You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ओमराजे निंबाळकर : मला संपविण्याचा उद्देश साध्य होणार नाही
उस्मानाबादचे खासदार आणि शिवसेना नेते ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. उस्मानाबादमधल्या पाडोळी गावामध्ये हा हल्ला झाला. एका तरूणानं हा हल्ला केला आहे.
हल्ला झाला त्यावेळी निंबाळकर शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी इथं गेले होते.
"महायुतीचे उमेदवार कैलास पाटील यांचा नायगाव येथील प्रचार करून पाटोळे गावात आलो होतो. इथे मी चालत सभेकडे येत होतो. तेवढ्यात पाच ते दहा लोक आले. त्या सर्वांना मी नमस्कार करत होतो. त्यातल्या एका मुलाने मला एका हातानं नमस्कार केला आणि माझा उजवा हात हातात घेतला. त्याच्या उजव्या हातानं त्यानं माझ्यावर गंभीर स्वरूपाचा वार केला, ते लक्षात आल्यावर मी माझा डावा हात माझ्या पोटाला लावला. त्यामुळं तो चाकू माझ्या हातावर आणि घड्याळावर आला. त्यामुळे मी बचावलो," असं ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
"माझ्या कार्यकर्त्यांनी त्या माणसाला पकडायचा प्रयत्न केला. पण तो माणूस तिथून पळून गेला. पोलीस त्या मुलाला पकडतील. त्यानंतर हे षडयंत्र कुणाचं आहे ते कळलेच," असंही ओमराजे यांनी म्हटलं.
मला संपविण्याचा डाव साध्य होणार नाही
ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली होती. हे प्रकरण नेमकं काय आहे हे वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
हल्ल्यानंतर ओमराजे त्या घटनेबद्दलही बोलले. त्यांनी म्हटलं, "मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो. माझ्या वडिलांच्या हत्येनंतर माझ्याबाबत कधीही अशी घटना घडलेली नव्हती. आज जो प्रकार झाला तो अतिशय भयंकर आहे."
"मला संपवून राजकीय विरोध संपवण्याचा ज्या कुणाचा डाव असेल तो साध्य होऊ शकणार नाही. पवनराजे निंबाळकरांची हत्या झाल्यानंतरही मी ठामपणे उभा राहिलो आहे. हे अतिशय भेकडपणाचं कृत्य आहे," ओमराजेंनी म्हटलं.
सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. पण हा हल्ला करणारा तरूण पळून गेला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)