मान्सून ब्रेकवर पण कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता

फोटो स्रोत, Getty Images
मान्सूननं ब्रेक घेतला असला, तरी महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालजवळच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तशी आशा निर्माण झाली आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढच्या 24 तासांत हवामान कसं असेल, जाणून घेऊयात.
14 जुलैच्या दुपारच्या सॅटेलाईट दृश्यांमध्ये पाहिलं, तर मान्सून फारसा सक्रिय नाही, पण महाराष्ट्रावर विशेषतः विदर्भाजवळच्या भागात विरळ ढग दिसतायत. यामागचं कारण आहे, बंगालच्या उपसागराजवळ तयार होत असलेलं कमी दाबाचं क्षेत्र.
दक्षिण बांगलादेशजवळ हवेच्या मधल्या स्तरात सायक्लॉनिक सर्क्युलेशन म्हणजे चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली असून पुढच्या चोवीस तासांत तिचं कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होण्याची शक्यता आहे.
या वादळाच्या प्रभावामुळे ईशान्य आणि पूर्व भारतात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर वायव्य भारतात वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे पश्चिमेकडून येणाऱ्या वादळाचा प्रभाव आहे, या परिसरातून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांनी मान्सूनचा वेग मंदावला आहे.
पुढच्या 24 तासांत कुठे कुठे पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागराच्या या भागात कमी दाबाची सिस्टिम तयार होते, तेव्हा मान्सूनच्या वाऱ्यांना काहीशी गती मिळते आणि कोकण तसंच विदर्भातील पावसात वाढ होते. अर्थात हे क्षेत्र किती तीव्र होतं, यावर हा पाऊस अवलंबून असतो.
सध्याची स्थिती पाहता बीबीसी वेदर फोरकास्टनुसार पुढच्या 24 तासांत मुंबईसह कोकणात, विशेषतः घाट प्रदेशात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसू शकतात. पण राज्यात सर्वदूर मोठ्या पावसासाठी आणखी काही दिवस वाट पाहायला लागू शकते.

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं जारी केलेल्या अंदाजानुसार 14 जुलैच्या उत्तरार्धासाठी पालघर, ठाणे, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत थंडरस्टॉर्म म्हणजे मेघगर्जनेसह वीजा आणि पावसासाठी यलो अलर्ट आहे.
15 तारखेला हवामान विभागानं रायगड, ठाणे, नाशिकचा घाट प्रदेश, पुण्याचा घाट प्रदेश, अहिल्यानगर, संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसासाठी यलो अलर्ट आहे.
पालघर, मुंबई, पुणे, नाशिक, साताऱ्याचा घाट प्रदेश, नंदुरबार, धुळे, जळगाव, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पावसाच्या अभावी गेल्या दोन तीन दिवसांत राज्यातील काही ठिकाणी तापमानात थोडी वाढ दिसून येते आहे. विशेषतः रात्रीच्या तापमानात. विदर्भ आणि किनारी भागात तापमान 26 ते 27 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























