पश्चिम बंगाल: मुर्शिदाबाद तिहेरी हत्याकांड पैशांच्या वादातून, RSS शी संबंध नाही- पोलीस

    • Author, रवी प्रकाश
    • Role, मुर्शिदाबादहून बीबीसी हिंदीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या तिहेरी हत्याकांडाचा उलगडा झाल्याचा दावा पश्चिम बंगाल पोलिसांनी केलाय. या हत्या पैशांच्या वादातून झाल्या असून त्यांचा राजकारण वा धर्माशी संबंध नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

या प्रकरणी शाहपूर बरला गावातल्या उत्पल बेहरा नावाच्या तरुणाला अटक करण्यात आली असून तो या गुन्ह्यातला मुख्य आरोपी असल्याचं मुर्शिदाबाद पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

बंधु प्रकाश पाल, त्यांची आठ महिन्यांची गर्भवती पत्नी ब्युटी पाल आणि सात वर्षांचा मुलगा आर्य यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती.

मुर्शिदाबादचे एएसपी मुकेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, "प्राथमिक शाळेत शिकवण्यासोबतच बंधु प्रकाश पाल हे अनेक विमा कंपन्यांचं कामही करायचे. एलआयसी, एसबीआय लाईफ, पीएनबी मेट लाईफच्या विमा योजना ते विकायचे. याशिवाय ग्रीन क्लोरी या नेटवर्किंग कंपनीशीही ते संबंधित होते. ही कंपनी कर्ज देते. ते शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड व्यवसायातही होते. रामपूर हाटमध्ये ते 10 ऑक्टोबरला स्टॉक गुरू नावाची संस्थाही ते उघडणार होते. याच्या दोनच दिवस आधी त्यांची हत्या करण्यात आली."

या सगळ्यासाठीच त्यांनी स्वतःच्या गावातून आणि इतर गावांतून अनेकांकडून पैसे घेतले असल्याचा पोलिसांनी दावा केलाय.

एएसपी मुकेश कुमार यांनी सांगितलं, "त्यांनी काही लोकांकडून पैसे तर घेतले पण ते स्वतःकडेच ठेवून दिले. म्हणूनच लोकांसोबत त्यांचं बिनसलं होतं आणि त्यांच्यावर अनेकांचं कर्जं झालं होतं."

शेजाऱ्यांनी पाहिलं आरोपीला

एएसपी मुकेश कुमार यांनी सांगितलं, "बंधु प्रकाश पाल यांनी शाहपुर - बरला या त्यांच्या गावातल्या माधव बेहरा यांच्या मुलाकडून - उत्पल बेहरा यांच्याकडूनही पैसे घेतले होते. पण त्यांचे दोन हप्ते त्यांनी भरले नाहीत. बेहरांनी बंधु प्रकाश पाल यांच्याकडून आपले पैसे परत मागितले. पण ते परत न दिल्याने त्यांनी पाल यांच्या हत्येची योजना आखली."

"उत्पल यांना प्रकाश पाल यांच्या जियागंजमधल्या घराची नेमकी माहिती नव्हती. पाच ऑक्टोबरला ते जियागंजमधल्या आपल्या बहिणीकडे गेले, पण त्यांना बंधु प्रकाश पाल यांच्य घराचा पत्ता मिळाला नाही. त्यानंतर पुन्हा त्यांनी 7 ऑक्टोबरला पाहणी केली आणि घर शोधलं."

एएसपी मुकेश कुमार यांनी सांगितलं, "दुसऱ्या दिवशी उत्पल त्यांच्या घरी गेले. बंधु प्रकाश पाल यांनी दरवाजा उघडला. यानंतर लगेचच बंधु प्रकाश पाल यांच्यावर मागून वार करत त्यांची हत्या करण्यात आली. दुसऱ्या खोलीत त्यांची बायको ब्युटीचा खून करण्यात आला. शेवटी उत्पलने आर्य पालचीही हत्या केली. बंधु प्रकाश यांच्या शेजाऱ्यांनी त्याला पळ काढताना पाहिलं होतं."

ठोस पुराव्यांच्या आधारेच उत्पल बेहराला अटक करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केलाय. पोलिसांनी सांगितलं, "त्याने आपला गुन्हा कबुल केलाय. या पोलीस ठाण्याचं सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल फोन कॉल्सचा तपशीलही पाहण्यात आलेला आहे."

RSSशी संबंध नाही

हत्या झालेल्या बंधु प्रकाश पाल यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) वा भारतीय जनता पक्षाशी संबंध होते असा दावा करण्यात येत होता. पण त्यांचे असे संबंध नव्हते असं त्यांच्या आईने म्हटलं होतं.

भारतीय जनता पक्षाचे जियागंज प्रभागाचे अध्यक्ष प्रताप हालदार हे बंधु प्रकाश पाल यांचे शेजारी आहेत.

त्यांनी बीबीसीला सांगितलं, "बंधु प्रकाश पाल भाजपंचे कार्यकर्ते नव्हते. पण त्यांचा आरएसएसशी संबंध असल्याचं लोक सांगताहेत."

पण याविषयी काही पुरावा उपलब्ध आहे का? यावर त्यांनी सांगितलं, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत रजिस्टर नसतं. म्हणूनच ते संघाच्या शाखेत जायचे की नाही याचा पुरावा देणं अशक्य आहे. याबद्दल संघाचे लोकच अधिक सांगू शकतील."

ठामपणे सांगणं कठीण

बंधु प्रकाश पाल हे संघाचे स्वयंसेवक होते आणि जियागंजमधल्या त्यांच्या घरी संघाच्या काही बैठका झाल्या होत्या, पण बंधु प्रकाश पाल यांची आणि आपली भेट झाली नव्हती असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुर्शिदाबाद जिल्हाप्रमुख समर राय यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

समर राय म्हणाले, "ते माझ्यासोबत संघाच्या कोणत्याही बैठकीत वा शाखेत सहभागी झाले नव्हते. पण बंधु प्रकाश पाल आमच्या शाखेत येत असत असं मला काही स्वयंसेवकांनी सांगितलंय. म्हणूनच ते स्वयंसेवक असल्याचं आम्ही म्हणतोय. पण याचा पुरावा देण्यासाठी आमच्याकडे त्यांचा कोणताही फोटो वा कागदपत्रं नाहीत."

हत्या झालेले बंधु प्रकाश पाल यांच्या आईचं - माया पाल यांचं वय 70 वर्षं असून त्यांना हा एकच मुलगा होता.

बीबीसी सोबत बोलताना माया पाल म्हणाल्या, "बंधु प्रकाश यांचा भाजप, आरएसएस वा कोणत्याही पक्षाशी संबंध नव्हता. जो कोणी निधी मागायला यायचं, त्यांना तो पैसे देत असे. तो फक्त स्वतःचं काम करायचा. त्याचा राजकारणाशी दूरवरचाही संबंध नव्हता. लोकं खोटं का बोलत आहेत वा टीव्ही - वर्तमानपत्रांमध्ये खोटा बातम्या का येत आहेत, हे मला माहीत नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)