अकीब नबी : शिक्षकाचा मुलगा असा बनला भारतीय कसोटी टीममधील पहिला काश्मिरी क्रिकेटर

अकीब नबी

फोटो स्रोत, NurPhoto via Getty Images

फोटो कॅप्शन, अकीब नबी
    • Author, मोहसीन कमाल
    • Role, क्रिकेटविषयक लेखक
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

"तू अनेक स्टार क्रिकेटर्ससोबत खेळला आहेस. मग तू त्यांच्यासोबत सेल्फी का घेत नाहीस?"

बिलाल अहमद दार यांनी एकदा त्यांच्या चुलत भावाला अर्थात अकीब नबी याला विचारलं होतं.

अकीब नबी काहीसा हसला आणि म्हणाला, "एक दिवस मीच अशा ठिकाणी पोहोचेन, की त्यांना माझ्यासोबत सेल्फी घ्यावासा वाटेल."

बऱ्याच वर्षांनंतर अकीबचा तो अंदाज खरा ठरला.

येत्या 15 ऑगस्टपासून श्रीलंकेविरोधात भारताची दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होतेय. या मालिकेसाठीच्या भारतीय टीममध्ये जसप्रित बुमराहच्या नसल्यानं त्याच्या जागी अकीब नबीला संधी मिळालीय.

अकीब 29 वर्षांचा आहे. भारतीय कसोटी संघात जागा मिळवणारा तो जम्मू-काश्मीरमधील पहिला खेळाडू ठरलाय.

ज्या भागात कायम संघर्ष सुरू असतो, तीव्र हवामान, टोकाची थंडी आणि मर्यादित सोयीसुविधा आहेत, अशा भागात खेळांमध्ये काहीही करणं किंवा संधी मिळणं तसं दुरापस्तच; त्यामुळे अकीबची भारतीय संघात निवड होणं 'ऐतिहासिक क्षण' आहे.

अकीबचं बालपण बारामुल्ला जिल्ह्यातल्या छोट्याशा गावात गेलंय. अपुऱ्या सोयीसुविधांच्या मैदानांवर खेळत अकीब लहानाचा मोठा झालाय.

अकीबचे वडील गुलाम नबी दार हे शाळेत शिक्षक आहेत. त्यांचं स्वप्न होतं की, अकीबनं चांगलं शिकावं आणि डॉक्टर बनावं.

काश्मीर

फोटो स्रोत, Abid Bhat

फोटो कॅप्शन, काश्मीर

गुलाम नबी दार म्हणतात, "क्रिकेटमध्ये काहीही संधी दिसत नव्हत्या. खेळ खेळणं म्हणजे वेळ वाया घालवणं असंच आम्हाला वाटत होतं. त्यामुळे अकीबला अभ्यासावर लक्ष द्यायला सांगत असे."

मात्र, अकीबनं हळूहळू वडिलांचंही मन वळवलं.

गुलाम नबी दार पुढे सांगतात, "त्याचं क्रिकेटबद्दलचं वेड पाहता, मग मीही ते स्वीकारलं. एक शिक्षक म्हणून आणि वडील म्हणूनही, मला असं वाटलं की, त्याला ज्यात आवड नाही, त्यासाठी त्याला जबरदस्ती करण्यात अर्थ नाही. मग मी त्याला क्रिकेट खेळण्यासाठी पाठिंबा देत गेलो."

अकीबचे बालमित्र जुनैद दार सांगतात, आम्ही ज्या वातावरणात वाढलो, तिथं प्रोफेशनल क्रिकेटचा विचारही मनात डोकावणं अशक्य होतं.

जुनैद दार म्हणतात, "अकीबला क्रिकेटचं जणू वेड लागलं होतं. मी त्याला कायम विचारायचो की, 'तू हे सगळं कशाला करतोयेस? यात काहीही भविष्य नाही.' आम्ही जिथे वाढलो, तिथे व्यावसायिक खेळाची संकल्पनाच नाहीय आणि खेळासाठीच्या सोयीसुविधांचीही कमतरता होती."

अकीब नबी

फोटो स्रोत, NurPhoto via Getty Images)

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मात्र, आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अकीब जवळपास 70 किलोमीटरचा प्रवास करत श्रीनगरला जायचा, जेणेकरून त्याला क्रिकेटच्या योग्य खेळपट्ट्यांवर सराव करता येईल. क्रिकेटच्या पहिल्या निवड चाचणीला (ट्रायल्स) जाताना त्याच्याकडे स्पाइक असलेल्या क्रिकेटच्या बुटांची जोडीदेखील नव्हती.

"पण त्याची मेहनत करण्याची वृत्ती कधीच बदलली नाही," असं त्याचा चुलत भाऊ बिलाल सांगतो.

"अकीब अत्यंत कष्टाळू आहे. त्याच्यात सातत्य आहे. अडचणींवर कशी मात करायची, हे त्याला ठाऊक आहे. तो अडचणींमधून त्याचे मार्ग स्वत: काढतो," असं बिलाल सांगतो.

"तो पहाटे लवकर उठून जिममध्ये जायचा आणि त्यानंतर उरलेला संपूर्ण दिवस सराव करायचा. जवळपास 10 वर्षे त्याने हे जवळजवळ दररोज केलं." असं बिलाल सांगतो.

अकीबच्या कारकिर्दीला 2020 मध्ये मोठी कलाटणी मिळाली. त्या वर्षी त्याने जम्मू-काश्मीरकडून रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं आणि झारखंडविरुद्धच्या सामन्यात पाच विकेट्स घेतल्या.

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू, जम्मू-काश्मीरचा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि अकीबचा दीर्घकाळ कर्णधार राहिलेला परवेझ रसूल सांगतो की, अकीबचा एक गुण नेहमीच ठळकपणे जाणवला.

"मी अकीबच्या प्रगतीवर बराच काळ लक्ष ठेवून आहे. त्याच्यात मला सर्वांत उठून दिसणारी गोष्ट म्हणजे त्याची मेहनत करण्याची वृत्ती आणि शिस्त."

अकीब नबी

फोटो स्रोत, Abid Bhat

फोटो कॅप्शन, अकीब नबी

मात्र, हे यश एका रात्रीत मिळालेलं नाहीय. 2024-25 च्या रणजी ट्रॉफी हंगामात अकीबने 44 विकेट्स घेतल्या आणि स्पर्धेतील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज ठरला. तरीही राष्ट्रीय स्तरावरील चर्चेत त्याचे नाव फारसे आले नाही.

"तुम्ही चांगली कामगिरी करता, पण त्याची दखल घेतली जात नाही, तेव्हा वाईट वाटते. पण आपण कधीही आशा सोडता कामा नये. आशाच जगाला टिकवून ठेवते. त्याची वेळ नक्की येईल, असा माझा नेहमीच विश्वास होता," असे त्याचे वडील सांगतात.

आणि ती वेळ आली.

पुढील हंगामात अकीबने अलीकडच्या रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजीच्या कामगिरींपैकी एक नोंदवली.

त्याने 10 सामन्यांमध्ये 60 विकेट्स घेत स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्याच्या दमदार कामगिरीच्या जोरावर जम्मू-काश्मीरने तब्बल 67 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रथमच रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावलं.

या कामगिरीमुळे त्याला दिल्ली कॅपिटल्सनं आयपीएलमध्ये 8 कोटी 40 लाखांना आपल्या संघात घेतलं.

IPL मध्ये त्याला खेळण्याच्या फारशा संधी मिळाल्या नसल्या, तरी लाल चेंडूच्या क्रिकेटमधील त्याच्या दमदार कामगिरीने भारतीय निवड समितीचे लक्ष आधीच वेधून घेतले होते.

अकीब नबी

फोटो स्रोत, Abid Bhat

फोटो कॅप्शन, अकीब नबी

परवेझ रसूलच्या मते, अकीबची भारतीय कसोटी संघासाठी झालेली निवड ही केवळ एका खेळाडूच्या यशापुरती मर्यादित नाही, तर तिचे महत्त्व त्यापेक्षा खूप मोठे आहे.

"कसोटी क्रिकेट खेळणं हे प्रत्येक क्रिकेटपटूचे सर्वांत मोठे स्वप्न असतं. माझंही तेच स्वप्न होतं. अकीबला भारतीय संघात स्थान मिळाल्याचे पाहून मला अपार अभिमान वाटतो."

"एका अर्थाने, जम्मू-काश्मीरमधील आपल्यापैकी अनेकांनी मनात बाळगलेले स्वप्न अखेर त्याच्यामार्फत साकार झालंय, असं वाटतं. हा केवळ अकीब आणि त्याच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण जम्मू-काश्मीरमधील क्रिकेटसाठी ऐतिहासिक क्षण आहे."

"अकीब भारतीय संघापर्यंत पोहोचला, हेच त्याच्या प्रवासाचे वैशिष्ट्य नाही, तर तो ज्या परिस्थितीतून आला आहे, त्यामुळे त्याचा प्रवास अधिक उल्लेखनीय ठरतो," असे रसूल मानतो.

"भारतीय संघात स्थान मिळवणं कोणत्याही खेळाडूसाठी अत्यंत कठीण असतं, पण तुम्ही जम्मू-काश्मीरमधून येत असाल तर हे आव्हान आणखी मोठं असतं. अनेक वर्षांपासून आमच्याकडे मर्यादित पायाभूत सुविधा, कमी संधी आणि अनेक अडथळे आहेत, त्यांचा सामना देशाच्या इतर भागांतील खेळाडूंना कदाचित करावा लागत नाही."

"या स्तरावर पोहोचण्यासाठी असामान्य सातत्य, मानसिक ताकद आणि स्वतःवरचा विश्वास कायम ठेवण्याची जिद्द आवश्यक असते. अकीबने हे सर्व गुण दाखवून दिले आहेत. त्यामुळेच त्याचे हे यश विशेष ठरते."

1957 मध्ये जम्मू-काश्मीर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (BCCI) संलग्न झाला. तरीही या प्रदेशात आजही केवळ दोन प्रमुख क्रिकेट स्टेडियम आहेत आणि दोन्ही ठिकाणी सुविधा मर्यादित आहेत.

दीर्घकाळ चालणारा हिवाळा, मोठ्या प्रमाणावर होणारी हिमवृष्टी आणि अनेक दशकांचा संघर्ष यामुळे क्रिकेटच्या विकासाचा वेग आणखी मंदावला आहे.

"जम्मू-काश्मीरमधील क्रिकेटसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे," असे रसूल सांगतो.

"दीर्घकाळापासून लोक प्रश्न विचारत होते की, आपल्या प्रदेशातील एखादा खेळाडू भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवू शकतो का? अकीबने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. त्याची निवड हे सिद्ध करते की, जम्मू-काश्मीरमधील खेळाडूंना संधी दिली तर ते सर्वोत्तम खेळाडूंशीही स्पर्धा करू शकतात."

अकीबचा प्रवास नव्या पिढीला प्रेरणा देईल, असा रसूलला विश्वास आहे.

"मी खेळायला सुरुवात केली, तेव्हा जम्मू-काश्मीरमधून फारसे आदर्श खेळाडू नव्हते. आज परिस्थिती बदलत आहे. या प्रदेशातून भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवणारा पहिला खेळाडू म्हणून अकीबचे नाव नोंदले जाणे असंख्य तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्याचा आत्मविश्वास देईल. त्याचा प्रवास हे सिद्ध करतो की तुम्ही कुठून आला आहात किंवा तुमच्यासमोर कोणतीही आव्हाने आहेत, याने फरक पडत नाही. कठोर परिश्रम आणि चिकाटी तुम्हाला सर्वोच्च स्तरापर्यंत घेऊन जाऊ शकतात."

दरम्यान, बारामुल्लामध्ये परतलेले गुलाम नबी दार आता जिथे जातात, तिथे त्यांना ओळखलं जातं.

"लोक माझ्याजवळ येतात, मला मिठी मारतात आणि म्हणतात, हे अकीबचे वडील आहेत."

"यामुळे मला खरंच खूप अभिमान वाटतो."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)