'न्यूज' सब-इन्स्पेक्टरच्या परीक्षेत पास, 'स्पेस राणी', 'हे राम' आणि 'भक्त प्रल्हाद' यांनीही मिळवले यश; जाणून घ्या प्रकरण

फोटो स्रोत, Alok Putul
- Author, आलोक पुतुल
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
जर कुणी तुम्हाला सांगितलं की 'न्यूज'नं सब-इन्स्पेक्टरची परीक्षा पास केली आहे, तर तुमचा पहिला प्रश्न कदाचित हाच असेल की, 'म्हणजे नक्की काय? कोणती न्यूज?'
छत्तीसगड लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या सब-इन्स्पेक्टर, सुभेदार आणि प्लाटून कमांडर यांच्या भरतीसाठीच्या प्राथमिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर मंगळवारी असंच काहीसं विचित्र वातावरण होतं.
एकीकडे, हजारो उमेदवार त्यांचे रोल नंबर्स शोधत होते, तर दुसरीकडे सोशल मीडियावर या निकालामधील एकाच नावाची चर्चा होती आणि ते नाव म्हणजे 'न्यूज.'
काही लोकांना ही टायपिंगमधील चूक असावी, असं वाटलं तर काहींनी याकडे केवळ एक खोडसाळपणा म्हणून पाहिलं.
पण असं असलं, तरी बऱ्याच लोकांना ही बाब गंभीर वाटली आणि त्यांनी छत्तीसगड लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
पण ही कथा इथंच संपली नाही. जेव्हा लोकांनी संपूर्ण निवड यादी बारकाईनं तपासली, तेव्हा यशस्वी उमेदवारांमध्ये 'स्पेस राणी', 'हे राम', 'भक्त प्रल्हाद' आणि 'मनबस' यांसारखी नावंही दिसून आली.
मग काय, बघता बघता संपूर्ण सोशल मीडिया स्क्रीनशॉट्सनी भरून गेला आणि काही क्षणांतच, एका भरती परीक्षेचा हा निकाल राज्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय बनला.
त्यानंतर, गुरुवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली.
अखेरीस, छत्तीसगड लोकसेवा आयोगाला स्पष्टीकरण द्यावं लागलं. त्यांनी असं स्पष्टीकरण दिलं की, ही नावं कोणत्याही तांत्रिक बिघाडाचा किंवा आयोगाकडून झालेल्या चुकीच्या नोंदीचा परिणाम नाहीत.
ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवार स्वतःच आपली नावं नोंदवतात. निवड यादीत प्रकाशित केलेली नावं ही अर्ज भरताना नोंदवलेल्या नावांप्रमाणेच असतात.
संध्याकाळपर्यंत, या नावांच्या उमेदवारांनीही स्पष्टीकरण दिलं की, हीच त्यांची खरी नावं आहेत. त्यांनी ही नावं शालेय नोंदींमध्ये, आधार कार्डांवर आहेत, तसेच स्पर्धा परीक्षेसाठीही वापरली गेली आहेत.
गेल्या महिन्यात घेण्यात आली होती परीक्षा
ज्या भरतीमुळे मोठा वाद निर्माण झाला, ती भरती प्रक्रिया प्रत्यक्षात छत्तीसगड पोलीस दलाच्या सर्वात महत्त्वाच्या भरतींपैकी एक आहे.
छत्तीसगड लोकसेवा आयोगानं सुभेदार, उपनिरीक्षक आणि प्लाटून कमांडर या 341 पदांच्या भरतीसाठी ही परीक्षा घेतली. ही प्राथमिक परीक्षा 12 जुलै 2026 रोजी राज्यातील सर्व 33 जिल्ह्यांमधील 183 केंद्रांवर घेण्यात आली होती.

फोटो स्रोत, Ravi S Sahani/The The India Today Group via Getty Images
या परीक्षेत हजारो उमेदवारांनी सहभाग घेतला होता. आयोगाच्या माहितीनुसार, 7,301 उमेदवार प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, ते आता मुख्य परीक्षेला बसणार आहेत.
प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी पुढील टप्पा मुख्य परीक्षा आहे. आयोगानं मुख्य परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेतली जाईल, असं सांगितलेलं आहे.
यशस्वी उमेदवारांनी मुख्य परीक्षेला बसण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणं आवश्यक आहे. त्यानंतर, भरती प्रक्रियेचे पुढील टप्पे पार पाडले जातील.
त्यामध्ये कागदपत्रांची पडताळणी, शारीरिक क्षमता चाचणी आणि इतर ठरलेल्या कार्यपद्धतींचा समावेश आहे.
सोशल मीडियावर होऊ लागली चर्चा
मंगळवारी जेव्हा या प्राथमिक परीक्षेचे निकाल जाहीर झाले, तेव्हा काही नावांवरून वाद निर्माण झाला. यात सर्वाधिक चर्चा 'न्यूज' या नावाची झाली. यशस्वी उमेदवारांच्या यादीत अशीच इतरही काही नावं होती.
मात्र, छत्तीसगडमध्ये मंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, ओबामा, क्लिंटन, अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांसारख्या नावांचं कुणालाच आश्चर्य वाटत नाही.
मात्र, हे प्रकरण लोकसेवा आयोगाच्या परीक्षेशी संबंधित असल्यानं त्यावरून वाद निर्माण झाला.

यानंतर, लोकांनी सोशल मीडियावर या नावांचे स्क्रीनशॉट्स शेअर करण्यास सुरुवात केली.
एकानं लिहिलं की 'न्यूज' आता पोलीस अधिकारी बनणार आहे, तर दुसऱ्यानं 'स्पेस क्वीन'चं अंतराळातून पृथ्वीवर परतल्याबद्दल आणि गणवेश परिधान केल्याबद्दल अभिनंदन केलं.
लवकरच, या विषयावरून मीम्स फिरू लागले पण हळूहळू हे प्रकरण विनोदांपलीकडे गेलं आणि त्यानंतर आता भरती प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे.
अनेक युझर्सनी असा प्रश्न उपस्थित केला की, आयोग नावांची पडताळणी न करताच निकाल जाहीर करतो का?
काहींनी याचं कारण 'डेटा एन्ट्री'मधील चूक असल्याचं सांगितलं, तर काहींनी संपूर्ण भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. गुरुवारी दिवसभर सोशल मीडियावर ही नावं चर्चेचा विषय ठरली.
नेत्यांनी काय सांगितलं?
राज्यातील भाजप सरकार आणि मुख्यमंत्री विष्णू देव साय यांच्यावर टीका करताना, माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी 'एक्स' (X) वर लिहिलंय की, "सीजीपीएससी (CGPSC) द्वारे घेण्यात आलेल्या सब-इन्स्पेक्टरच्या प्राथमिक परीक्षेत 'न्यूज' आणि 'स्पेस राणी' यांनी अत्यंत तडक-फडक असं यश मिळवलं आहे. त्या दोघांचेही 'तडक-फडक' असं अभिनंदन."
सनी लिओन यांना 'महतारी वंदन योजने'चा लाभ मिळणं ही विष्णू देवजींसाठी खरोखरच एक अभूतपूर्व कामगिरी आहे. या कामगिरीचं प्रदर्शन प्रत्येक चौकाचौकात करण्यासाठी जनसंपर्क विभागानं दररोज एक कोटी रुपये जाहिरातींवर खर्च करावेत, जेणेकरून 'रेडिओ राजा' आणि 'स्पेस राजा' यांनाही आगामी काळात एखाद्या परीक्षेत यश मिळू शकेल.

फोटो स्रोत, Santosh Kumar/Hindustan Times via Getty Images
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दीपक बैज आणि प्रवक्ते सुशील आनंद शुक्ला यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.
निवड यादीत आलेल्या नावांनी लोकांच्या मनात शंका निर्माण केल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.
अशा परिस्थितीत, भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत कोणतेही प्रश्न उपस्थित होऊ नयेत यासाठी आयोगानं संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट करावी.
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते उज्ज्वल दीपक यांनीही सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये या नावांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
'X' (ट्विटर) वर 'छत्तीसगड पीएससी'ला टॅग करत उज्ज्वल दीपक यांनी लिहिलं की, "सुभेदार/सब-इन्स्पेक्टर संवर्ग/प्लाटून कमांडर परीक्षा-2024 च्या प्राथमिक लेखी परीक्षेच्या निकालांबाबत उमेदवारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
यशस्वी उमेदवारांच्या यादीत 'Space Rani' (रोल क्र. 467) आणि 'News' (रोल क्र. 6074) अशा नावांचा समावेश आहे. सोशल मीडिया किंवा प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपण या शंकांचं आजच निरसन करावं, अशी अपेक्षा आहे. जरी ही टाइपोग्राफिमधील चूक असली, तरीही त्याबाबत उमेदवारांना योग्य ती माहिती दिली जावी."
आयोगानं काय सांगितलं?
वाद वाढत गेल्यानं, प्रतिक्रिया देण्यासाठी छत्तीसगड लोकसेवा आयोगावर दबाव वाढला.
अखेरीस, आयोगानं एक प्रसिद्धीपत्रक काढून सोशल मीडियावर पसरलेल्या चर्चा दिशाभूल करणाऱ्या असल्याचं सांगत त्या फेटाळून लावल्या.

फोटो स्रोत, CGPSC
आयोगानं एका लेखी निवेदनात म्हटलं आहे की, "आयोगाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या परीक्षा निकालांमध्ये दर्शविलेली उमेदवारांची नावं ही संबंधित उमेदवारांनी त्यांच्या ऑनलाइन अर्जांमध्ये नोंदवलेल्या आणि अंतिमरीत्या सादर केलेल्या नावांशी तंतोतंत जुळणारी आहेत.
उमेदवारांनी याच नावांनी कागदपत्र पडताळणी, शारीरिक चाचणी आणि प्राथमिक परीक्षेला हजेरी लावली होती, तसेच त्यांच्या प्रवेशपत्रांवरही त्यांची नावं अगदी तशीच दर्शविण्यात आली होती."
न्यूजनं म्हटलं, 'प्रमाणपत्र आहे'
गुरूवारी दिवसभर जो मुद्दा बनावट नावं म्हणून चर्चेला आला होता, तो मुद्दा रात्रीपर्यंत बऱ्याच अंशी सुस्पष्ट झाला.
रायगडमधील 28 वर्षीय 'न्यूज'नं सांगितलं की, शालेय व महाविद्यालयीन नोंदींपासून ते विविध सरकारी कागदपत्रांपर्यंतच्या सर्व दस्तऐवजांमध्ये हेच त्याचं पूर्ण नाव नोंदवलेलं आहे. यापूर्वी त्याने प्रयोगशाळा परिचर (लॅबोरेटरी अटेंडंट) परीक्षेमध्येही 150 वा क्रमांक मिळवला होता.
माध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, "मला या वादांमध्ये अजिबात अडकायचं नाही. माझं संपूर्ण लक्ष माझ्या मुख्य परीक्षेवर केंद्रित आहे. एकदा का माझी निवड झाली, की सर्वांना आपोआपच याचं उत्तर मिळेल."
त्याचप्रमाणे, बिलासपूर येथील 27 वर्षीय 'स्पेस राणी' हिनं सांगितलं की, तिच्या नावावरून सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेबद्दल तिला कालच समजलं.
स्पेस राणी म्हणाली की, "आज सकाळी मलाही राज्य लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातून फोन आला होता आणि त्यांनी पडताळणीसाठी माझ्या दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिकांच्या आणि आधार कार्डच्या प्रती मागितल्या होत्या. मी त्या सर्व त्यांना पाठवल्या आहेत."
सोशल मीडियावर निर्माण झालेल्या वादामुळे, मुंगेली जिल्ह्यातील देवरहाटमधील 27 वर्षीय परीक्षार्थी 'हे राम' याला आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी एक व्हीडिओ जारी करावा लागला.
आपल्या निवेदनात त्यानं म्हटलं आहे की, "CGPSC द्वारे घेण्यात आलेल्या SI मुख्य परीक्षेसाठी माझी निवड झाली आहे.
माझ्या नावाबाबत, विशेषतः माझं नाव 'हे राम' आहे की नाही, याबद्दल आक्षेप घेण्यात आला आहे. याचं स्पष्टीकरण देण्यासाठी मी माझं ओळखपत्र आणि निकालाची प्रत PSC ला ईमेलद्वारे पाठवलेली आहे."
समाजकार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ ब्रजेंद्र शुक्ला म्हणतात की, एखाद्या व्यक्तीनं निवडलेलं नाव हा वादाचा विषय नसावा. ती वैयक्तिक विचार, पसंती आणि निवडीची बाब आहे.
पुढे त्यांनी म्हटलं की, "मला आश्चर्य वाटतं की आज एखाद्या व्यक्तीचं नाव लोकांमध्ये चर्चेचा विषय बनलेलं आहे. एखादी व्यक्ती स्वतःसाठी किंवा आपल्या मुलांसाठी कोणतं नाव निवडते, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असतो.
केवळ नाव वेगळं किंवा असामान्य आहे म्हणून त्याकडे संशयाच्या किंवा वादाच्या दृष्टीनं पाहणं योग्य नाही. खरा भर हा व्यक्तीची ओळख आणि तिचं कार्य यांवर असायला हवा, केवळ नावावर नाही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

























