You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्या पत्नीला आयकर विभागाची नोटीस : #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्या पत्नीला इन्कम टॅक्स विभागाची नोटीस
देशाचे निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्या पत्नी नोवेल सिंघल लवासा यांना आयकर विभागानं नोटीस बजावली आहे. नोवेल यांनी भरलेल्या आयकर परताव्यासंदर्भातील काही तपशील विभागानं मागविले आहेत. 'द इंडियन एक्स्प्रेस'नं ही बातमी दिली आहे.
नोवेल या माजी बॅंकर आहेत. त्या किमान तीन कंपन्यांच्या संचालक पदावरही आहेत. 'मी माझे सर्व कर वेळेवर भरले असून उत्पन्नाचं सर्व विवरण योग्य प्रकारे दिलं आहे,' असं स्पष्टीकरण नोवेल यांनी दिलं आहे.
अशोक लवासा हे निवडणूक आयुक्त आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यावेळेस पाच प्रकरणात अशोक लवासा यांनी मोदी आणि शहांना 'क्लीन चीट' देण्यास आक्षेप घेतला होता.
2. बालाकोटचा तळ पुन्हा सक्रिय- लष्करप्रमुख
"पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलानं उद्ध्वस्त केलेला बालाकोट येथील दहशतवाद्यांचा तळ पुन्हा कार्यान्वित झाला आहे. पाकिस्ताननं या तळाची फेरउभारणी केली," असल्याचं लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी म्हटलं आहे.
तब्बल ५०० अतिरेकी भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत आहेत, असा दावाही रावत यांनी केला आहे. 'स्क्रोल'नं हे वृत्त दिलं आहे.
चेन्नईमध्ये अधिकारी प्रशिक्षण अकादमीत पत्रकारांशी बोलताना रावत यांनी म्हटलं, की काश्मीर खोऱ्यात अशांतता निर्माण करण्याचा या घुसखोरांचा डाव असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे.
घुसखोरांना रोखण्यासाठी सरकारने लष्कराला सर्वाधिकार दिले असून त्या क्षणी जी योग्य वाटेल ती कारवाई करण्याची पूर्ण मुभा दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, निवडणुका जवळ आल्यावरच लष्करप्रमुखांना बालाकोटची आठवण कशी होते, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मजिद मेमन यांनी केला आहे. लष्करप्रमुखांनी सरकारी प्रचारयंत्रणेचा भाग बनू नये, असंही त्यांनी म्हटलं.
3. मुस्लिम पक्षकारांनीही मान्य केलं रामजन्मभूमीचं अस्तित्व
अयोध्या राम मंदिरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीमध्ये मुस्लिम पक्षकारांनी रामजन्मभूमीचं अस्तित्व मान्य केलं आहे. 'एबीपी माझा'नं हे वृत्त दिलं आहे.
राम मंदिरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गेल्या 29 दिवसांपासून सलग सुनावणी सुरू आहे. मुस्लिम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी सुनावणीदरम्यान म्हटलं, की त्या ठिकाणी रामाचा जन्म झाला होता किंवा तिथे राम मंदिर होतं हे आम्ही मान्य करतो. पण त्या ठिकाणी केवळ राम मंदिर असावं हे हिंदू पक्षकारांचं जे म्हणणं आहे, ते आम्हाला मान्य नाही. या देशात जेवढं महत्त्व रामाचं आहे, तेवढंच अल्लाहचंही आहे. याच भावनेवर हा देश उभा राहिला आहे.
4. आता नागरिकांकडे एकच 'युनिव्हर्सल' ओळखपत्र असेल: अमित शाह
आधार, वाहनचालक परवाना, बँक खाते, पासपोर्ट अशा अनेक ओळखपत्रांपेक्षा नागरिकांकडे बहुपयोगी असे एकच ओळखपत्र असायला हवे, असा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी मांडला. 'लोकसत्ता'नं यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
दिल्लीतील जनगणना भवनाच्या नवीन वास्तूच्या भूमिपूजन कार्यक्रमात शाह यांनी ही भूमिका मांडली.
"एका व्यक्तिची विविध प्रकारची माहिती एकाच कार्डमध्ये साठवलेली असेल तर ते अधिक उपयुक्त ठरू शकेल. अर्थात त्यासाठी जनगणनेची माहिती डिजिटल स्वरूपात साठवली गेली पाहिजे. हे एक क्रांतिकारी पाऊल असेल," असं शाह यांनी म्हटलं.
यासाठी 2021 साली होणारी जनगणना ही डिजिटल पद्धतीनं केली जाणार असून त्यासंबंधी एक स्वतंत्र अॅप तयार करण्यात येणार असल्याचं शाह यांनी सांगितलं.
5. बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, ग्राहकांना दिलासा
बँक कर्मचाऱ्यांनी 26 आणि 27 सप्टेंबरला पुकारलेला संप अखेर मागे घेण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारनं घेतलेल्या बँकांच्या विलीनीकरणाच्या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला होता. 'हिंदुस्तान टाइम्स मराठी'नं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
बँक कर्मचारी संघटनेचे नेते आणि अर्थसचिव राजीव कुमार यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.
25 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून बँक कर्मचारी संपावर जाणार होते. या संपात ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोशिएशन, इंडियन बँक ऑफिसर्स काँग्रेस आणि नॅशनल ऑर्गनायजेशन बँक ऑफिसर्स या संघटनांचा समावेश होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)