'कमी तेही गढूळ पाणी, पिण्यासाठी विकत घ्यावं लागतं', पाणी कपातीमुळं मुंबईकरांवर असा होतोय परिणाम

पाणीपुरवठा

फोटो स्रोत, Shardul Kadam

    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

"आधीच उष्णतेमुळे त्रास होत आहे. त्यात पाणी कमी मिळत असल्यानं घर चालवणं अवघड होत आहे. टँकर मागवावे लागत असल्याने आम्ही हैराण आहोत."

दक्षिण मुंबईतील शिवडीच्या कोळसा बंदर परिसरात राहणाऱ्या शिल्पा खापरे यांची ही प्रतिक्रिया. दिवस सध्या पाण्याच्या वेळापत्रकाभोवतीच फिरतो, असं त्या सांगतात.

मुंबई महानगरपालिकेने 10 टक्के पाणी कपात लागू केल्यापासून शहरात पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यामुळं अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वाढता उकाडा आणि लांबलेला पाऊस यामुळं मुंबईत धरणांतील पाणीसाठा तळ गाठत आहे. त्यामुळं पाणीटंचाईची चिंता आता अनेक कुटुंबांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनली आहे.

पाणी संकटाचा सामना करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पाणी कपातीसह काही निर्बंध लागू केले आहेत.

आता चांगला पाऊस पडला तरच मुंबईच्या पाणीसंकटाला काहीसा दिलासा मिळू शकतो.

झोपडपट्टी ते उंच इमारती, सगळीकडेच पाण्याची समस्या

मुंबईत सध्या पाणी कपातीमुळं शहर आणि उपनगर दोन्ही भागांमध्ये झोपडपट्ट्यांपासून ते उंच इमारतींपर्यंत सगळीकडे पाण्याच्या समस्या भेडसावत असल्याचं नागरिक सांगत आहेत.

मुंबईतील गिरगाव, वरळी, शिवडी आणि इतर परिसरांमध्ये पूर्वी 2 तास येणारं पाणी आता दीड तासावर आलं आहे. तसंच पाण्याचा दाबही कमी असल्याचं स्थानिक सांगतात.

पालिकेनं केलेल्या कपातीपेक्षा प्रत्यक्षात अधिक परिणाम जाणवत असल्याचं काही मुंबईकरांचं म्हणणं आहे.

पाणी संकटाचा सामना करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पाणी कपातीसह काही निर्बंध लागू केले आहेत.

फोटो स्रोत, Shardul Kadam

फोटो कॅप्शन, पाणी संकटाचा सामना करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पाणी कपातीसह काही निर्बंध लागू केले आहेत.

उपनगरातील कुर्ला, बांद्रा, सांताक्रूझ, विक्रोळी, घाटकोपर या भागांमध्ये नागरिकही अपुरा पाणीपुरवठा, कमी दाबानं येणारं पाणी आणि काही ठिकाणी गढूळ पाण्याच्या तक्रारी करत आहेत.

पाण्याच्या समस्येची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही मुंबईतील विविध भागांमध्ये फिरलो. त्यात उपनगरातील सांताक्रूझ पूर्व परिसरातही भेट दिली.

सांताक्रूझ पूर्वमधील सुब्रमण्यम नगरमध्ये राहणाऱ्या 58 वर्षीय वैशाली कांबळे आम्हाला भेटल्या.

त्या सांगत होत्या, "आम्ही सध्या नळाचं पाणी पिण्यासाठी वापरत नाही. बाहेरून पाणी विकत आणतो. कारण नळाला येणारं पाणी अनेकदा गढूळ असतं. पाणी येतं तेही कमी. पाण्याविना घर चालवणं अवघड झालं आहे."

मुंबई महानगरपालिकेने 10 टक्के पाणी कपात लागू केल्यापासून पाण्याची समस्या भेडसावत असून घरातील पाण्याचा वापर जपून करावा लागत असल्याचं मुंबईच्या अनेक भागांतील नागरिक सांगत आहेत.

फोटो स्रोत, Shardul Kadam

फोटो कॅप्शन, मुंबई महानगरपालिकेने 10 टक्के पाणी कपात लागू केल्यापासून पाण्याची समस्या भेडसावत असून घरातील पाण्याचा वापर जपून करावा लागत असल्याचं मुंबईच्या अनेक भागांतील नागरिक सांगत आहेत.

जून महिना अर्धा संपला तरी अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा झपाट्याने घटला आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने सर्वसामान्यांसाठी 10 टक्के, तर औद्योगिक आणि व्यावसायिक वापरासाठी 20 टक्के पाणी कपात लागू केली आहे.

ऊन आणि पाणीटंचाईचा दुहेरी फटका?

दक्षिण मुंबईतील शिवडी परिसरात राहणाऱ्या शिल्पा खापरे सांगतात की, पाणी कपातीचा परिणाम आता थेट दैनंदिन जीवनावर होत आहे.

आधीच वाढत्या उष्णतेमुळं नागरिक त्रस्त आहेत. त्यात पाणीपुरवठ्याचे प्रमाण कमी झाल्याने घरातील कामांचं नियोजन करणं अवघड झालं आहे.

पाणी कपात लागू झाल्यानंतर शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा, गढूळ पाणी आणि वाढत्या खर्चाचा सामना करावा लागत आहे.

फोटो स्रोत, Shardul Kadam

फोटो कॅप्शन, पाणी कपात लागू झाल्यानंतर शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा, गढूळ पाणी आणि वाढत्या खर्चाचा सामना करावा लागत आहे.

मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साठवून ठेवण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. काही ठिकाणी कमी दाबानं पाणी येत असल्याच्या तक्रारी आहेत, तर काही भागांमध्ये पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

यासंदर्भात सांताक्रूझ परिसरात राहणारे नितीन कांबळे म्हणाले, "आम्हाला आधीच पाणी कमी येत आहे. पाणी आम्ही लॅबमध्ये तपासलं असता ते पिण्यायोग्य नसल्याचं दिसून आलं. या परिस्थितीमुळे आम्ही वैतागलो आहोत. प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला हवं."

मुंबईच्या तलावांमध्ये किती पाणी शिल्लक आहे?

मुंबई महानगरपालिकेच्या 18 जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये केवळ 10.19 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

मुंबईला दररोज सुमारे 4,664 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. उपलब्ध साठा पाहता, सध्याचं पाणी पुढील 30 ते 35 दिवस पुरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

वाढत्या उकाड्यात आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईत धरणांतील पाणीसाठा तळ गाठत आहे. त्यामुळे पाणीटंचाईची चिंता आता अनेक कुटुंबांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनली आहे.

फोटो स्रोत, Shardul Kadam

फोटो कॅप्शन, वाढत्या उकाड्यात आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईत पाणीटंचाईची चिंता आता अनेक कुटुंबांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनली आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिका प्रशासनाने जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार मुंबईत 15 मे 2026 पासून 10 टक्के पाणी कपात लागू केली आहे.

धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

पावसाळा लांबल्याने हा पाणीसाठा अधिकाधिक दिवस टिकवून ठेवण्याचं आव्हान महानगरपालिकेसमोर आहे.

पाणी कपातीचा परिणाम कोणावर?

पाणीटंचाईचा परिणाम केवळ झोपडपट्ट्या किंवा जुन्या वस्त्यांपुरता मर्यादित नाही. मुंबईतील अनेक गृहनिर्माण संस्थांना अतिरिक्त टँकर मागवावे लागत आहेत. त्यामुळे सोसायट्यांचा खर्च वाढला असून त्याचा आर्थिक भार रहिवाशांवर पडत आहे.

काही भागांमध्ये नागरिकांनी पिण्यासाठी वेगळं पाणी विकत घेण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई उपनगरातील गोरेगाव, अंधेरी, नेहरूनगर, घाटकोपर, विक्रोळी आणि इतर परिसरांमधील काही सोसायट्यांना अतिरिक्त पाण्यासाठी टँकर मागवावे लागत असल्याचं स्थानिकांनी सांगितलं.

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याचा साठा अधिक काळ टिकवण्यासाठी अतिरिक्त निर्बंध लागू केले आहेत.

फोटो स्रोत, Shardul Kadam

फोटो कॅप्शन, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याचा साठा अधिक काळ टिकवण्यासाठी अतिरिक्त निर्बंध लागू केले आहेत.

या संदर्भात गोरेगावमधील रॉयल पाम सोसायटीच्या सोनल रानडे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या, "आम्हाला रोज 10 टँकर पाण्याचे मागवावे लागतात. साधारण एक टँकर ₹1,400 ला मिळतो. त्यामुळे सदस्यांच्या खिशाला मोठा भुर्दंड पडत आहे. पाण्याची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून आहे आणि आता या परिस्थितीत ती अधिकच गंभीर झाली आहे."

महापालिकेच्या उपाययोजना काय?

दरम्यान, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याचा साठा अधिक काळ टिकवण्यासाठी अतिरिक्त निर्बंध लागू केले आहेत.

10 टक्के पाणीकपातीबरोबरच पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही पालिकेने दिला आहे.

काही भागांमध्ये नागरिकांनी पिण्यासाठी वेगळं पाणी विकत घेण्यास सुरुवात केली आहे.

फोटो स्रोत, Shardul Kadam

फोटो कॅप्शन, काही भागांमध्ये नागरिकांनी पिण्यासाठी वेगळं पाणी विकत घेण्यास सुरुवात केली आहे.

याशिवाय 17 जूनपासून बांधकामांसाठीच्या जलजोडण्या तात्पुरत्या बंद करण्यात आल्या असून नवीन जलजोडण्यांनाही स्थगिती देण्यात आली आहे.

जलतरण तलावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून औद्योगिक, व्यापारी आणि स्पोर्ट्स क्लब आस्थापनांच्या पाणी वापरात 20 टक्के कपात करण्यात आली आहे.

य्यम वापरासाठी प्रक्रिया केलेलं सांडपाणी, विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याचा वापर वाढवण्याच्या सूचनाही विविध आस्थापनांना देण्यात आल्या आहेत.

दिलासा कधी मिळणार?

एल निनोचा प्रभाव, पावसाला होणारा विलंब आणि हवामानातील बदल यामुळे यंदा पाणीसाठ्यावर ताण निर्माण झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यास मुंबईच्या पाणीटंचाईच्या चिंतेला दिलासा मिळू शकतो.

मात्र पाऊस पडत नाही तोपर्यंत मुंबईकरांसाठी पाण्याचा प्रश्न कायम राहणार, अशीच स्थिती आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.