You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
#HisChoice : एकट्याने मुलीला वाढवणाऱ्या बापाची गोष्ट
घटस्फोटानंतर एकट्याने मुलीला वाढवणाऱ्या एका खंबीर बापाची ही आहे कहाणी. त्यानंच सांगितलेली.
तिने स्वत:ला बाथरुममध्ये कोंडून घेतलं तेव्हा खूप रात्र झाली होती.
माझी मुलगी त्यावेळी झोपली होती आणि आवाज वाढवून तिला त्रास द्यावा असं मला वाटलं नाही.
मी खूप घाबरलो होतो. मी खूप वेळा विचारूनही तिने दरवाजा उघडला नाही. मी तिचा फोन उचलायला गेलो तेव्हा तिने फोन हातातून हिसकावून घेतला आणि ती बाथरुममध्ये गेली.
दरवाजा आतून बंद करून घेतला. घाबरून मी दरवाजा तोडला आणि तिच्या हातातून फोन हिसकावून पाहू लागलो.
तिला एका नंबरवरून मेसेज आला होता आणि त्याच नंबरहून काही मिस्ड कॉलही आले होते.
मेसेजमध्ये लिहिलं होतं- मला फोन करू नकोस, फोन भावाकडे आहे.
हा मेसेज वाचून मी आणखी घाबरलो. पण मी तिला काही बोललो नाही. पुन्हा चिडून ती स्वत:ला बाथरुममध्ये कोंडून घेईल किंवा जीवाचं काही बरंवाईट करेल, अशी भीती माझ्या मनात होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी माझे दोन मित्र आमच्या घरी आले. ते तिच्याशी बोलू लागले. माझी बायको या मित्रांना ओळखत होती.
कारण आमची भांडणं व्हायची तेव्हा ते सोडवण्यासाठी हीच मित्रमंडळी आमच्या घरी हजर होत असत.
ती मला आणि मुलीला सोडून गेली
पत्नीने माझ्यासोबत राहावं, मुलीचा विचार करावा, वेगळं झाल्यानंतर आपलं घरच तुटेल असं माझे मित्र बायकोला सांगत होते. मात्र तिने अंतिम निर्णय घेतला होता.
तिने स्पष्ट सांगून टाकलं की हे आयुष्य असंच घालवणं तिच्यासाठी आता शक्य नाही.
दुसऱ्याच दिवशी तिने घर सोडलं. पण ती मुलीला घेऊन गेली नाही.
तिने मला आणि मुलीला दोघांनाही सोडलं.
मी आतल्या आत उन्मळून पडलो. मला खूप एकटं वाटत होतं.
बायको नाही पण तीन वर्षांची मुलगी तरी माझ्याबरोबर आहे याचा आधार होता.
आमचं लव्ह मॅरेज झालं होतं. आमच्या दोघांच्याही घरून विरोध होता. लग्नाला संमती मिळवण्यासाठी आम्हाला प्रचंड संघर्ष करावा लागला होता.
आमची मुलगी जेमतेम तीन महिन्यांची असतानाही ती एकदा घर सोडून गेली होती. त्यावेळी मुलीला घेऊन गेली होती. मात्र एका मैत्रिणीने समजावल्यानंतर ती घरी परत आली होती.
यावेळी तिचा निर्धार पक्का होता. थोड्याच दिवसांत घटस्फोटाचे कागद आमच्या घरी पोहोचले.
घटस्फोटाच्या सुनावणीवेळी तिने कोर्टात स्पष्ट सांगितलं की मुलीची देखभाल मी चांगल्या प्रकारे घेऊ शकतो.
मुलगी आमच्याकडे असेल याचा मला आणि आईबाबांना आनंद झाला होता.
मुलीची जबाबदारी एकट्याने सांभाळली
आम्ही वेगळे झाल्यानंतरच्या काही दिवसात मला आम्ही एकत्र आल्याचं वाटत असे. कधीतरी ती परत येईल आणि मुलीला माझ्यापासून हिरावून घेईल, अशी भीती मला वाटत असे.
जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा मुलीच्या संगोपनाच्या जबाबदाऱ्या आम्ही एकमेकांत वाटून घेतल्या होत्या. पण आता सगळी जबाबदारी माझी होती.
माझे आईबाबा मदतीला होते. मुलीला आईची उणीव भासता कामा नये असं मला वाटायचं.
मुलीला लहानपणापासून ऐतिहासिक ठिकाणी जायला आवडू लागलं. मग मी तिला घेऊन अशाठिकाणांना भेटी देऊ लागलो.
फिरताना कोणी तिला विचारत असे की तुझी आई कुठे आहे? तेव्हा तिच्याकडे उत्तर नसे.
मला कोणी उलटसुलट बोलू लागलं किंवा मला बोल लावू लागलं तर ती माझी बाजू घेत असे. मी अस्वस्थ असताना मला आधार देत असे.
मात्र तिने कधी आईबद्दल मला विचारलं नाही. मात्र आई हा शब्द उच्चारल्यानंतर तिचं निरुत्तर होणं मला जाणवत असे.
तिची आई बरोबर असती तर ती अधिक मोकळेपणाने वावरू शकली असती.
काही वर्षांपूर्वी माझा मोठा अपघात झाला होता. मला खूप लागलं होतं. हॉस्पिटलमध्ये आणि घरीही असताना तिने मला सावरायला मदत केली.
ती माझा भक्कम आधार होती. तीच माझ्या औषधगोळ्यांचं बघत असे. ती कायम माझ्याबरोबर असे.
केवळ एवढंच नाही तर ती आजीच्या तब्येतीची काळजी घेऊ लागली. माझ्या आईला डायबेटिस आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ती आजीला इन्शुलिनचा डोस देते.
दुसरं लग्न केलं नाही
अनेकांनी मला दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला होता. बायकोला विसरणं किंवा तिने दिलेला घटस्फोट विसरणं मला शक्य नव्हतं. आमचं लव्ह मॅरेज झालं होतं.
आता माझी मुलगी 13 वर्षांची झाली आहे. आता तिने माझ्याबरोबर फिरू नये असं तिच्या आजीआजोबांना वाटतं.
कारण बाहेर असताना तिला मासिक पाळीचा त्रास सुरू झाला तर काय करावं हे मला कळणार नाही असं घरच्यांना वाटतं.
मात्र मी यासाठी तयार आहे. तिची मासिक पाळी सुरू झाली तर मी त्याच्याविषयी तिला माहिती देईन. दर महिन्याचे काही दिवस मुलींना मासिक पाळी येते, ती का येते हे समजावून सांगेन.
तिला कल्पना चावलासारखं अंतराळवीर व्हायचं आहे. ती अभ्यासात खूप हुशार आहे.
दुसरं लग्न न करण्यामागचं कारण म्हणजे मी मुलीला वेळ देऊ शकलो नसतो हेच.
मात्र मी दुसऱ्या लग्नाचा विचार केला तर मुलगी मला रोखणार नाही, उलट मला पाठिंबाच देईल याची मला खात्री आहे.
दुसरं लग्न केलं तर मी आणि माझ्या मुलीमध्ये आणखी एका स्त्री असेल याची मला भीती होती. आमच्यामध्ये काही गैरसमज निर्माण होतील की काय असंही मला वाटतं.
समजा मी दुसरं लग्न केलं आणि दुसऱ्या बायकोने मुलीला समजून घेतलं नाही. तिला काहीबाही बोलली तर मला खूप वाईट वाटेल.
माझं दुसरं लग्नही धोक्यात येईल. मी दुसऱ्यांदा लग्न मोडण्याचं दु:ख पचवू शकणार नाही. म्हणूनच मी दुसरं लग्न केलं नाही.
माझ्या जगण्याचा उद्देश एकच आहे- माझी मुलगी. ती माझं सर्वस्व आहे. माझा आनंद, समाधान सगळं काही तीच आहे.
(ही एका पुरुषाच्या आयुष्यातील सत्य घटना आहे. बीबीसी प्रतिनिधी ए.डी.बालासुब्रमण्यम यांनी त्यांच्याशी बातचीत केली. त्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. ही मालिका सुशीला सिंह यांची निर्मिती आहे. इलस्ट्रेशन्स पुनीत बरनाला यांनी रेखाटली आहेत.)
(ही #HisChoice मालिकेतली सहावी बातमी आहे. #HisChoice या सीरिजद्वारे आम्ही अशा पुरुषांच्या मनाचा वेध घ्यायचा प्रयत्न करत आहोत ज्यांनी एका ठराविक सामाजिक साच्यात अडकून पडण्यास नकार दिला.)
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)