You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांपेक्षा मोठे झाले का?'#5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांपेक्षा मोठे झाले का?
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा बाबासाहेबांचा राजकीय पक्ष होता. मात्र वंचित आघाडीची स्थापना करताना प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षालाच बाजूला ठेवलं. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचा विचार संपवायला निघाले असून ते बाबासाहेबांपेक्षा मोठे झाले का? असा सवाल पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी केला. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
पक्षाच्या मेळाव्यात कवाडे बोलत होते. 'प्रकाश आंबेडकरांना रिपब्लिकन पक्षाचं वावडं आहे. समविचारी पक्षांची बांधणी करायची असेल तर आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षांना विचारात घेणं आवश्यक होतं. मात्र त्यांनी आम्हाला विचारात न घेतल्याने बिन बुलाये मेहमान का व्हायचं? बाबासाहेबांनी राजकीय विचार पोहोचवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली होती. मात्र प्रकाश आंबेडकर राजकीय विचार ओलांडत आहेत', असं कवाडे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, 'विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख खोडून काढावा अशी मागणी एकेकाळी करणारे प्रकाश आंबेडकर आज प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर त्याच्या जातीचा उल्लेख करत आहेत. हा जातीय राजकारणाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न आहे'.
2. अमित शहा यांच्या मुलाची ईडी चौकशी करणार का?-राष्ट्रवादी
विरोधकांना संपवण्यासाठी भाजप सर्वकाही करत असून, ईडी सरकारच्या हातातील बाहुलं झालं आहे. ईडीद्वारे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा मुलगा जय शहा याची चौकशी होणार का? असा सवाल राष्ट्रवादीतर्फे करण्यात आला. 'लोकमत'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
राज्य मध्यवर्ती सहकारी शिखर बँकेच्या कर्ज घोटाळ्यात संशयित आरोप म्हणून नाव दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: ईडी कार्यालयात उपस्थित राहून आरोपांसंदर्भात खुलासा करण्याची भूमिका घेतली होती. परंतु कायदा आणि सुव्यवस्थेमुळे पवारांनी ईडी कार्यालयात जाणं टाळलं.
मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपच्या अध्यक्षपदी विराजमान होताच, जय शहा यांच्या कंपनीच्या व्यवहारात एका वर्षात 16 पटीने वाढ झाली होती. मग ईडी त्यांची चौकशी करणार का? असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केला.
3. किनारी प्रदेशात दहशतवादी हल्ल्याची शक्यता-राजनाथ सिंह
शेजारी देशातील दहशतवाद्यांकडून भारताच्या सागरी किनारी प्रदेशात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
आम्ही सागरी सुरक्षेस वचनबद्ध आहोत. जे कुणी भारताची सुरक्षा धोक्यात आणतील त्यांना आम्ही सुखाने राहू देणार नाही. कच्छ ते केरळ दरम्यानच्या सागरी किनाऱ्यावर एखादी मोठी घटना घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलवामा हल्ल्यावेळी आपल्या सैनिकांनी जे बलिदान दिलं ते देशातील कोणतीही व्यक्ती विसरू शकणार नाही असं त्यांनी सांगितलं.
4. अयोध्येप्रकरणी पुरातत्व अहवाल अभ्यासपूर्ण-सर्वोच्च न्यायालय
रामजन्मभूमी-बाबरी मशीदप्रकरणी भारतीय पुरातत्व विभागाचा अहवाल म्हणजे सर्वसामान्य मत नव्हे. उत्खननातून जे साहित्य मिळालं त्याबाबत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची काय मते आहेत हे स्पष्ट करण्याचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले होते. त्यांच्या वतीने हे अधिकारी काम करत होते असं शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. 'इंडिया टुडे'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
पुरातत्व विभागाच्या अहवालातून जे अनुमान काढण्यात आलं ते सुसंस्कृत आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने काढण्यात आलं होतं असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठाने म्हटलं आहे.
5. पीएमसी बँकेत घोटाळाच झाला नाही-जॉय थॉमस
पंजाब अँड महाराष्ट्र बँकेत आर्थिक घोटाळा झालेलाच नाही, रिझर्व्ह बँकेने केलेली कारवाई अतिशय कठोर आहे असा दावा या बँकेचे निलंबित व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी केला. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
रिझर्व्ह बँकेला आम्ही स्वत:हून माहिती दिली. एनपीएची माहिती जाहीर न करण्याचे कारण तांत्रिक होते. या कर्जांची वर्गवारी कशी करायची हे निश्चित न झाल्याने ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली नाही. एनपीएबाबतचा हा तांत्रिक घोळ निस्तरण्यासाठी आम्ही मुदतही मागितली होती असं त्यांनी सांगितलं.
एचडीआयएलला दिलेल्या कर्जावरून वाद सुरू असला तरी सुरक्षा ठेवी आणि बँकेच्या अन्य मालमत्तेच्या आधारे या थकित कर्जाची काळजी घेण्यात आली होती असंही त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)