महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम, जाणून घ्या राज्यात कुठे-कुठे रेड अलर्ट जारी

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

महाराष्ट्रात पावसाचा जोर सलग पाचव्या दिवशीही कायम आहे. मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनाचा वेग मंदावला आहे.

भारतीय हवामान विभागाने आजही (5 जुलै) मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला असून आजही अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हा इशारा 6 जुलैपर्यंत लागू राहणार आहे.

मुंबईसह रायगड, नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यांनाही आज पावसाचा 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

प्रतिकूल हवामानामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊ शकतो, असा इशारा प्रशासनाने दिला असून आपत्कालीन परिस्थितीसाठी हेल्पलाइन क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये आयएमडीने रेड अलर्ट जारी केलेल्या भागांची माहिती दिली.

खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, ठाणे, पालघर आणि पनवेलसाठी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांकही त्यांनी पोस्टद्वारे शअर केले.

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 4 ते 6 जुलैदरम्यान मुंबईसह उपनगरात, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.

आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक :

  • बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC): 1916
  • पालघर: 02525-297474 / +91 82379 78873
  • ठाणे महानगरपालिका: 022-25364779 / 022-25301740 / +91 93723 38827
  • ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष: 1800-222-108 / 8657887101
  • पनवेल महानगरपालिका: 022-27458040 / 41 / 42

पावसाची स्थिती पाहता प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.

विशेषतः सखल भागातील रहिवाशांनी अधिक सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कारण मुसळधार पावसामुळे पाणी साचणे आणि स्थानिक पातळीवर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

सततच्या पावसामुळे रायगडमध्ये रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

अंबा नदीनेही धोका पातळी ओलंडली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा, अनावश्यकपणे नदी, पूल किंवा पाण्याजवळ जाणे टाळावे, असं आवाहन केलं आहे.

मुंबईतील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना उद्या सोमवारी (6 जुलै 2026) सुटी जाहीर करण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगराला उद्या सोमवार, दिनांक 6 जुलै 2026 रोजी मुसळधार पावसाचा (Orange Alert) तसेच सोसाट्याचे वारे वाहतील असा इशारा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना उद्या, दिनांक 6 जुलै 2026 रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, शासकीय व खासगी कार्यालये नियमितपणे सुरू राहतील, असंही सांगण्यात आलं आहे.

आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असेदेखील आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईत पावसांत झाड पडून आणखी एका व्यक्तीचा मृत्यू

पावसामुळे झाड पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची आणखी एक घटना मुंबईतील कुर्ला इथे घडली आहे. वांद्रे इथे राहणारे 62 वर्षीय युनूस कुंडावाला कुर्ल्यातील कमानी परिसरात त्यांच्या दुकानात जात होते.

तेव्हा त्यांच्या अंगावर अचानक झाड पडल्याचं सीसीटीव्ही कॅमेरात दिसतं. कुंडावाला यांना स्थानिकांच्या मदतीनं सोडवून हॉस्पिटलात नेण्यात आलं, पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलानं दिली आहे.

झाड पडल्यानं वीजपुरवठा खंडित झाला, तेव्हा स्थानिक रहिवाशांनी काही काळ निदर्शनही केली.

पावसामुळे झाड पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची आणखी एक घटना मुंबईतील कुर्ला इथे घडली आहे.
फोटो कॅप्शन, पावसामुळे झाड पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची आणखी एक घटना मुंबईतील कुर्ला इथे घडली आहे.

5 जुलैला मुंबई आणि उपनगरात 250 पेक्षा अधिक झाडं आणि फांद्या पडण्याच्या घटना घडल्या असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

30 जूनला मुंबईतल्या चेंबूरमध्ये बसवर झाड पडून एका 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता.

यासोबतच आणखी एक घटना गोरेगाव आरे कॉलनी परिसरातील आहे.

मुसळधार पावसात 4 जुलै रोजी झाड पडून अठरा वर्षाचा मुलगा जखमी झाला होता.

उपचारादरम्यान या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती आरे पोलिसांनी दिली आहे. हुसेन सय्यद असं या मुलाचं नाव आहे.

पाच जुलै रोजी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत साधारण मुंबईत आणि उपनगरात 250 पेक्षा अधिक झाड आणि फांद्या पडण्याच्या घटना घडल्या आहेत अशी माहिती पालिकेने दिली आहे.

कुलाब्यात 265.6 मिमी, डोंगरवाडीत 398 मिमी पावसाची नोंद

मुंबईसह राज्यातील घाटमाथा परिसरात गेल्या 24 तासांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मागील 24 तासांत कुलाबा येथे 265.6 मिमी, तर सांताक्रूझ येथे 227.7 मिमी पावसाची नोंद झाली.

या काळात कुलाब्यात किमान तापमान 24.4 अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझमध्ये 24.5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.

भिसे खिंडी रस्त्यात दरड कोसळली आहे.
फोटो कॅप्शन, भिसे खिंडी रस्त्यात दरड कोसळली आहे.

दरम्यान, घाटमाथ्यावरही अतिवृष्टीची परिस्थिती कायम असून अनेक ठिकाणी 200 ते 400 मिमीपर्यंत पाऊस झाला आहे.

माथेरानला मागील 24 तासांत 408 मिमी पाऊस कोसळला आहे. तर, डोंगरवाडी येथे 398 मिमी, भिरा येथे 386 मिमी, ताम्हिणी येथे 310 मिमी, खोपोली येथे 285 मिमी, शिरगाव येथे 275 मिमी, दावडी येथे 268 मिमी, लोणावळा येथे 263 मिमी, अंबोना येथे 249 मिमी, वालव्हण येथे 229 मिमी आणि कोयना (नवजा) येथे 210 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

सततच्या पावसामुळे घाटमाथा आणि मुंबई परिसरातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

खोपोली येथील धबधब्यावर अडकलेल्या 100 हून अधिक पर्यटकांची सुटका

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या खोपोली येथील प्रसिद्ध झेनिथ धबधब्यावर अडकलेल्या 100 हून अधिक पर्यटकांची स्थानिक गावकऱ्यांनी सुटका केली.

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नद्या आणि धबधब्यांची पाण्याची पातळी आणि प्रवाह लक्षणीयरित्या वाढला होता. असे असूनही, मोठ्या संख्येने पर्यटक झेनिथ धबधबा पाहण्यासाठी आले होते. दरम्यान, पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ झाल्याने 100 हून अधिक पर्यटक धबधब्याच्या परिसरात अडकले.

खोपोली येथील प्रसिद्ध झेनिथ धबधब्यावर अडकलेल्या 100 हून अधिक पर्यटकांची स्थानिक गावकऱ्यांनी सुटका केली.
फोटो कॅप्शन, खोपोली येथील प्रसिद्ध झेनिथ धबधब्यावर अडकलेल्या 100 हून अधिक पर्यटकांची स्थानिक गावकऱ्यांनी सुटका केली.

या घटनेची माहिती मिळताच, विहारी ठाकूरवाडी गावातील स्थानिक गावकरी घटनास्थळी पोहोचले आणि प्रसंगावधान व शौर्य दाखवून दोऱ्यांच्या साहाय्याने सर्व पर्यटकांना पाण्याच्या जोरदार प्रवाहातून सुखरूप बाहेर काढले.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली सक्रीय

बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाची प्रणाली सक्रीय आहे. Wind and Rain maps – याच कमी दाबाच्या प्रणालीमुळे राज्यात मान्सूनचा पाऊस वाढला आहे, कारण ही कमी दाबाची प्रणाली मान्सूनच्या वाऱ्यांना बळ देते.

BBC Weather 2 कमी दाबाचं हे क्षेत्र पुढे सरकेल, तसं पुढचे 4-5 दिवस कोकण, गुजरात आणि मध्यम प्रदेशातल्या काही भागात पाऊस बराच सक्रीय राहण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे.

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

गेल्या 24 तासांत झालेला मुसळधार पाऊस आणि आणखी पावसाची शक्यता पाहता कोकणातील मुंबई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यांत तसंच अहिल्यानगर आणि सोलापूरच्या काही भागांत फ्लॅश फ्लड आणि भूस्खलनासारख्या घटनांचीही शक्यता आहे.

5 जुलैसाठी मुंबई, पालघर ठाणे तसंच पुण्याचा घाट प्रदेश आण साताऱ्याच्या घाट प्रदेशात जोरदार पावसासाठी रेड अलर्ट आहे.

नाशिकच्या घाट प्रदेशात तसंच रायगड, रत्नागिरी तसंच कोल्हापूरचा घाट प्रदेश इथे जोरदार पावसासाठी ऑरेंज अलर्ट आहे.

अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदियात मेघगर्जनेसह पावसासाठी ऑरेंज अलर्ट आहे.

सिंधुदुर्ग, नाशिकचा पठारी भाग, धुळे, हिंगोली इथे जोरदार पावसाठी यलो अलर्ट आहे. तर संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बुलढाणा, अकोला, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीत मेघगर्जनेसह पावसासाठी यलो अलर्ट आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)