जैन मुनी तरुण सागर यांचं दीर्घ आजाराने निधन

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

जैन मुनी तरुण सागर यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. ते 51 वर्षांचे होते.

गेल्या काही दिवसांपासून ते काविळीने आजारी होते. त्यांना दिल्लीच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या गुरुवारपासून त्यांची प्रकृती खालावली होती.

शुक्रवारी त्यांनी अन्नत्याग करून संथारा घेतल्याचं वृत्त होतं. आणि आज पहाटे 3 वाजून 18 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं वृत्तसंस्थांनी सांगितलं आहे.

शनिवारी दुपारी तीन वाजता दिल्लीतील मेरठ महामार्गावर असलेल्या तरुणसागरम तीर्थ इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

त्यांच्या जाण्यामुळे देशभरातील जैन धर्मीय तसंच मोठ्या नेते शोक व्यक्त करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुण सागर यांच्या निधनाच्या बातमीवर दुःख व्यक्त केलं आहे. "आम्ही त्यांना त्यांच्या आदर्श आचरण आणि करुणेसाठी आणि समाजाप्रति त्यांच्या योगदानासाठी नेहमी लक्षात ठेवू. त्यांची शिकवण आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहील."

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही तरुण सागर यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली.

ते म्हणतात, "जैन मुनी तरुण सागर महाराज यांच्या अकाली समाधी घेण्याच्या बातमीने मी स्तब्ध झालो आहे. ते प्रेरणास्रोत, दयेचा सागर आणि करुणेचे आगार होते. त्यांच्या जाण्याने भारतीय संत समाजात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. मी मुनी महाराजांच्या चरणी श्रद्धांजली अर्पण करत आहे."

पूर्व दिल्लीचे खासदार महेश गिरी यांनीसुद्धा ट्विटरवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, "तरुण महाराजांच्या निधनाची बातमी आज सकाळी कळली. राष्ट्रवाद, प्रामाणिकपणा आणि सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या या महान तत्त्वज्ञावाला आणि संताला मी श्रद्धांजली वाहतो.

आपले 'कडवे बोल' या प्रवचनमालेसाठी ओळखले जाणारे तरुण सागर देशभरात नेतेमंडळीमध्ये लोकप्रिय होते. त्यांनी एकदा हरियाणा विधानसभेत दिलेल्या प्रवचनावरून वाद निर्माण झाला होता. तेव्हा त्यांनी स्त्री भृणहत्या, भारत पाकिस्तान संबंध आणि कौटंबिक हिंसाचारावर भाष्य केलं होतं, जे काही प्रमाणात वादग्रस्त ठरलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)