You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मन की बातः आणीबाणी लादल्यानंतर लोकांच्या मनात आक्रोश होता
दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रं हातात घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा 'मन की बात'द्वारे लोकांशी संवाद साधला. रविवारी (30 जून) पंतप्रधानांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिली 'मन की बात' प्रसारित करण्यात आली.
"आम्हाला मन की बातची आठवण येत होती, असं सांगणारे अनेक संदेश गेल्या काही काळात मला येत होत होते. हे ऐकल्यावर किंवा वाचल्यावर बरं वाटतं. आपलेपणाची जाणीव होते. हा माझा व्यक्तिकडून समष्टीकडे जाण्याचा प्रवास आहे," असं पंतप्रधानांनी आपल्या 'मन की बात'मध्ये म्हटलं.
नरेंद्र मोदींनी सांगितलं, की 'मन की बात'साठी मला अनेक पत्र, मेसेज, कॉल येतात. परंतु त्यामध्ये तक्रारीचा सूर खूप कमी असतो. गेल्या पाच वर्षांत कोणी स्वतःसाठी काही मागितल्याचंही मला आठवत नाही. देशाच्या पंतप्रधानांना एखादी व्यक्ती पत्र लिहित आहे, पण स्वतःसाठी काही मागत नाहीये, यातून देशातील कोट्यवधी लोकांची भावना किती उदात्त आहे, हे दिसून येतं.
मन की बातमधील काही महत्त्वाचे मुद्दे-
- आणीबाणीला झालेला विरोध हा केवळ राजकीय नव्हता. राजकीय नेते, तुरुंगाच्या भिंती किंवा आंदोलनापुरताच आणीबाणीचा विरोध मर्यादित नव्हता. लोकांच्या मनात एक आक्रोश होता. लोकशाहीची गळचेपी झाल्याची वेदना प्रत्येकाच्या मनात होती. सकाळ-संध्याकाळ जेव्हा पोटभर जेवण मिळतं, तेव्हा भूक काय असते याची जाणीव होत नाही. तसंच लोकशाहीनं तुम्हाला दिलेल्या अधिकारांचं जेव्हा हनन होतं, तेव्हाच त्या अधिकारांची किंमत कळते.
- भारतात 61 कोटींहून अधिक लोकांनी या निवडणुकीत मतदान केलं. जगाचा विचार केला तर काही देशांच्या लोकसंख्येहून अधिक लोकांनी भारतात मतदान केलं आहे. आपली लोकशाही किती व्यापक आहे, हेच यातून दिसून येतं.
- आज संसदेमध्ये 78 महिला आहेत. हे एक रेकॉर्ड आहे. मी निवडणूक आयोग आणि निवडणुकीच्या प्रक्रियेशी संबंधित प्रत्येक व्यक्तिचं अभिनंदन करतो. देशातील मतदारांनाही माझा सलाम.
- सामूहिक प्रयत्नांद्वारे पाण्याचा प्रश्न सुटू शकेल. हा प्रश्न सोडवण्यासाठी देशातल्या विविध भागांमध्ये प्रयत्न सुरु आहेत. त्या सर्वांचं पाणी वाचवणं हे सामुहिक लक्ष्य आहे. पाण्याचं महत्त्व समजावून देण्यासाठी आणि पाणी वाचवण्यासाठी कोणती पावलं उचलावीत हे सांगण्यासाठी मी सर्व गावांच्या प्रमुखांना पत्र लिहिलं आहे. पाण्यासंबंधी आता लोकांमध्ये जागरूकता निर्माण होत आहे, हे पाहून मला आनंद वाटतो.
- पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊनच जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. या मंत्रालयामुळे पाण्यासंबंधी निर्णय घेण्याला गती येणार आहे.
- कोणत्याही स्वागत समारंभात फुलांऐवजी आपण पुस्तकं देऊ शकतो. माझ्या आग्रहामुळं आता अनेक ठिकाणी लोक मला पुस्तकं भेट द्यायला लागले आहेत.
- काही दिवसांपूर्वी मला कोणीतरी 'प्रेमचंद यांच्या लोकप्रिय कथा' हे पुस्तक भेट दिलं होतं. प्रवासामध्ये मी त्यांच्या काही कथा वाचल्या. प्रेमचंद यांनी आपल्या कथांमधून समाजाचं जे यथार्थ चित्रण केलं आहे, ते वाचताना तुमच्या डोळ्यांसमोर त्याचं चित्र उभं राहतं.
- गुजरातमध्ये 'वांचे गुजरात' अभियानांतर्गत लाखोंच्या संख्येनं प्रत्येक वयोगटातील व्यक्तिनं पुस्तकं वाचण्यात सहभाग घेतला होता. हा एक सफल प्रयोग होता पुस्तकांना आपल्या दैनंदिन व्यवहारात नक्की स्थान द्या. तुम्हाला त्यातून आनंद मिळेल.
- मोठ्या उत्साहानं योग दिवस साजरा केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे तसंच जगभरातील लोकांचे आभार मानतो. 21 जूनला पुन्हा एकदा मोठ्या उत्साहानं एकेका कुटुंबातील तीन-चार पिढ्यांनी एकत्र येऊन योग दिवस साजरा केला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)