मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दरड कोसळली, रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत

मिसिंग लिंक सेक्शनजवळ दरड कोसळली

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, मिसिंग लिंक सेक्शनजवळ दरड कोसळली
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

सलग सहाव्या दिवशी राज्यात पावसाचा जोर कायम आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंक सेक्शनवर दरड कोसळल्याने मुंबई-पुणे वाहतूक प्रभावित झाली आहे. पुढील सूचना येईपर्यंत मुंबई-पुणे प्रवास टाळावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

कर्जत आणि लोणावळा दरम्यानच्या घाट विभागात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई विभागाच्या 'अप मेन लाइन'वर ठाकूरवाडी आणि मंकी हिल लूप केबिन दरम्यान दरड कोसळली आहे.

त्यामुळे काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द झालेल्या रेल्वेंची यादी येथे वाचू शकता.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

भूस्खलन आणि सततच्या मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग (एक्सप्रेसवे) आणि जुना मुंबई-पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत दोन्ही दिशांची (पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे) वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

प्रशासनाने नागरिकांना विनंती आहे की, पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे आणि मुंबई दरम्यान कोणताही प्रवास करू नये. ज्यांचा प्रवासाचा बेत आहे, त्यांनी आपला प्रवास पुढे ढकलावा आणि सरकारी यंत्रणांकडून दिल्या जाणाऱ्या वाहतूकविषयक सूचनांचे पालन करावे.

लोणावळ्यात 24 तासात 670 मिमी पाऊस, धरण भरले, पाणी पातळीत झपाट्याने वाढ

लोणावळा धरण 100 टक्के भरले आहे. या भागात पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

लोणावळा धरणाच्या अनियंत्रित सांडव्यातून इंद्रायणी नदीत विसर्ग सुरू झालेला आहे. पाऊस चालू/वाढत राहिल्यास आणि पाण्याची आवक वाढत गेल्यास विसर्ग पुढे चालू राहील.

सर्वांना विनंती करण्यात येते की, कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात आणि सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असं आवाहन टाटा पॉवरचे सुरेश कोंडूभैरी यांनी केले आहे.

मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना 6 जुलैला सुट्टी जाहीर

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी (6 जुलै) मुसळधार पाऊस व सोसाट्याचे वारे वाहणार आहे. तसेच पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईतील शासकीय, खासगी आणि महानगरपालिका शाळा, महाविद्यालयांना सोमवारी (6 जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनदेखील बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट; शाळांना सुट्टी जाहीर

हवामान विभागाने 6 जुलैला पुणे जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

नागरिकांनाही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, नदी-नाले व धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे. तसेच स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन डुडी यांनी केले आहे.

मानखुर्दमध्ये घर कोसळून 6 जणांचा मृत्यू

मुंबईतील मानखुर्द येथे जनता नगरच्या 3 मजली चाळीचा काही भाग कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1 जण जखमी आहे.

मुंबईतील मानखुर्द येथे जनता नगरच्या 3 मजली चाळीचा काही भाग कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

फोटो स्रोत, X/Mayor of Mumbai

फोटो कॅप्शन, मुंबईतील मानखुर्द येथे जनता नगरच्या 3 मजली चाळीचा काही भाग कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बचाव आणि मदतकार्यही सुरू आहे. याबाबत एएनआय आणि आयएएनएस या वृत्तसंस्थांनी वृत्त दिलं आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या महापौर कार्यालयानेही याबाबत मध्यरात्री माहिती देताना म्हटलं की, मानखुर्दमध्ये घर कोसळून 5 बालकांसह 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

महापौर कार्यालयाने म्हटलं, "मुंबईतील मानखुर्द भागात जनता नगर परिसरात रविवारी (5 जुलै) रात्री 8.30 वाजता अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. जनता नगर परिसरात असलेल्या 3 मजली कच्चा चाळीतील 2 ते 3 घरे अचानक कोसळली. या दुर्घटनेत 5 लहान मुले आणि एक स्त्री अशा एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 जण जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत."

"घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, महानगरपालिकेचे विभाग कार्यालयातील कर्मचारी आणि 108 रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आणि तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये रवाना करण्यात आले," अशी माहिती देण्यात आली.

"या दुर्घटनेतील बाधितांना गोवंडी स्थित पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय आणि घाटकोपर स्थित राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते," असंही त्यांनी नमूद केलं.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 2

महापौर कार्यालयाने पुढे म्हटलं, "डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शताब्दी रुग्णालयात दाखल 1 महिला, 3 लहान मुली आणि 1 लहान मुलगा अशा 5 जणांना मृतावस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. तसेच, राजावाडी रुग्णालयात 1 लहान मुलगा मृतावस्थेत आणण्यात आला आणि 1 तरुण जखमी अवस्थेत दाखल झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉक्टरांनी महापौरांना दिली."

"या घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी गोवंडी स्थित पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात जाऊन मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन करून धीर दिला. यावेळी आमदार अबू असीम आझमी, रुक्साना सिद्दिकी हेही उपस्थित होते," असंही त्यांनी नमूद केलं.

आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक :

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC): 1916

पालघर: 02525-297474 / +91 82379 78873

ठाणे महानगरपालिका: 022-25364779 / 022-25301740 / +91 93723 38827

ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष: 1800-222-108 / 8657887101

पनवेल महानगरपालिका: 022-27458040 / 41 / 42

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)