You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोशल : 'मुनी झाले म्हणजे शहाणपण आलंच असं नाही'
जैन मुनी विश्रांत सागर यांनी महिलांचा उल्लेख 'वस्तू' असा करत महिलांनाच बलात्कारासाठी जबाबदार धरले...त्यावर बीबीसी मराठीच्या वाचकानी व्यक्त केलेली मतं.
राजस्थानच्या सिकरमध्ये पत्रकारांशी बोलताना जैन मुनी विश्रांत सागर यांनी महिलांचा उल्लेख 'वस्तू' म्हणून करत, महिलांवर होणाऱ्या अत्याचारात 95 टक्के चूक महिलांचीच असते असं वक्तव्य केलं होतं. यावर बीबीसी मराठीनं होऊ द्या चर्चामध्ये वाचकांना त्यांची मतं विचारली होती. यातील काही निवडक आणि संपादित प्रतिक्रिया इथं देत आहोत.
गजानन शिंदे यांच्या मते, अगदी जन्म झालेल्या मुलीपासून वृध्द महिलेवर बलात्कार होतात. प्राण्यावरसुद्धा बलात्कार होत आहेत. मग त्यातसुद्धा प्राण्यांची, लहान मुलींची चूक आहे का? बलात्कार मेंदूतून होत असतो. त्याला स्त्री जबाबदार नसते. स्त्रीला हवं तसं राहण्याचं स्वातंत्र्य आहे. स्वतःचे विचार बदलले की सर्व बदलते. असल्या महाराज लोकांना ऐकायचे का दुर्लक्ष करायचे हे समाजावर आहे.
विनोद सामंत म्हणतात, "आम्ही भारतीय लोक महिला, पुरूष या लिंगभेदापलीकडे जाऊन कुणाकडेही निव्वळ एक सजीव व्यक्ती म्हणून पाहूच शकत नाही. जगातल्या आजपर्यंतच्या सर्वच धर्मांनी आणि सर्व धर्मांच्या मार्तंडांनी सर्वांत आधी महिलांना धार्मिक गुलामीत लोटलं आहे. त्याच पध्दतीने हे मुनी आणखी काही वेगळे बोलले असते तरच ती वेगळी बातमी म्हणता आली असती. तात्पर्य : एक समाज म्हणून आपण अत्यंत ढोंगी, स्वार्थी, बोटचेपे आणि आधुनिक लोकशाहीवर एक मोठा कलंक आहोत."
कौस्तुभ जंगम यांनी उपहासात्मक मत व्यक्त केले. ते म्हणतात, "चूक महिलांचीच असते. खरं तर त्यांनी निमुटपणे सगळं सहन केलं पाहिजे. म्हणजे अत्याचार करण्याची वेळच येणार नाही आणि या महान भारताची प्रतिमा जगातही डागाळली जाणार नाही. पण आजकालच्या महिला या मुक्तीच्या आणि स्त्री स्वातंत्र्यांच्या विचारांनी वहावत गेलेल्या आहेत आणि मग त्या अत्याचारांना विरोध करतात आणि मग भरतभूवरील नरपुंगवांचा नाईलाज होतो." त्यांनी पुढे म्हटलं की, " आपल्यालाही आई, बहीण, पत्नी, मुलगी आहे, याचाही त्यांना सोयिस्करपणे विसर पडलेला असतो. या अशाच मनोवृतीचे प्रदर्शन जैन स्वामी विश्रांत सागर यानी केलेलं दिसतं. त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे."
सुशीलकुमार बुरकूल म्हणतात की, "मी स्वतः काही अतिउत्साही मुली, महिलांना मुलांबरोबर, पुरुषांबरोबर खुलेआम वात्रट चाळे करताना पाहिलं आहे. काहींना तर हटकलंही आहे आणि स्वतःचा अपमान करून घेतला आहे. कारण मुलगी किंवा महिलाच, मी माझ्या मर्जीनं आले आहे, तुम्हाला काय करायचंय? असं उत्तर देतात."
अश्विनी दाते यांच्या मते, "मुनीच असं बोलले तर त्यांना मानणारे भाबडे लोक काय म्हणतील?"
राहुल सोनवणे म्हणतात, "जी व्यक्ती स्त्रीचा सन्मान करू शकत नाही, तीच व्यक्ती बलात्काऱ्याची बाजू घेऊ शकते."
बाबू डिसूजा म्हणतात, "मुनी झाले म्हणजे शहाणपण आलंच असं नाही. ते स्वतः स्त्रीच्या उदरातून बाहेर आले."
संदीप बोऱ्हाडे म्हणतात, "सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र आणि सम्यक दर्शन ही जैन धर्माची शिकवणूक आहे. यातील एक तरी गुण आचरणात आणला असता तरी ते असं बोलले नसते."
एस. एन. जाधव यांच्यामते, "भारतात अध्यात्म हा सध्या मोठा व्यवसाय झाला आहे. आईवडीलांपेक्षा अशा बाबांना लोक श्रेष्ठ आणि दैवत मानायला लागतात."
मुनींच्या विधानावर वाचकांनी मतं तर मांडलीच शिवाय आपण विज्ञानवादी कधी होणार, असा सवालही उपस्थित केला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)