वसई-विरार जलमय : जनजीवन ठप्प, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विस्कळीत- ग्राऊंड रिपोर्ट

'यापूर्वी जे पाहिलं नव्हतं ते या पावसात पाहिलं'; वसई-विरारमध्ये दरवर्षी पूर परिस्थिती का निर्माण होते?
    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

"आम्ही यापूर्वी अनेक पावसाळे पाहिले, पण असा पाऊस आणि त्यानंतरचे असे दिवस कधी अनुभवले नव्हते. यापूर्वी जे पाहिलं नव्हतं, ते या पावसात पाहिलं. घरात पाणी, बाहेर पाणी, वीज नाही, फोन बंद. आता या शहरात राहण्याचीच भीती वाटते."

वसईतील पूरग्रस्त भागात राहणारे सचिन लोहार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना या भावना व्यक्त केल्या.

अशाच भावना गेल्या काही दिवसांत वसई, नालासोपारा आणि विरारमधील हजारो नागरिकांच्या मनात आहेत.

गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर वसई-विरारमधील अनेक भागांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.

अनेक वस्त्यांमध्ये घरांमध्ये पाणी शिरले, काही भागांचा वीजपुरवठा सलग अनेक दिवस बंद राहिला, इंटरनेट सेवा खंडित झाली, तर दूध, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही विस्कळीत झाला.

पावसाने विश्रांती घेतल्यानंतर प्रशासनाकडून परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याबाबत वसई विरार महापालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

'आवश्यक वस्तू मिळवणेही कठीण झाले होते'

बीबीसी मराठीने वसई, नालासोपारा आणि विरारमधील विविध पूरग्रस्त भागांना भेट दिली. यामध्ये वसईतील एव्हरशाईन, वसंत नगरी, आचोळे, गाला नगर, तुलिंज रोड, सेंट्रल पार्क, नगीनदास पाडा, तर विरार पश्चिमेतील विवा न्यू आणि ओल्ड कॉलेज परिसर, एमबी इस्टेट, जैन मार्ग, जकात नाका, बोळींज आणि विरार पश्चिम रेल्वे स्थानक परिसराचा समावेश होता. या भागांमध्ये रस्ते, सखल भाग, दुकाने, घरे आणि सोसायट्यांमध्ये 8 जुलैच्या दुपारपर्यंत पाणी साचलेले होते.

विरारमधील जुने विवा कॉलेज परिसरात पाऊस थांबल्यानंतर आणि पाणी ओसरल्यानंतरही अनेक इमारतींमध्ये चिखल, वाहून आलेले साहित्य, साचलेले मैलापाणी आणि नुकसान झालेल्या संसारोपयोगी वस्तूंची साफसफाई सुरू होती. तर काही सोसायटीमध्ये अजूनही पाणीसाचलेलंच असल्यामुळे, सोसायटीतले लोकं खिडकीतून पाणी कमी होण्याची वाट पाहत होते.

'यापूर्वी जे पाहिलं नव्हतं ते या पावसात पाहिलं'; वसई-विरारमध्ये दरवर्षी पूर परिस्थिती का निर्माण होते?

वसई आणि नालासोपारा परिसरातील काही भागांतील नागरिक चार दिवस अंधारात दिवस काढत होते. पावसामुळे या परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या डीपीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लोक संतप्त झाले होते.

नालासोपाऱ्यातील एका वस्तीतील नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून निषेधही नोंदवला. सलग चार दिवस वीज नसल्याने लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण वीजपुरवठा सुरळीत होण्याची वाट पाहत होते.

वसईतील वसंत नगरी परिसरात राहणारे सचिन गुप्ता म्हणाले, "घरात पाणी शिरल्याने धान्य, फर्निचर आणि घरातील अनेक वस्तूंचे नुकसान झाले. बाजारपेठा बंद असल्यामुळे आवश्यक वस्तू मिळवणेही कठीण झाले होते."

वीज नसल्यामुळे मोबाईल चार्ज करता येत नव्हते. त्यामुळे अनेक नागरिकांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला. इंटरनेट सेवा बंद पडल्याने घरातून काम करणाऱ्या लोकांचे कामही ठप्प झाले होते, असे सचिन गुप्ता यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले.

वीज गेल्यानंतर वाढल्या अधिक अडचणी

वसई पश्चिमेतील प्रमुख वीज उपकेंद्रात पाणी शिरल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून अनेक भागांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे वसई, नालासोपारा आणि विरारमधील हजारो नागरिकांना सलग अनेक दिवस विजेविना राहावे लागले.

वीज नसल्याने पाणीपुरवठा, मोबाईल नेटवर्क, इंटरनेट आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला. अनेक रहिवाशांनी सांगितले की, पूरापेक्षा त्यानंतरचे विजेविना गेलेले दिवस अधिक त्रासदायक ठरले.

वसईतील एका महिलेने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "अजून लाईट आलेली नाही. अनेक भागांत पाणी साचलेले आहे. काही सोसायट्यांमध्ये आज सकाळीही कंबरेपर्यंत पाणी होते. ट्रेन सुरू झाल्या आहेत, पण आमच्या भागातून स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर अजूनही पाणी आहे. दूध आणि इतर आवश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे. वीज नसल्याने पाण्याचे पंप सुरू नाहीत, टाक्यांमधील पाणी संपत आले आहे. काही भागांत पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. फोनची बॅटरी जवळपास संपली आहे. माझ्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेला डायलिसिससाठीही जाता आले नाही."

'लोकप्रतिनिधी प्रशासकीय यंत्रणा कोणीच आलं नाही'

तर नालासोपारा इच्छा सोसायटीत राहणाऱ्या सतीश दयाळकर म्हणाले, गेल्या पाच दिवसांमध्ये भीषण परिस्थिती होती. ही परिस्थिती पाहण्यासाठी आमच्या या परिसरात लोकप्रतिनिधी किंवा प्रशासकीय कर्मचारी अधिकारी कोणीच आलं नाही. आम्हाला व्यवस्थित खाणं-पिणं, लाईट , कोणाशीच काही संपर्क करता आला नाही.

पुढे दयाळकर म्हणाले, "समजा या पावसात काय झालं असतं तरी ते देखील कळलं नसतं. आता पाऊस कमी झालाय मात्र सोसायटीत पाणी अजूनही तसेच आहे. दैनंदिन जीवनापासून रोजगार सगळ्यावर आमच्या परिणाम झाला या काही दिवसात. हे फार दुर्दैवी आहे."

'यापूर्वी जे पाहिलं नव्हतं ते या पावसात पाहिलं'; वसई-विरारमध्ये दरवर्षी पूर परिस्थिती का निर्माण होते?

वसई विरार परिसरामध्ये ओढवलेल्या परिस्थिती संदर्भात वसई विरार महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं की, "आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा घेऊन अतिवृष्टीमुळे शहरातील ज्या भागांमध्ये पाणी साचले होते, अशा पाणी साचलेल्या विविध ठिकाणी महापौर अजीव पाटील तसेच आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी तत्काळ भरपावसात भेटी दिल्या व प्रत्यक्ष पाण्यात उतरून तेथील परिस्थितीची पाहणी केली व पाण्याचा निचरा होणे साठी आवश्यक त्या उपाययोजना करणेच्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना सूचना दिल्या."

तसेच, आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास सुरू ठेवण्यात आले होते. पूरग्रस्त भागामध्ये लोकांना फूड पॅकेट देखील देण्यात आले. तसेच अडचणीत सापडलेल्या लोकांना रेस्क्यू देखील करण्यात आले. परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याबाबत प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

दरवर्षी वसई-विरारमध्ये पूरसदृश परिस्थिती का निर्माण होते?

वसई-विरारमध्ये दरवर्षी निर्माण होणारी पूरसदृश परिस्थिती ही केवळ मुसळधार पावसाचा परिणाम नसून, त्यामागे भौगोलिक रचना, वेगाने झालेले नागरीकरण, नैसर्गिक जलमार्गांवरील अतिक्रमण, अपुरी जलनिस्सारण व्यवस्था आणि शहर नियोजनातील त्रुटी अशी अनेक कारणे एकत्रितपणे जबाबदार असल्याचे स्थानिक पत्रकार, शहर नियोजन आणि पर्यावरण अभ्यासक सांगतात.

'यापूर्वी जे पाहिलं नव्हतं ते या पावसात पाहिलं'; वसई-विरारमध्ये दरवर्षी पूर परिस्थिती का निर्माण होते?

या परिसरातील स्थानिक भूमिपुत्र व पत्रकार विपुल पाटील यांच्या मते, वसई-विरारचा मोठा भाग समुद्रसपाटीपासून कमी उंचीवर आहे. पश्चिमेला समुद्र आणि पूर्वेला डोंगर असल्यामुळे डोंगरावरून वाहून आलेले पावसाचे पाणी समुद्रात जाण्यापूर्वी शहरातील सखल भागांत साचते. त्यातच मुसळधार पाऊस आणि समुद्रातील भरती एकाच वेळी आल्यास पाण्याचा निचरा मंदावतो आणि अनेक भाग जलमय होतात.

ते सांगतात की, गेल्या दशकात या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले. मुंबईतील वाढत्या घरांच्या किमतीमुळे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांनी वसई-विरारमध्ये स्थलांतर केले, तर औद्योगिक क्षेत्राच्या विस्तारामुळे स्थलांतरित लोकसंख्याही वाढली. मात्र, या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत आवश्यक पायाभूत सुविधा त्याच वेगाने विकसित झाल्या नाहीत. त्यामुळे भौगोलिक रचना, अनियंत्रित नागरीकरण, नैसर्गिक जलमार्गांवरील अतिक्रमण, अपुरी जलनिस्सारण व्यवस्था आणि प्रशासकीय अंमलबजावणीतील विलंब या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून दरवर्षी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत असल्याचे पाटील सांगतात.

नैसर्गिक नाले, जलनिस्सारण व्यवस्था आणि रेल्वे परिसरातील अडथळे

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या भागात वार्तांकन करणारे स्थानिक पत्रकार मनोज तांबे यांच्या मते, या समस्येत नैसर्गिक नाले आणि खाड्यांवरील अतिक्रमणाचाही मोठा वाटा आहे. अनेक ठिकाणी विकासकामांमुळे पाण्याचे नैसर्गिक मार्ग अरुंद झाले असून त्यामुळे पावसाचे पाणी अपेक्षित वेगाने समुद्राकडे जाऊ शकत नाही.

तांबे सांगतात की, शहरातील अनेक भागांतील गटार व्यवस्था आणि नाले हे वाढलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुरे आहेत. काही ठिकाणी अंतर्गत गटारे एकमेकांशी व्यवस्थित जोडलेली नसल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याचे प्रमाण वाढते. याशिवाय नाल्यांमध्ये प्लास्टिक, बांधकामाचा मलबा आणि इतर कचरा साचल्याने पाण्याचा प्रवाह अडतो. महापालिकेकडून दरवर्षी नालेसफाई केली जात असली, तरी अनेक भागांत त्याचा अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याचे स्थानिकांचे निरीक्षण असल्याचे ते सांगतात. तसेच नालासोपारा आणि वसई रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत होते. रेल्वेमार्गालगत झालेल्या विकासकामांमुळे आणि काही भागांतील भरावामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहावर परिणाम झाल्याचेही ते नमूद करतात.

'यापूर्वी जे पाहिलं नव्हतं ते या पावसात पाहिलं'; वसई-विरारमध्ये दरवर्षी पूर परिस्थिती का निर्माण होते?

पाणथळ जागांचे रूपांतर, उपाययोजना आणि पुढचा मार्ग

शहराचे अभ्यासक व ज्येष्ठ पत्रकार संजय राणे यांच्या मते, पूर्वी अतिरिक्त पावसाचे पाणी शोषून घेणाऱ्या पाणथळ जागा, शेती आणि मिठागरांवर मोठ्या प्रमाणात भराव टाकून बांधकामे करण्यात आली. परिणामी पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी थेट रस्त्यावर आणि वसाहतींमध्ये साचू लागले. त्यामुळे वसई-विरारमधील पूरसदृश्य परिस्थितीकडे केवळ नैसर्गिक आपत्ती म्हणून पाहून चालणार नाही, तर बदललेली भौगोलिक परिस्थिती आणि शहर विकासाचा त्यावर झालेला परिणामही समजून घ्यावा लागेल.

राणे सांगतात की, 2018 मधील पूरानंतर महापालिकेने राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्या मदतीने पूरस्थितीचा अभ्यास करून अहवाल तयार केला होता. या अहवालात नैसर्गिक नाले मोकळे करणे, धारण तलाव विकसित करणे, कल्व्हर्ट बांधणे आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची क्षमता वाढविणे अशा अनेक उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या. मात्र अधिक खर्च पाहता या गोष्टी आजतागायत पालिका प्रशासनाकडून अमलात आल्या नाहीत. त्यामुळे बदललेली भौगोलिक परिस्थिती, वाढते नागरीकरण, जलनिस्सारण आणि विविध व्यवस्थेतील त्रुटी यांचा एकत्रित विचार करून दीर्घकालीन पूर व्यवस्थापनाचा आराखडा प्रभावीपणे राबविणे देखील आवश्यक आहे. अन्यथा प्रत्येक मोठ्या पावसानंतर वसई-विरारमधील नागरिकांना अशाच संकटाचा सामना करावा लागू शकतो, असे राणे सांगतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)