वांनी मिळून मोठ्या आनंदात मिरवणूक काढली. यामध्ये शेतकऱ्यांच्या भावना दुखवण्याचा हेतू नव्हता, असं रोहित म्हणाल्याची बातमी एबीपी माझाने दिली आहे.

"आपल्या आनंदामुळे अगदी एका व्यक्तीला जरी वाईट वाटलं तरी आपण त्या एका व्यक्तीचा विचार करायला हवा, हेच आपण लहानपणापासून शिकलो आहोत. त्यांना वाईट वाटावं, असा आपला हेतू नव्हता आणि भविष्यातही नसेल," असं रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)